Come on baby! A custom from two tapas | या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज

या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज

लहानपणी घरी कोणी तत्कालीन तथाकथित प्रतिष्ठित आले की, आम्ही आपल्याच घरात अंग चोरून पाण्याचा तांब्या, पेला त्यांच्यासमोर ठेवताच ‘हा कोण मुलगा? नाव काय तुझे? कोणत्या वर्गात शिकतो,’ अशा प्रश्नांची सरबत्ती होताच दडपल्या मनानेच सारे सांगितल्यानंतर आता गणिताची कोडी घालतात का, अशी अनामिक भीती अन्‌ पोटात गोळा आलेला असे. एखादी कविता म्हणून दाखव, असे  म्हणताच  ‘या बाळांनो सारे या’ ही कविता तारस्वरात आम्ही सुरू करीत असू. हा प्रसंग परवा डोळ्यासमोर उभे राहण्याचे कारण म्हणजे पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली. जसे की पूर्वी बाळासाहेबांनी, फडणवीसांनी, उद्धव ठाकरे यांनी अशा बैठका घेतल्या असल्याने आता हा रिवाजच पडला आहे, तर ही नाणावलेली मंडळीसुद्धा दोन तपांपासून त्याच- त्याच गोष्टी सांगत आहेत. सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात. म्हणजे ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे’ या म्हणीचा प्रत्यय औरंगाबादकरांना सवयीचा झाला आहे. मला तर वाटते तेच सभागृह, त्याच टेबल-खुर्च्या असल्याने ही सगळी भाषणे त्या भिंती, टेबले, खुर्च्यांना तोंडपाठ झाली असतील. आपणच त्यांना बोलण्याची संधी देत नाही.

दोन तपांपासून औरंगाबादची मंडळी पाणी, रस्ते, पर्यटन या त्रिकोणातच अडकून पडली आहे. या त्रिकोणाचा चौथा कोन त्यांना सापडत नाही. या शहराची महानगरपालिका गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगदी परवापर्यंत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होईपर्यंत सेना व भाजप हे दोघे, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ गात महापालिकेत झिम्मा खेळत होते; पण ‘वर्षा’तून बेवारस होताच एकमेकांचे गळे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत याला ‘गच्ची पकडणे’ असेसुद्धा म्हणतात, तर पंचवीस वर्षे शहराची सत्ता उपभोगताना या शहराचे प्रश्न काय आहेत, त्याचा विकास कसा करता येईल. हे माहीत करून घेण्यासाठी शिवसेनेला असे ‘रमणे’ भरवावे लागत असतील, तर पाव शतक त्यांनी काय केले? हा प्रश्न पडतो. पंचवीस वर्षांत या शहराचे वाटोळे केले? एवढेच स्पष्टपणे म्हणता येईल. महापालिकेच्या जागा विकल्या, बळकावल्या. जनकल्याणाचा विचार न करता सरकारी पैसा उधळला. या शहराचे धड नियोजन नाही. ‘आज पाणी येणार’ असा एसएमएस आला की, येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडतो. ही या शहराची अधोगती आहे. 

आदित्य ठाकरेंनीही त्यादिवशी नवेच काही तरी सांगावे म्हणून ‘को-गव्हर्नमेंट’चा जादूचा रुमाल फेकला. तो रंगीबेरंगी रुमाल पाहताच अनेकांच्या डोळ्यात मोरपंखी स्वप्ने उतरली. काहींना या ‘सीओजी’चे डोहाळे लागले. नेमका हा जादूचा रुमाल आहे काय, हे कळण्यापूर्वीच त्याचा गवगवा सुरू झाला. आता पुन्हा एकदा ‘या बाळांनो सारे या.’

-सुधीर महाजन

Web Title: Come on baby! A custom from two tapas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.