Corona girls in the jaws of time! Child marriage statistics infuriating | कोरोना काळाच्या जबड्यात कोवळ्या मुली! बालविवाहांची आकडेवारी संताप आणणारी

कोरोना काळाच्या जबड्यात कोवळ्या मुली! बालविवाहांची आकडेवारी संताप आणणारी

- गजानन चोपडे
(उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)

तिला शिकायचं आहे, उच्च शिक्षण घेऊन आकाशाला गवसणी घालायची आहे; पुरूषापेक्षा कुणीही कमी लेखू नये, म्हणून आपलं कर्तुत्व सिद्ध करून दाखवायचं आहे परंतु पुरोगामी राज्याचं बिरूद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात आजही होणारे बालविवाह तिच्या पंखांना कात्री लावू पाहत असतील तर हे दुर्दैवच नाही का!  एक मुलगी शिकली तर अख्खं घर साक्षर होतं, हे वास्तव असलं तरी मुलीला डोक्याचा ताप समजणाऱ्या घाणेरड्या मानसिकतेतील काही मंडळी तिला अल्पवयातच विवाह बंधनात अडकवण्याचा अपराध करीत आहेत. मागील वर्षभरात तर कोविड आणि लाॅकडाऊनचा फायदा घेत पश्चिम विदर्भात अनेक बालविवाह झाले.

काही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला तर काही ठिकाणी हे पाप करणाऱ्यांचं फावलं. ते आताही मोकाट आहेत आणि ती मात्र विवाह बंधनात (तिच्या इच्छेविरुद्ध) अडकून आपल्या स्वप्नांची राखरांगोळी होतानाच्या वेदना सोसतेय. मात्र आता परिस्थिती बदलत आहे.  स्वत: पुढे येत बालविवाहाविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या मुली इतर मुलींसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.  अलीकडेच अमरावती शहरातील एका घटनेने तर हे सिद्धच केले.  काही रकमेच्या आमिषातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पोटच्या अजाण लेकीचा २० वर्षीय युवकाशी विवाह  करण्याचा प्रयत्न केला. मात्र,   आईच्या या निर्णयाविरुद्ध बंड पुकारत ‘मला हे लग्न मान्य नाही, मला शिकायचं आहे’, असं या मुलीने आईला ठणकावून सांगितलं. एवढ्यावर ती थांबली नाही तर थेट गाडगेनगर ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला.

मुलीच्या तक्रारीवरून मुलीची आई व युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. जन्मदात्या आईने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला या मुलीने कडाडून विरोध केला नसता तर बालविवाहाच्या या अरिष्ट रुढीत तिचाही बळी गेला असता. एका दुसऱ्या घटनेत यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील एका मंदिरात कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत विवाह होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला तेव्हा भलतेच प्रकरण उघडकीस आले. या मंदिरात चक्क ३० वर्षीय नवरदेवासोबत एका अल्पवयीन मुलीला        विवाहबंधनात बांधले जात होते. पोलिसांनी हा डाव मोडला मात्र, वेळीच माहिती मिळाली नसती तर या मुलीच्या नशिबी नरकयातनाच आल्या असत्या. 

१ एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत अमरावती विभागातील बालविवाहांबाबतची आकडेवारी तर संताप आणणारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात २२ बालविवाह रोखण्यात आले असून फक्त एका प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात १२ बालविवाह थांबविण्यात आले असून तीन प्रकरणात कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातही १२ बालविवाह रोखण्यात शासकीय यंत्रणेला यश आले तर बुलडाणा जिल्ह्यात हा आकडा २१ च्या घरात आहे. अकोला जिल्ह्यातही पाच पैकी एका प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला. 

बालविवाह हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव  आम्हाला अद्याप झालेली नाही. झाली असती तर उच्च  शिक्षण घेऊन नोकरीसाठी बाहेर जाण्याऐवजी गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या  गडचिरोली जिल्ह्यातील कोठी या दुर्गम आणि आदिवासी गावाच्या सरपंच भाग्यश्री मनोहर लेखामीच्या  कर्तृत्वाचे  आम्हाला विस्मरण झाले नसते. उच्च शिक्षण घेतले म्हणूनच सरपंच झाल्यानंतर गावाच्या विकासाचे स्वप्न बघण्याचे भाग्यश्रीला बळ मिळाले. अतिदुर्गम भागात राहूनही जंगलाच्या वाटेने बाईकवरून भाग्यश्री बिनधास्तपणे फिरतात. गावातील परंपरांना फाटा न देता गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतात.

जिल्हा मुख्यालयापासून अडीचशे किलोमीटर  अंतरावरील कोठी या गावच्या सरपंच म्हणून भाग्यश्री यांची अविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत ७ ते ८ गावांपैकी एक मरकणार हे भाग्यश्री यांचे गाव. गडचिरोलीत शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्याचवर्षी कोठी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. यावेळी सरपंचपद मरकणार या गावाकडे देण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. त्यामुळे गावात शिकलेले आणि राजकारण समजणारे कोण, याची चाचपणी केली असता भाग्यश्री लेखामी यांचे नाव समोर आले आणि त्यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली.

ज्या गावात जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही, त्या दुर्गम गावाची धुरा भाग्यश्रीसारख्या युवतीच्या हाती दिली गेली. शिक्षक वडील आणि अंगणवाडी सेविका असलेल्या आईच्या प्रोत्साहनामुळे भाग्यश्रीची सामाजिक क्षेत्रात आवड आणि आत्मविश्वास वाढत गेला. पालकांनी धाडस बांधले म्हणून हे शक्य झाले, असे अभिमानाने जेव्हा त्या सांगतात तेव्हा बालविवाहाच्या जोखडात आपल्या चिमुकलीला अडकवू पाहणाऱ्यांची कीव येते.

Web Title: Corona girls in the jaws of time! Child marriage statistics infuriating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.