आम्ही ९१ हजार टन काॅफी दरवर्षी पित आहाेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:47 IST2025-08-10T10:46:54+5:302025-08-10T10:47:37+5:30

भारतात मध्यमवर्गाचं प्रमाण मोठं आहे आणि पैसे खर्च करण्याची त्यांची क्षमताही. कारण चहाच्या एका कपाच्या तुलनेत कॉफी नक्कीच महाग आहे. 

Coffee consumption in India has increased to 91000 tons in 2023 | आम्ही ९१ हजार टन काॅफी दरवर्षी पित आहाेत...

आम्ही ९१ हजार टन काॅफी दरवर्षी पित आहाेत...

श्रुति गणपत्ये 
मुक्त पत्रकार

कॉफी हे सत्य शोधणाऱ्यांचं पेय आहे. ती केवळ शरीरालाच नव्हे तर आत्म्यालाही जागं करते,’ असा एक वाक्प्रचार सुफी साहित्यामध्ये वापरला जातो. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात या ओळी कॉफीला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी एकदम चपखल आहेत. पारंपरिक चहा पिणाऱ्या भारताच्या शहरी भागांमध्ये साधारण २०१२ पासून कॉफीचा ट्रेंड वाढतो आहे. कॉफी बोर्ड ऑफ इंडियानुसार, २०१२ मध्ये ८४,००० टन कॉफी भारतात प्यायली जायची ती २०२३ मध्ये ९१,००० टनावर गेली आहे.

मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू वगैरे मोठ्या शहरांमध्ये अनेक ब्रँड्सचे कॅफे सुरू झाले आहेत. केसी, अल ब्यूनो, फ्रॅक्शन ९, कॉपी कोत्ताई, देवान्स, ७,००० स्टेप्स, ग्रेसोल असे फक्त रोस्टर वेगळेच आहेत. तिथली कॉफी ऑनलाइनच मिळते. या कॉफी पारंपरिक इन्स्टंट कॉफीसारख्या नाहीत की पाण्यात किंवा दुधात मिसळली आणि कॉफी तयार. कॉफी बनवण्याच्याही विविध पद्धती आहेत.

भारतात प्रसिद्ध असणारी फिल्टर कॉफीसुद्धा एका विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. मुळात कॉफीचा ट्रेंड भारतात सुरू होण्याचं कारण म्हणजे तरुणांमध्ये असलेला पाश्चिमात्य संस्कृती, सोशल मीडियाचा प्रभाव आणि मार्केटिंग. तसेच आजकाल सर्वच हेल्थ एक्सपर्ट ब्लॅक कॉफीचं महत्त्व सांगतात. त्यामुळे ब्लॅक कॉफीकडे वळणारे लोकही जास्त आहेत.

भारतात मध्यमवर्गाचं प्रमाण मोठं आहे आणि पैसे खर्च करण्याची त्यांची क्षमताही. कारण चहाच्या एका कपाच्या तुलनेत कॉफी नक्कीच महाग आहे. 

कॉफी पिणं हा झाला लाईफस्टाइलचा भाग

कॉफी बनवण्यासाठी विशिष्ट पद्धत असते, त्यासाठी फ्रेंच प्रेस, मेक्का पॉट अशी उपकरणं लागतात. अरेबिका किंवा रोबस्टा बियांवरूनही कॉफीची किंमत ठरते. त्या ठराविक तापमानावर भाजलेल्या लाइट, मिडियम किंवा डार्क रोस्ट, त्यांची पावडर बनवताना जाड, बारीक, एकदम बारीक या सर्वांवर कॉफीची चव ठरते. 
या बिया एकाच ठिकाणाहून म्हणजे सिंगल ऑरिजन आहेत की, ब्लेंड म्हणजे मिक्स केलेल्या आहेत यावरही त्याची चव आणि किंमत ठरते. म्हणजे पोअर ओव्हर ब्लॅक कॉफीसाठी मिडिअम रोस्ट आणि थोडी जाडसर कॉफी, मोक्का पॉटमध्ये प्रेशरने ब्रूइंग होते, त्यामुळे हलकं रोस्ट आणि एसप्रेसोपेक्षा जाडसर कॉफी, फ्रेंचप्रेससाठी जास्त जाडसर अशा पद्धती जगभर वापरतात.

मुळात कॉफीचं मार्केंटिंग करताना कॉफी हा एक अनुभव असल्याचं ग्राहकांच्या गळी उतरविण्यात आलंय. ती हळूहळू चव घेत पिणं, कॅफेटेरियामध्ये काम करता करता कॉफी पिणं हा आता ठराविक वर्गाच्या लाईफस्टाइलचा भाग झाला आहे. कॅफेटेरिया हे भेटण्याचे, रेंगाळण्याचे, गप्पा मारण्याचे अड्डे झालेत. वर्क फ्रॉम होमच्या कल्चरमध्ये तर कॅफेजची संकल्पना फिट्ट बसते. 

दोन कप कॉफी, एखादं सँडविच किंवा क्रॉसाँ मागवून दिवसभर काम करता येतं. कॉलेजच्या लायब्ररीपेक्षा जेनझीला कॅफेमध्ये बसून अभ्यास करणं जास्त “कूल” वाटतं. कॉफी शॉप निवडताना त्याचा ‘लूक’ आणि ‘ॲस्थेटिक्स’ पाहतात. साधारण ९ व्या शतकामध्ये मध्य आशियात शोध लागलेली कॉफी भारतात आता स्थिरावू पाहतेय. 
 

Web Title: Coffee consumption in India has increased to 91000 tons in 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत