नववर्षात सर्व इच्छा एकदिलाने पूर्ण करू!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 06:09 AM2019-12-30T06:09:38+5:302019-12-30T06:11:05+5:30

देश सुखी व्हावा, शेती बहरावी, मुलांना शिक्षण व हाताला काम मिळावे

Challenges before india in the year 2020 | नववर्षात सर्व इच्छा एकदिलाने पूर्ण करू!

नववर्षात सर्व इच्छा एकदिलाने पूर्ण करू!

Next

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

खरे तर निसर्गाने काळाचे विभाजन दिवस आणि रात्रीत केलेले आहे! रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होणे हा निसर्गनियम आहे, परंतु माणसाने आपल्या सोयीसाठी काळाचे सेकंद, मिनीट, तास, चोवीस तास, आठवडा, महिना आणि वर्ष असे खंड पाडून घेतले! हा हिशेब अचूक व्हावा, यासाठी दर चौथे वर्ष ‘लीप ईअर’ मानायचे ठरले आणि त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यास २९वा जास्तीचा दिवस दिला गेला. तरीही काळाचा महिमा असा की ‘लीप सेकंद’ जुळवून घेण्याचीही गरज पडते. म्हणूनच २०२० या नव्या वर्षाची खासियत अशी असेल की, पृथ्वीची परिवलन गती आणि आपली घड्याळे यांचा ताळमेळ बसावा, यासाठी ३० जूनच्या आसपास जगभरातील घड्याळे एक सेकंद पुढे करून ‘अ‍ॅडजेस्ट’ करावी लागतील.

वर्ष २०१९ काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या वर्षाच्या गेल्या ५१ आठवड्यांत या स्तंभातून ताज्या प्रासंगिक विषयांवर मी माझी मते तुमच्यापुढे मांडत आलो. या वर्षातील हा ५२वा स्तंभ आहे. एक पत्रकार या नात्याने सामान्य माणसाची नस मला ओळखता येत असल्याने, या स्तंभातून मांडलेली माझी मते ही नक्कीच तुमचीही मते असणार याची मला खात्री आहे. या स्तंभासाठी कोणता विषय घ्यावा, यासाठी येणारे ई-मेल व पत्रे यावरून तुमची आत्मीयता दिसून येते. आपल्या सर्वांच्या इच्छा-आकांक्षा एकसारख्याच तर आहेत! आपला देश स्वस्थ, सुखी व खूश असावा, हिच तर आपली इच्छा आहे.

आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकतात. कारण प्रत्येक भारतीयात तशी क्षमता आहे! शतकानुशतके आक्रमणे सोसूनही आपल्या देशाने वेगळेपण टिकवून ठेवले, हिच तर खरी आपल्या अपार क्षमतांची खरी ओळख. मग प्रश्न असा पडतो की, आपण कमी कुठे पडतो? मला हा प्रश्न नेहमीच सलत असतो व देश-विदेशात फिरताना मी याचे उत्तर शोधण्यासाठी तुलनात्मक अभ्यासही करत असतो. युरोपात गावोगावी सुंदर उद्याने आहेत. गुळगुळीत सपाट रस्ते आहेत व आखीव-रेखीव फूटपाथ आहेत. लोक वाहनांचे पार्किंगही ठरलेल्या जागी न चुकता करताना दिसले. मग आपल्याला हे का जमू नये, असा मला प्रश्न पडतो. आपल्याकडे गावातील तर सोडाच, पण मोठ्या शहरांमध्येही वाहतुकीच्या बेशिस्तीने लोक त्रस्त आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन न करण्याचे आपण सर्वांनी मनापासून ठरविले, तर हे चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही. आपण जनआंदोलन हाती घेतले, तर आपल्या नद्यांचे पुनरुज्जीवन नक्कीच होईल. या सर्व गोष्टी यशस्वीपणे केल्याची असंख्य उदाहरणे आपल्या देशात आहेत. तेव्हा नव्या वर्षात संकल्प करा की, पाण्याची नासाडी करणार नाही व जलस्रोतांचे संवर्धन करीन.



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण करीत आपण त्यांची १५0 वी जयंती साजरी करीत आहोत. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की, बापूजींची दक्षिण आफ्रिका येथील क्रांतिभूमी, डरबन येथील गांधी स्मारक आणि जेथे त्यांनी वकिलीची सुरुवात केली त्या जोहान्सबर्ग येथील त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली. जोहान्सबर्गमधील गांधी स्क्वेअर येथे गांधीजींचा असा पुतळा पाहावयास मिळतो की जो आजवर इतरत्र कोठे पाहावयास मिळाला नाही. त्यांच्या युवावस्थेतील बॅरिस्टरच्या रूपातील हा पुतळा आहे. बापूजींची ही क्रांतिभूमी आणि सुरुवातीच्या कर्मभूमीवर वारंवार हा सवाल माझ्या मनात येत राहिला की, बापूजींच्या स्वप्नातील भारत आपण केव्हा बनवू शकू? ...तर या वर्षी आपण सर्व संकल्प करूया की सत्य, अहिंसा आणि विनयशीलतेच्या अधिष्ठानावर असा भारत निर्माण करू, जो जाती आणि सर्वधर्मांच्या विचारांच्या वर असेल आणि जेथे केवळ मानवतेचेच महत्त्व असेल.



भारत हा कृषिप्रधान देश आहे व सुमारे ७० टक्के लोकांचा चरितार्थ प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे, पण आपल्या खेड्यांची अवस्था काय आहे? युरोपमधील गावांच्या तुलनेत आपण कुठे बसतो? शेतकऱ्यांची खुशाली तर दूरच राहिली, त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीही आपण फारसे काही करू शकलेलो नाही. त्यामुळे दुसरा संकल्प जरूर करा की, शेतकऱ्यांसाठी काय करताय, याचा जाब आपल्या लोकप्रतिनिधींना विचारीन.



नव्या वर्षाकडून अपेक्षा करू या की, पाऊसपाणी वेळेवर होईल आणि शेतीचे भरघोस पीक येऊन शेतकºयांच्या जीवनात सुख येवो. नव्या वर्षात, वाहतुकीचे साधन नाही, म्हणून कोणालाही आपल्या पत्नीचे शव इस्पितळातून खांद्यावरून गावी न्यावे लागणार नाही, अशीही अपेक्षा ठेवू या! आपल्या आरोग्य केंद्रांचे आरोग्य सुधारावे, सर्व मुलांनी शाळेत जावे व कॉन्व्हेंटला मागे टाकतील, एवढ्या सरकारी शाळा चांगल्या व्हाव्यात, अशीही अपेक्षा आपण करू या. देशाची आर्थिक भरभराट होवो, उद्योग-धंदे उत्तम चालावेत आणि प्रत्येक हाताला काम मिळेल, हे स्वप्नही आपण नव्या वर्षात उराशी वाळगू या. ज्याने जीवन समृद्ध होईल, अशा इच्छा मना ठेवा आणि सर्वांनी त्यासाठी एकदिलाने कामाला लागा!
संपूर्ण ‘लोकमत’ परिवारातर्फे वर्ष २०२०साठी मनापासून भरपूर शुभेच्छा. खुश राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा!

Web Title: Challenges before india in the year 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.