चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:10 AM2023-11-06T09:10:26+5:302023-11-06T09:11:12+5:30

राष्ट्रीय महिला काँग्रेसमध्ये चीनने धोरणात्मक बदलाचे संकेत दिले आहेत. या देशाला आता स्त्रियांना घरात कोंडावेसे वाटू लागले आहे, कारण? - भीती!

china's president xi jinping says, ladies, just live the world, take care of the children! | चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

- सुवर्णा साधू
(चिनी समाजकारणाच्या अभ्यासक)

चीन एक कम्युनिस्ट राष्ट्र या देशाच्या विचारधारेत सगळे समान म्हणवले जातात; पण आजही चीनमधली स्त्री मात्र पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज आणि पितृसत्ताक चिनी संस्कृतीच्या दडपणाखाली दबलेली आहे. २३ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये सुरू झालेल्या १३व्या राष्ट्रीय महिला काँग्रेसमध्ये चीनने धोरणात्मक बदलाचे संकेत दिले आहेत. 

"स्त्रिया आणि खालच्या वर्गात जन्माला आलेल्यांच्या तोंडी लागू नये," हे कन्फुश्यसचे (इ.स.पू. ५४१-४७९) मत होते. याच काळात स्त्रियांच्या नैतिकतेवर भर देणारे साहित्य लिहिले गेले. स्त्रियांना कमी लेखणे, त्यांना पिता- पती मुलगा यांच्या आज्ञेत ठेवणे सुरू झाले. चीनमध्ये खरे तर यीन (स्त्री) शिवाय यांगला (पुरुष) महत्त्व नाही, असे सांगणारे चीन-यांग तत्त्वज्ञान फार जुने. तरीही कन्फुश्यसच्या विचारांचे पालन करताना स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा खाली करण्यात आला. 

चीनमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या या कन्फुशियनवादाचा पगडा नष्ट करणे हे माओच्या कम्युनिस्ट पक्षाचे सुरुवातीपासूनचे ध्येय होते. केवळ उच्च वर्गाला धार्जिणा हा विचार, निम्न वर्गातील लोकांसाठी आणि प्रामुख्याने स्त्रियांसाठी जुलमी होता. १९४९ साली कम्युनिस्ट पक्षाचे राज्य स्थापन झाल्यावर, "स्त्रियांनी अर्धे आकाश पेलून धरले आहे," अशी प्रसिद्ध घोषणा माओंनी केली होती. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान हक्क मिळायला हवेत, असे प्रतिपादन त्यांनी केले, पण आज तोच कम्युनिस्ट पक्ष अनेक युगे मागे जाऊन कन्फ्युशियसचे जुने विचार अंमलात आणू पाहतो आहे.

पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील समानता हे चिनी सरकारचे मूलभूत राष्ट्रीय धोरण आहे, यापैकी एक अवाक्षरही न काढता, चिनी पॉलिटब्युरो स्थायी समितीचे सदस्य, लिंग श्वे शियांग यांनी दर पाच वर्षांनी भरणाऱ्या महिला कॉंग्रेसला संबोधित केले. अचानक हे धोरण कसे काय बदलले? कायदेशीर हक्क, आर्थिक संधींमध्ये लैंगिक समानता सुनिश्चित करणारी कम्युनिस्ट पक्षाची भाषा अचानक लुप्त झाली आणि चिनी महिलांनी ' शी जिनपिंग यांच्या सांस्कृतिक विचारांचा अभ्यास आणि अंमलबजावणी केली पाहिजे' आणि 'लग्न आणि प्रेम बाळंतपण आणि कुटुंब याबद्दल योग्य दृष्टिकोन स्थापित केला पाहिजे' हा विचार पुढे येऊ लागला आहे.

एकच मूल हे धोरण चीनने बदलून आज ५-६ वर्षे उलटून गेली, तरी चीनमधला जन्मदर उतरणीलाच आहे. मृत्युदरही कमी झाला आहे. करिअर आणि आर्थिक प्रगतीच्या मागे लागलेल्या तरुणांना, लग्न मूल या जबाबदाऱ्या नकोशा झाल्या आहेत, पण त्यामुळे देशातील वृद्धांची संख्या वाढते आहे, तरुणांची संख्या तेवढीच आहे आणि मुलांची संख्या कमी होते आहे. तरुणपिढी लवकरच वृद्धत्वाकडे झुकेल. मग काम करणारे तरुण येणार कुठून? 

प्रत्येक क्षेत्रात प्रगती करणार हा देश, स्त्रियांच्या बाबतीतले आपले विचार बदलतो आहे. पारंपरिक रूढींचा पगडा, चीनच्या जनमानसात आजही मोठ्या प्रमाणत दिसून येतो. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली तर तो अधिक खोलवर रुजत चालला आहे. उच्च राजकीय नेतृत्व केवळ पुरुषांसाठी महिला तिथपर्यंत आल्या, तर पुरुषसत्ता धोक्यात येईल ही भीती शेवटी अपेक्षा हीच स्त्रियांनी लग्न करावे, मुलेबाळे सांभाळावीत आणि एकूणच घराला बांधिल राहावे. यापूर्वी अनेकदा शी यांनी महिलांच्या योगदानाची प्रशंसा केली होती, परंतु आज मात्र, मंदावलेली अर्थव्यवस्था, स्त्रीवादाचा उदय, यासाठी पक्षाने महिलांना पुन्हा एकदा घराच्या चौकटीत कैद करण्याचे निवडले आहे. शी यांच्या शब्दात, 'चीनच्या आधुनिकीकरणाच्या मार्गासाठी, सामाजिक रूढींचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.

केवळ एवढ्यावरच पक्ष आणि नेते थांबतात असे नाही, तर लैंगिक छळ, घरगुती हिंसा, भेदभाव, याकडे दुर्लक्ष करतात. सोशल मीडियावर याबाबतीत होणाऱ्या चर्चेला वेळीच बंद करण्यात येते. २०१८ साली चीनमध्ये सुरू झालेली #MeToo चळवळ मोडून काढण्यात आली. राष्ट्रीय महिला कॉंग्रेसच्या सत्रात महिलांच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातील, ही चर्चा सुरू असतानाच, कम्युनिस्ट पक्षाने उलटाच निर्णय घेतला. हाच तो कान्फुशियन विचार, ज्याच्या विरोधात माओ आणि त्यांच्या फौजेने एके काळी लढा दिला होता. या निर्णयाचा विशेषतः तरुण महिलावर्गात काय परिणाम होतो आणि शी जिनपिंग यांची प्रतिमा काय तयार होते, हे काळच सांगेल. मात्र, 'अर्धे आकाश पेलण्याआधी' चिनी महिलांना खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, हे नक्की.

Web Title: china's president xi jinping says, ladies, just live the world, take care of the children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.