अवघे राजकारण आणि समाजकारण जातीभोवती केंद्रिभूत झाले असताना, अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या गावाची प्रकर्षाने आठवण झाली. महाराष्ट्रातल्या तमाम गावांसारखं वळचणीला पडलेले गाव काही वर्षांपूर्वी एका बातमीने प्रकाशझोतात आले. या गावात जात नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. प्रत्येक रहिवाशाच्या जातीच्या रकाण्यापुढे ‘अजात’ अशी नोंद केलेली, असे वेगळेपण जपणारे हे आगळेवेगळे गाव देशातील एकमेव असावे. आता झेंडे, रंग, मोर्चे, आघाड्या, पुतळे अशा जातीपातीच्या राजकारणात हे वेगळेपण किती टिकवून ठेवले असावे, असा हा प्रश्न आहे.राजकारणात प्रभावी घटक असणारी जात कितीही झटकण्याचा प्रयत्न केला, तरी ती पुन्हा दुप्पट वेगाने तुम्हाला चिकटतेच. ईश्वरानंतरच सर्वव्यापी ठरलेल्या जातीच्या इतिहासाचा धांडोळा घेतला, तर पार बुद्धकाळापर्यंत पायपीट करावी लागते. कारण वर्णसंस्थेच्या समाज बांधणीचे काम बुद्ध काळापर्यंत संपले होते. आपल्या कौशल्यानुसार वर्णाश्रम स्थिर झाला आणि तेच उपजीविकेचे साधन बनल्याने, तो पिढीजात व्यवसाय बनल्याने जात हा घटक उदयाला आला आणि कालौघात जातीची उतरंड निर्माण होत भक्कम बनत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जातीच्या उतरंडीला जिना नसलेला मनोरा म्हणत असत.राजकारणात जात हा महत्त्वाचा घटक बनण्याची प्रक्रिया स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाली. सत्ता या घटकाचे आकलन झाल्यानंतर ती टिकविण्यासाठी ज्या काही लांड्या-लबाड्यांना प्रारंभ झाला, त्यातून जात ही बलवान बनत गेली. त्यामुळे आज जातीच्या आधारावर मत बँका बनविणे त्याच आधारावर उमेदवार ठरविताना कोणत्याही राजकीय पक्षाला विधिनिषेध वाटत नाही. किंबहुना, जात या एकाच आधारावर निवडणुकीचे राजकारण ठरते. पूर्वी जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा होता; पण आता तो दुय्यम ठरला आहे. ही स्थिती केवळ राजकारणापुरतीच मर्यादित नाही, तर समाजकारण, अर्थकारणही तिने व्यापले आहे. प्रत्येक जातीने आपली संस्कृती निश्चित केली.
राजकारणाची जात अन् जातीचं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:06 IST