प्रिय सर, मराठी मनाला तुम्ही विश्वाचे अंगण दिलेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:03 IST2025-05-21T10:03:12+5:302025-05-21T10:03:35+5:30

तुमचे संशोधन, लेखन, तुमच्या स्मृती विज्ञानाची पताका उंच फडकावतील. विश्वाचे रहस्य उलगडण्यासाठी आणखी एक पायरी वर चढण्याची प्रेरणा देतील.

Dear Sir, you have given the Marathi mind a place in the universe | प्रिय सर, मराठी मनाला तुम्ही विश्वाचे अंगण दिलेत!

प्रिय सर, मराठी मनाला तुम्ही विश्वाचे अंगण दिलेत!

डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन 

प्रिय सर,
तुमची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या खूप दिवसांपासून कळत होत्या. आता समजलेली सर्वात दु:खद बातमीही टांगत्या तलवारीसारखी काही काळ लटकलेली होतीच. पण तरीही ती नकोशी वाटत होती. तुम्ही आहात, ही तुमच्या अस्तित्वाची जाणीवही खूप आधार देणारी असायची. तुमच्या सहवासात आलेल्या, न आलेल्या, कितीकांच्या मनाशी आज हा आधार निखळल्याची भावना असणार आहे.

तुमची आणि मंगलाताईंची प्रत्यक्ष भेट होण्याआधीच तुमची सगळीकडे दुमदुमणारी कीर्ती ठाऊक होती. त्यामुळे भेटीचा मनावर खूप मोठा ताणही होता. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ. ‘रँग्लर’ ही गणितातील सर्वोच्च पदवी मिळवणारे गणितज्ञ. आपण भेटीत त्यांच्याशी काय बोलणार? भेटीचे निमित्त होते, डाॅ. श्रीराम गीत लिहीत असलेल्या ‘सृष्टिविज्ञान गाथा’ या प्रस्तावित विज्ञानकोशाचे. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या या विज्ञानकोशाच्या संपादनाची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी, अशी आमची विनंती तुम्ही मान्य केली होती. त्या संदर्भात झालेल्या पहिल्या भेटीतच तुमच्या मोठेपणाच्या, ज्ञानाच्या दडपणाखाली आम्ही गुदमरू नये, याची जाणीवपूर्वक काळजी तुम्ही घेत होतात. तुम्ही आणि डाॅ. श्रीराम गीत यांनी या कोशाचा आराखडा तयार केलात. 

बिनचूकपणाबद्दलचा आग्रह, सामान्य वाचकाच्या आकलनकक्षेत विषय येण्यासाठी सुबोध भाषेची सूचना यातून सर्वांगीण विचार करणारा तुमचा व्यासंग दिसत होता. आपल्या नर्मविनोदाने, मार्मिक टिपण्यांनी सारे वातावरणही हलकेफुलके  ठेवत होतात. ज्या विश्वाचा वेध तुम्ही  सातत्याने घेत राहिलात, त्याच विश्वातील अनेक चीजवस्तू या कोशाच्या अंगणात मांडून तुम्ही ‘विश्वाचे अंगण’ या कोशातून मराठी वाचकाला आंदण दिलेत. ‘सृष्टिविज्ञान गाथे’च्या निमित्ताने तुमच्या भेटींचा भाग्ययोग सुरू झाला आणि मग तुमच्या आणि मंगलाताईंच्या अनेक पुस्तकांच्या माध्यमातून हा भाग्ययोग वारंवार वाट्याला आला.

तुमच्याबरोबरची ‘आयुका’तील भेट असो, घरी ‘खगोल’भेट असो, फोनवरची वा सामकांकडून आलेल्या चिठ्ठीतील सूचनाभेट असो, प्रत्येक वेळी तुमच्या आणि मंगलाताईंच्या ऋजू व्यक्तिमत्त्वातून, अकृत्रिम स्नेहातून, सौम्य वागण्यातून आणि आपुलकीच्या बोलण्यातून जिव्हाळ्याचा झरा झुळझुळत असायचा. तुम्ही केलेल्या एखाद्या मार्मिक निरीक्षणातून चाललेल्या कामावर आणि त्यातील बारीकसारीक तपशिलावरही तुमची कशी घारीसारखी नजर आहे, याचीही जाणीव व्हायची. 
सर, ‘आयुका’चा सगळा परिसर आणि तिथल्या सगळ्या वास्तू या साऱ्याची उभारणी तुमच्या निगराणीखाली ख्यातनाम वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी केली होती. विज्ञान आणि कला, गणित आणि सौंदर्यशास्त्र यांतील अभिन्नत्वाची जाणीव करून देणारे... प्रेरणा आणि स्वास्थ्य, ऊर्जा आणि विश्राम यांचा एकत्र अनुभव देणारे हे स्थळ विज्ञानमंदिर बनले ते तुमच्या कर्तृत्वामुळे.

