coronavirus: विनोदवीर ‘सूरमा भोपाली’ची एक्झिट

By अजय परचुरे | Published: July 10, 2020 03:57 AM2020-07-10T03:57:44+5:302020-07-10T03:58:47+5:30

जगदीप यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर पहिले ‘सूरमा भोपाली’ची अजरामर भूमिकाच येते. या भूमिकेने त्यांना सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. ही किमया जेवढी लेखक सलीम-जावेद यांची होती, तेवढीच त्यांच्या अभिनयाचीही होती.

coronavirus: Exit of Comedian ‘Surma Bhopali’ | coronavirus: विनोदवीर ‘सूरमा भोपाली’ची एक्झिट

coronavirus: विनोदवीर ‘सूरमा भोपाली’ची एक्झिट

Next

- अजय परचुरे 
(वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, मुंबई)

आयुष्यात संघर्ष केला की त्याचं निश्चित फळ मिळतच असतं. प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. घरात अठरा विश्वं दारिद्र्य असलं तरी कोणतंही चुकीचं काम करणार नाही हे जगदीप यांनी आधीच ठरवलं होतं आणि आयुष्यभर ते या गोष्टीवर कायम राहिले.
जगदीप यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर पहिले ‘सूरमा भोपाली’ची अजरामर भूमिकाच येते. या भूमिकेने त्यांना सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. ही किमया जेवढी लेखक सलीम-जावेद यांची होती, तेवढीच त्यांच्या अभिनयाचीही होती. जगदीप यांनी सूरमा भोपाली असा काही सादर केला की, तो थेट प्रेक्षकांच्या मनातच जाऊन बसला. सूरमा भोपाली या प्रसिद्ध नावाच्या सिनेमाची त्यांनी निर्मितीही केली आणि दिग्दर्शनही, इतकं हे नाव त्यांच्याशी जोडलं गेलेलं होतं.

सैयद इश्तियाक जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. २९ मार्च १९३९ ला तेव्हाचा सेंट्रल प्रॉविन्स म्हणजे आताच्या मध्य प्रदेशमधील दतिया गावात एका बॅरिस्टरच्या घरात त्यांचा जन्म झाला. देश स्वतंत्र झाला त्याचवर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. फाळणीमुळे अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम वाद होत होते. अशा स्थितीत जगदीप यांच्या आईने आपल्या मुळाबाळांना घेऊन थेट मुंबई गाठली. मुंबईला येऊन त्यांची आई एका अनाथ आश्रमात स्वयंपाकीण म्हणून रुजू झाली.

घरची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने जगदीप यांनी लहानपणीच आईची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच वेळेस एक वेळ उपाशी राहीन, परंतु वाईट काम करणार नाही, असा निश्चयही केला आणि आपल्या या निश्चयाला जागत रस्त्यावर कंगवे विकण्यापासून ते पतंग विकण्यापर्यंत अनेक कामे केली. याच दरम्यान योगायोगानेच त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. बी. आर. चोप्रा अफसाना नावाचा चित्रपट करत होते आणि एका सीनमध्ये काही मुलांची गरज होती. जगदीप त्यावेळी सहा-सात वर्षांचे होते. तेव्हा सिनेमांसाठी एक्स्ट्रा कलाकार पुरविणाऱ्याने काही मुलांसोबत जगदीप यांनाही या सिनेमाच्या सेटवर आणलं. तीन रुपये मिळतील असं कळल्यावरच जगदीप काम करण्यासाठी तयार झाले. त्या काळात दिवसभर वस्तू विकून केवळ दीड रुपया मिळत असे. परंतु इथे फक्त टाळी वाजविण्यासाठी तीन रुपये मिळणार होते, म्हणून जगदीप यांनी ते काम करण्याचे लगेच मान्य केले आणि इथूनच जगदीप यांचा बॉलिवूडचा प्रवास खºया अर्थाने सुरू झाला.

मास्टर मुन्ना या नावाने मग ‘अब दिल्ली दूर नहीं’, ‘आरपार’ अशा काही चित्रपटांत बालकलाकार म्हणून त्यांनी काम केले. बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’पासून जगदीप यांना ओळख मिळायला सुरुवात झाली. भाभी, बरखा, बिंदिया या चित्रपटांत जगदीप यांनी नायक म्हणूनही काम केले. परंतु त्यांचे चित्रपट काही यशस्वी झाले नाहीत. ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि तेथून विनोदी भूमिकांचा त्यांनी धडाका उडवून दिला. त्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये तीन बहुरानीया, जीने की राह, दर्पण, गोरा और काला, आॅँख मिचोली, इन्सानियत, जग्गू, चला मुरारी हिरो बनने, आदींचा समावेश आहे. जगदीप यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा मेहमूद, जॉनी वॉकर, राजेंद्रनाथ असे अनेक मातब्बर विनोदी अभिनेते होते. तरीही जगदीप यांनी आपलं स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. एक मासूम आणि मंदिर-मस्जीद या चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिकाही साकारल्या. एका चित्रपटातील त्यांचा ‘खंबा उखाडके’ हा डायलॉग त्याकाळात देशभर प्रसिद्ध झाला होता.

जगदीप यांनी तीन लग्नं केली. नावेद आणि जावेद ही त्यांची दोन मुले बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करून आहेत. त्यांची तिसरी पत्नी ही त्यांच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या या लग्नाची कथा मजेशीर आहे. त्यांच्या नावेद नावाच्या मुलासाठी एक स्थळ आले होते; परंतु नावेदला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे ते स्थळ परत गेले. परंतु त्या मुलीच्या बहिणीवर नाजिमावर जगदीप यांचे प्रेम जडले. त्यांनी त्या मुलीला विचारले. तिच्या घरचेही तयार झाले आणि दोघांनी लग्न केले. वडिलांच्या या लग्नामुळे जावेद खूप नाराज झाला होता; परंतु नंतर सर्व काही ठीक झाले. जगदीप यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, त्यातून तावून सुलाखून त्यांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिलं. जगदीप आज आपल्यात नाहीत; मात्र त्यांचा ‘सूरमा भोपाली’ कायम आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात राहील....

Web Title: coronavirus: Exit of Comedian ‘Surma Bhopali’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.