इम्रान : आव्हाने व आशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:27 IST2018-08-22T06:26:03+5:302018-08-22T06:27:48+5:30
पाकिस्तान हा देश अस्तित्वात आल्यापासूनच त्याच्या राजकारणाची सूत्रे लष्कराने आपल्या हाती ठेवली आहेत.

इम्रान : आव्हाने व आशा
पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान या एकेकाळच्या क्रिकेटवीराने परवा शपथ घेतली. मात्र ‘आपली क्रिकेटपटू ही ओळख जेवढी विदेशात आहे तेवढी ती माझ्या देशात नाही. येथे मी राजकीय पुढारी म्हणूचच पाहिला आणि ओळखला जातो’ असे आपल्या आत्मचरित्रात लिहिणाऱ्या या नेत्याबाबत आपण फारसे आशावादी असण्याचे कारण नाही. मैदानावर वावरणाºया बहुतेक साºया खेळाडूंचे खिलाडूपण ते राजकारणात उतरले की संपत असते. एकेकाळची आपली खिलाडू वृत्ती दाखवलेले असे अनेक नमुने भारताच्या राजकारणातही आहेत. मुळात इम्रान खानच्या पाठीशी पूर्ण बहुमत नाही आणि ते असले तरी त्याच्या मानगुटीवर असलेली लष्कराची पकड कायमच राहिली असती. पाकिस्तान हा देश अस्तित्वात आल्यापासूनच त्याच्या राजकारणाची सूत्रे लष्कराने आपल्या हाती ठेवली आहेत. त्या देशाचे तीन सेनाप्रमुखच पुढे त्याचे अध्यक्ष झालेले जगाने पाहिले आहेत. झिया उल हक या त्यातल्या एका प्रमुखाने तर त्याचे पूर्व पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावरच चढविले. इम्रान खान यांच्या निवडीच्या पाठीशी तेथील लष्कराचा सहभाग मोठा राहिला आहे. त्याचमुळे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरचे त्यांचे भाषण व त्यांनी पत्रकारांना दिलेली उत्तरे यात कोणतेही नवेपण नव्हते. भारताबाबत बोलताना त्यात उत्साह नव्हता आणि काश्मीरबाबतची त्यांची भूमिकाही जुनीच व भारतविरोधी होती. आरंभापासूनच पाकिस्तानचे परराष्टÑीय धोरण भारताच्या द्वेषावर उभे आहे आणि त्याच्या अंतर्गत राजकारणातही भारताविषयीचा विखारच सदैव आढळला आहे. वैर आणि शत्रुत्व यांच्या याच बळावर त्या देशाच्या अर्थकारणाचा मोठा भाग स्वत:कडे ओढून घेण्याचे तेथील लष्कराचे तंत्र त्याच्या राजकारणावरील ताबाही कायम राखू शकले आहे. त्यासाठी त्या देशाने चीनशी केवळ स्नेहाचेच संबंध राखले असे नाही तर त्या देशाला आपला प्रदेशही त्याच्या औद्योगिक कॉरिडॉरसाठी त्याने उपलब्ध करून दिला आहे. परिणामी त्या देशाचा कोणताही राजकीय नेता या आखीव चौकटीबाहेर आजवर जाऊ शकला नाही आणि इम्रान खान या त्याच्या नव्या नेत्यालाही ती चौकट ओलांडता येणार नाही. त्यामुळे भारतातील काही क्रिकेटपटूंना त्याच्या निवडीचा आनंद झाला असला तरी त्याचा राजकीय संदर्भात अर्थ लावण्याचे कारण नाही. देशातील दहशतवाद संपविण्याची व त्यात लोकशाही परंपरा रुजविण्याची भाषा इम्रान खान यांनी केली आहे. त्यानंतर टिष्ट्वटरवर दिलेल्या एका अभिप्रायात त्यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात संवाद सुरू राहण्याची गरज व्यक्त केली आहे. पाकिस्तान हा दहशतवादाला आश्रय देणाराच नव्हे तर त्याला खतपाणी घालणारा देश असल्याचे संयुक्त राष्टÑसंघाने आजवर अनेकदा बजावले आहे. त्या ठिकाणी दहशतवादाला कधी साहाय्य तर कधी त्याच्याशी लुटूपुटूची लढत करण्याचे कसब तेथील लष्करशहांनी आता चांगले आत्मसात केले आहे. त्यातील किती अधिकारी त्या दहशतखोर संघटनांशी आतून जुळले आहेत याची पुरेशी कल्पना तेथील राजकीय नेत्यांनाही अजून आलेली नाही. त्यामुळे दहशतवाद संपवायचा तर इम्रान खान यांना प्रथम तेथील लष्करावरच आपली हुकूमत बसवावी लागेल आणि लोकशाही रुजवायची तर पाकिस्तानातील एकधर्मीय सत्ता सर्वधर्मसमभावी बनवावी लागेल. तेथील बलाढ्य लष्करशहा त्यांची हुकूमत ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे इम्रान खान यांच्यासमोरील ही दोन्ही आव्हाने मोठी आहेत. धर्माचे नाव पुढे करून जो देश जन्माला आला त्याला ही शिकवण पचवणे एवढ्यात जमणारही नाही. जो नेता भारताविरुद्ध अधिकात अधिक आक्रस्ताळी भूमिका घेईल त्याला त्या देशात लोकप्रियता लाभते हे राजकीय वास्तव नव्या नेतृत्वालाही नजरेआड करता येणार नाही. तसे करणे त्याला जमले तर ते त्याचे खरे मोठेपण ठरेल आणि त्यामुळे त्या देशाचे व तेथील जनतेचेही कल्याण होईल. आपल्या टिष्ट्वटरवर व्यक्त केलेल्या एका अभिप्रायात इम्रान खान यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात संवाद सुरू राखण्याचा व्यक्त केलेला क्षीण आशावाद हाच तेवढा आशेचा किरण आहे.