‘खगोल’मधली तुमची सदनिकाही अशीच आगळीवेगळी. एखाद्या आश्रमाचे पावित्र्य वागवणारी. रोजच्या दुधाच्या रतिबासंबंधी सूचना देणाऱ्या साध्या गोष्टीसाठीही दाराबाहेर एक चक्र टांगलेले. आत असलेल्या प्रत्येक वस्तूचे कुठल्या ना कुठल्या महनीय व्यक्तीशी नाते जुळलेले. मग ते एखाद्या महान चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेले निसर्गचित्र असो किंवा आर. के. लक्ष्मण यांच्या रेषांनी साकारलेले तुमचे अर्कचित्र. काम संपले किंवा बराच वेळ चालले, तर मंगलाताई आवर्जून चहाची आठवण करून देणार. मग तुम्ही संथ पावले टाकत कोपऱ्यातल्या टेबलाशी तुमच्या ठरलेल्या खुर्चीवर बसणार. मग तुम्हा दोघांच्या स्वभावाला साजेसा सौम्य चहा आणि त्याच्याबरोबर काहीतरी खास पदार्थ. ‘खगोल’मध्ये ये-जा करताना आपण एका ऋषितुल्य जोडप्याच्या आश्रमात येत-जात आहोत, असे वाटत असे.

२०२१ मध्ये तुम्ही नाशिक येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालात; त्या वेळी सर्वांची भावना अशीच होती, ‘यानिमित्ताने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला उंची लाभली’. सामान्य माणसाच्या मनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, साहित्याच्या प्रांतात  विज्ञानसाहित्याला सन्मानाचे स्थान लाभावे, साऱ्या समाजात विज्ञानप्रियतेचा विकास व्हावा, या हेतूने तब्येतीची पुरेशी साथ नसतानाही तुम्ही हे अध्यक्षस्थान भूषवले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. विज्ञानाबद्दलची आस्था तुमच्या अति बारीकसारीक गोष्टींतूनही प्रकट व्हायची. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात कुणी, विशेषत: मुलांनी तुमची सही मागितली तर तुम्ही सांगायचात, ‘मला विज्ञानातील शंका विचारणारं पत्र पाठव, मी तुला उत्तर पाठवीन; त्यात तुला माझी सहीही मिळेल.’

सर, तुम्ही केलेले शास्त्रीय संशोधन म्हणजे आमच्या दृष्टीने आकाशातल्या नक्षत्रांची भ्रमणे. पण तुमच्या वैज्ञानिक कथा अन् कादंबऱ्या हे मराठीच्या ललित क्षेत्रातले एक वैभवी दालन आहे. एखाद्या कसलेल्या लेखकाने रचलेले घाट वाटावेत अशी रचना तुम्ही या कथाकादंबऱ्यांतून साकारली आहे. 

‘समग्र नारळीकर’ या प्रकल्पात तुमच्या कादंबऱ्यांचा पहिला खंड प्रकाशित झाला. कथांच्या खंडाचे काम सुरू असताना मंगलाताईंनी या जगाचा निरोप घेतला. येत्या काही महिन्यांमध्ये या खंडाचे काम पूर्ण होणार असताना तो साकार झालेला पाहण्यास तुम्ही आमच्याबरोबर नाही आहात. मात्र तुमचे संशोधन, तुमचे लेखन, तुमच्या स्मृती विज्ञानाची पताका अधिकाधिक उंच फडकावतील. विश्वाचे रहस्य उलगडण्यासाठी आणखी एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील.

Web Title: Dear Sir, you have given the Marathi mind a place in the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.