सुसंस्कृत मोदी-पवार; टिळक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुण्यनगरीत तब्बल पाच राजकीय पक्षांचे नेते एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:27 AM2023-08-02T10:27:20+5:302023-08-02T10:29:07+5:30

टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त असलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील त्यांच्याच शेजारी असल्याने टिळक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुण्यनगरीत तब्बल पाच राजकीय पक्षांचे नेते एकत्र आल्याचे देशाने पाहिले.

Cultured Narendra Modi Sharad Pawar Leaders of as many as five political parties gathered in Pune on the occasion of distribution of Tilak Award | सुसंस्कृत मोदी-पवार; टिळक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुण्यनगरीत तब्बल पाच राजकीय पक्षांचे नेते एकत्र

सुसंस्कृत मोदी-पवार; टिळक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुण्यनगरीत तब्बल पाच राजकीय पक्षांचे नेते एकत्र

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित राहिलेच. त्यामुळे ‘इंडिया’ नावाच्या विरोधकांच्या आघाडीतील नेते नाराज झाले असतील. लोकसभेच्या लढाईची सज्जता आणि आयुधे तसेच सैन्य व सेनापतींची जमवाजमव होत असताना विरोधी गोटातील अतिरथी-महारथींपैकी एक शरद पवार थेट मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थित राहणे अनेकांना रुचले नव्हते. भाजप नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झालेले पुतणे अजित पवार यांच्यापाठोपाठ काकाही भाजप मित्रमंडळात सहभागी होतील, अशा वावड्याही उठल्या. तथापि, तो विरोध, नाराजी, शंकाकुशंका बाजूला ठेवून थोरले पवार समारंभाला उपस्थित राहिले. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त असलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील त्यांच्याच शेजारी असल्याने टिळक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुण्यनगरीत तब्बल पाच राजकीय पक्षांचे नेते एकत्र आल्याचे देशाने पाहिले.

यानिमित्ताने शरद पवारांच्या अमृत महोत्सवाची अनेकांना आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या दोन नव्या मार्गांचा प्रारंभ तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या चाव्या देण्याच्या दुसऱ्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले. तिथले त्यांचे भाषण लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे होते. तथापि, टिळक पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी, तसेच शरद पवार यांनीही राजकीय पक्षांमधील हेवेदावे, वैचारिक विरोध, निवडणुकीच्या राजकारणातील स्पर्धा यांच्या पलीकडचे, देशहिताचे मुद्दे आणि संपूर्ण भारतावर प्रभाव असलेल्या लोकमान्यांच्या योगदानाचा गौरव करणारी भाषणे केली. एका प्रगल्भ राजकीय संस्कृतीचा परिचय करून दिला. खरे पाहता हेच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. राजकीय व्यासपीठांवर एकमेकांची यथेच्छ उणीदुणी काढणारे, सडकून टीका करणारे वैचारिक विरोधक खासगी व कौटुंबिक जीवनात मात्र ती कटुता बाजूला ठेवून परस्परांशी स्नेहाने वागल्याची शेकडो उदाहरणे देता येतील. विषय पवारांचाच असल्यामुळे यापैकी बाळासाहेब ठाकरे व पवारांच्या संबंधाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. एकमेकांचे हे टोकाचे वैचारिक विरोधक वैयक्तिक आयुष्यात मात्र आगळेवेगळे मैत्र जपत राहिले. दोन्ही कुटुंबांमध्येही स्नेह राहिला.

जुना जनसंघ आणि इंदिरा, अर्स किंवा एस काँग्रेस, तसेच शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे नेते राजकारण एकमेकांच्या विरोधात करायचे. परंतु, तिथली कटुता वैयक्तिक संबंधांमध्ये येऊ द्यायचे नाहीत. विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्याविरुद्ध कोर्टात खटला गुदरणारे अमळनेरचे साथी गुलाबराव पाटील कोर्टाच्या कामासाठी मुंबईला गेले की, चौधरींच्याच बंगल्यावर थांबायचे. हे सारे ऐकले की, आपण कोणत्या अद्भुत जगात तर नव्हतो ना असे वाटावे इतकी सध्याच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. कमालीचा द्वेष, तिरस्कार, अनर्गळ भाषा, चारित्र्यहनन अशा नको त्या साऱ्या गोष्टींची सध्या राजकारणात बजबजपुरी माजली आहे. या पृष्ठभूमीवर, टिळक पुरस्कारासाठी आपणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळवून दिली असल्याने नैतिकदृष्ट्या त्या कार्यक्रमाला हजर राहणे आवश्यक असल्याचे शरद पवारांनी म्हणणे, प्रत्यक्ष समारंभात उपस्थित राहणे आणि सर्जिकल स्ट्राइकसारखा अपवादात्मक किरकोळ उल्लेख वगळता सार्वजनिक जीवनातील साधनशूचिता पाळणे याचे आपण स्वागत करायला हवे. याच समारंभातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणही त्याच शूचितेचे संवर्धन करणारे होते.

छत्रपती शिवराय हा मराठी अस्मितेचा पाया. लोकमान्य टिळक, श्यामजी कृष्ण वर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील परस्पर समन्वय अधोरेखित करताना महाराणा प्रताप यांच्यासोबत छत्रपतींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीचा त्यांनी केलेला उल्लेख टिळक पुरस्काराच्या समारंभाची उंची वाढविणारा ठरला. लोकमान्य टिळक यांच्यासारख्या उत्तुंग राजकीय नेतृत्वाला एक प्रकारे दोघांनी दिलेली ही सलामी ठरली. इंदिरा गांधी यांना मरणोपरांत, तर सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फारखान, प्रणव मुखर्जी, डॉ. मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी आदींना दिला गेलेला हा पुरस्कार स्वीकारणारे नरेंद्र मोदी हे पहिले विद्यमान पंतप्रधान आहेत. त्या वैशिष्ट्याचा आब समारंभात राखला गेला हे महत्त्वाचे. शेवटी राजकारण म्हणजे रस्त्यावर दाखवला जाणारा मदाऱ्याचा खेळ नाही. ही त्यापेक्षा गंभीर आणि लोकशाहीमध्ये सामान्यांच्या जीवनमरणाशी निगडित बाब आहे. तिच्याकडे तितक्याच गांभीर्याने पाहायला हवे.
 

Web Title: Cultured Narendra Modi Sharad Pawar Leaders of as many as five political parties gathered in Pune on the occasion of distribution of Tilak Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.