इथे या, पुस्तक वाचा, कॉफी प्या, गप्पा मारा, हसा-नाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:42 IST2025-06-14T11:41:34+5:302025-06-14T11:42:25+5:30

Finland: फिनलंडच्या राष्ट्रीय संसदेच्या समोरच उडी लायब्ररी आहे. इथून पाय हलत नाही. अभ्यास, आराम आणि सामाजिक चहलपहल या सगळ्यांचा अति-प्रसन्न अनुभव!

Come here, read a book, drink coffee, chat, laugh and dance... | इथे या, पुस्तक वाचा, कॉफी प्या, गप्पा मारा, हसा-नाचा...

इथे या, पुस्तक वाचा, कॉफी प्या, गप्पा मारा, हसा-नाचा...

- साधना शंकर
(लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी) 

फिनलंड हा जगातला सर्वात सुखी देश म्हणून ओळखला जातो.  या देशात आर्क्टिक मंडळाच्या जवळ सांताक्लॉजचे गावही आहे. वनराजीने नटलेल्या या देशात चहूकडे पाणीच पाणी दिसते. मला मात्र फिनलंडमध्ये फिरताना तेथील ग्रंथालये विशाल आणि अत्यंत संपन्न असल्याचे अतिशय प्रकर्षाने लक्षात आले.

ग्रंथालय म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर पुस्तकांनी भरलेल्या कपाटांच्या रांगांच्या रांगा  येतात. आधुनिक काळात काम करण्याची जागा म्हणजे जेथे बसून लॅपटॉप चालवता येतो, असे ठिकाण.  फिनलंडमध्ये हेलसिंकी येथील राष्ट्रीय ग्रंथालय तुम्ही अवाक् व्हाल इतके भव्य आहे. फिनलंडमधील या राष्ट्रीय ग्रंथालयाची मुख्य इमारत १८३६ साली सीएल एंजल या स्थापत्यविशारदाने संकल्पचित्रात उतरवली. १८४० ते ४५  या पाच वर्षात ती बांधून पूर्ण झाली. १९१७ साली फिनलंडला स्वातंत्र्य मिळाले. तोवर या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या ३ लाखांच्या घरात गेली होती. 

आजमितीला फिनलंड येथील वातावरण संशोधनासाठी अत्यंत समृद्ध आहे. पर्यटक म्हणून तुम्ही शांतपणे येथे येऊ शकता आणि इमारतीची स्थापत्यकला, एकंदर सुबकता यातील सौंदर्य पाहू शकता. इमारत सहा मजल्यांची असून मुख्य घुमटाखाली उभे राहिले तर सहाही मजले दिसतात. तुम्ही तेथे गेलात तर त्या वास्तूत मानवतेच्या ज्ञानभांडाराविषयी कृतज्ञतेचा  भाव तुमच्या मनात प्रकट झाल्यावाचून राहत नाही.

नॅशनल लायब्ररीपासून काही अंतरावर उडी लायब्ररी आहे. आधुनिक पद्धतीची या ग्रंथालयाची इमारत लांबून एखाद्या लाटेसारखी दिसते. फिनलंडच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. तेथे केवळ पुस्तकेच नव्हे तर आणखी बरेच काही आहे. इथे आल्यावर प्रेरणा मिळते. नव्या काळातील हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे. पूर्णपणे मोफत आहे. फिनलंडच्या राष्ट्रीय संसदेच्या समोरच या ग्रंथालयाची भव्य अशी तीन मजली वास्तू आहे.

शहरातील रहिवाशांसाठी एकमेकांना भेटण्याची आणि अध्ययनाची जागा म्हणून हे तीन मजले वापरले जातात. तुम्ही येथे येऊन वाचू शकता. चांगले अन्नपदार्थ खाऊ शकता. आपल्याला आवश्यक असलेली अनेक कौशल्ये आत्मसात करू शकता; फिनिश भाषाही त्यात आली. येथे सिनेमा पाहता येतो. काही कार्यक्रम होतात. सुसज्ज अशा स्टुडिओमध्ये ध्वनी मुद्रण किंवा संपादन करता येते. इतकेच नव्हे तर मुलांना तुम्ही येथे खेळण्यासाठी आणू शकता. या ग्रंथालयात थ्री डी प्रिंटिंग  मोफत करून मिळते. उडी या ग्रंथालयात तर तुम्ही नाटकाची तालीम घेऊ शकता. नृत्याचा सराव करू शकता. एक अत्यंत आदर्श असे सभागृहसुद्धा येथे आहे.

तिसऱ्या मजल्यावर पुस्तकांची कपाटे आहेत. तेथे तुम्हाला पुस्तकांची छाननी करणारे, पुस्तके उचलणारे रोबोट दिसतील. आधी ते जरा बुजरे वाटतात, पण नंतर खुले होतात. २०२५  सालीही हे वाचनालय  स्वच्छ, सातत्याने निगा राखली जाणारी खुली सार्वजनिक जागा आहे. जणू काही सारे काही नवे कोरे  असल्याचा भास होतो. आपण ज्या मजल्यावर जातो तेथे लोकांची गजबज असते. काहीजण स्वयंपाक करत असतात. काही शिवणकाम करतात. कोणी ध्वनीमुद्रण करते तर कोणी कॉफीचे घुटके घेताना दिसते.  काहीजण प्रिंट काढत असतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी येथे काही ना काही करण्यासारखे आहे.

सार्वजनिक जागा कशी असावी, याचा उडी लायब्ररी हा एक आदर्श आहे. ती सर्वांसाठी आहे. हेलसिंकीच्या पर्यटनाच्या नकाशावरती  हे ग्रंथालय मानाची जागा पटकावून आहे.  आपल्याकडेही अशी एखादी जागा असली पाहिजे, अशी इच्छा आपल्या मनात प्रकटल्याशिवाय राहत नाही. अभ्यास, आराम आणि सामाजिक चलनवलन  या सगळ्यांचा मिलाफ इथल्या निवांत वातावरणात आढळतो. खरेतर, कोणतेही ग्रंथालय हे असेच असले पाहिजे, असे राहून राहून माझ्या मनात येत होते.
sadhna99@hotmail.com

Web Title: Come here, read a book, drink coffee, chat, laugh and dance...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :finlandफिनलंड