धुरक्यात लपलेला राक्षस ‘ओळखता’ येऊ शकेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:02 IST2025-12-29T09:01:25+5:302025-12-29T09:02:15+5:30
विविध शहरांमध्ये श्वसनविकारासाठी लागणाऱ्या औषधांची मागणी केव्हा, किती वाढते या निकषाचा वापर करून वाढती प्रदूषण पातळी मोजता येईल का?

धुरक्यात लपलेला राक्षस ‘ओळखता’ येऊ शकेल?
डॉ. रीतू परचुरे, ‘प्रयास आरोग्य गट’, पुणे -
डॉ. विनय कुलकर्णी, ‘प्रयास आरोग्य गट’, पुणे -
दिल्लीत हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या धुक्याचं धूरकं होतं. डोळ्यासमोरचं दिसेनासं होतं, तेव्हाच आपले डोळे उघडतात आणि मग प्रदूषण या विषयावरच्या चर्चांना उधाण येतं. यावर्षीही ते घडलं. गेले दोन महिने दिल्लीतली प्रदूषणाची पातळी सातत्याने अति-खराब सदरात राहिली. अनेकांना सर्दी, खोकला, दमा अशा आजाराने सतावले. देशाच्या राजधानीतून येणाऱ्या बातम्या वाचून किंवा ऐकून असा समज होऊ शकतो की, प्रदूषण जेव्हा इतकं जास्त होतं तेव्हाच हे आजार होतात. पण, हा गैरसमज आहे.
हवा प्रदूषणाची कुठली पातळी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित याचे भारत सरकारने ठरवलेले काही मापदंड किंवा निकष आहेत. अगदी लहान आकाराच्या प्रदूषक कणांची (ज्याला pm2.5 असं म्हटलं जातं) वार्षिक सरासरी पातळी ४० µg/m³ च्या खाली असेल, तर ती भारतीय मापदंडानुसार सुरक्षित मानली जाते. सुरक्षित पातळी ओलांडायच्या टप्प्यापासूनच आजारांचा धोका झपाट्याने वाढायला लागतो. प्रदूषणाने अति-खराब पातळी गाठायच्या आधीच्या टप्प्यांवरही आजारांचा धोका लक्षणीय प्रमाणात असतो.
यातले बरेच आजार गंभीर स्वरूपाचे असतात. फुफ्फुस, हृदय, मेंदू, किडनी अशा विविध अवयव संस्थांना हानी पोहचल्यामुळे हे आजार होतात. भारतातल्या दर ५ शहरांपैकी २ शहरांमध्ये वार्षिक सरासरी प्रदूषण सुरक्षित पातळीच्या पुढे असतं. दिल्लीची वार्षिक सरासरी १०० च्या आसपास, तर हिवाळ्यातली सरासरी १५० च्या आसपास असते. याचाच अर्थ प्रदूषणाचा प्रश्न फक्त हिवाळ्यापुरता आणि दिल्लीपुरता मर्यादित नाही. पण, समाज माध्यमातली चर्चा मात्र दिल्लीतल्या हिवाळ्यात दिसणाऱ्या टोकाच्या आकड्यांवर केंद्रित असते.
ज्या-ज्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी सुरक्षित रेषेच्या पुढे जाते, त्या-त्या ठिकाणी प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण किती आहे, याचा अंदाज येण्यासाठी आरोग्य विभागाने एक सर्वेक्षण कार्यक्रम (ARI surveillance) सुरू केला आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही नोंदी ठेवल्या जातात (उदाहरणार्थ श्वसन मार्गाच्या विकारावर उपचार घेण्यासाठी एकूण किती रुग्ण आले). या सर्वेक्षणाची व्याप्ती आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबींवर अधिक काम करण्याची गरज आहे.
हे कसं करता येईल हे समजून घेण्यासाठी ‘प्रयास’ आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यातर्फे पुण्यात एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात शहरातली प्रदूषणाची पातळी आणि हॉस्पिटलमध्ये विकली गेलेली दम्यासाठी वापरली जाणारी नेब्युलायझरमध्ये घालावयाची औषधे यांचा परस्पर संबंध तपासला गेला. यात असं दिसलं की वाढत्या प्रदूषण पातळीच्या बरोबरीने औषधांच्या विक्रीमध्ये वाढ होते. हा अभ्यास असं सुचवतो की नेब्युलायझरमध्ये वापरल्या गेलेल्या औषधांच्या विक्रीचा डेटा ARI सर्वेक्षणासाठी उपयुक्त असू शकतो. अशा औषधांच्या नोंदी अधिक सुलभपणे मिळू शकतात आणि त्याचे संकलन कमी वेळात आणि कमी कष्टात होऊ शकतं. अधिक व्यापक पातळीवर हे निष्कर्ष तपासून पाहायला हवेत.
विविध शहरांमध्ये श्वसन विकारासाठी लागणाऱ्या औषधांची मागणी किती असू शकते, याचा अधिक ठोस अंदाज आरोग्य सर्वेक्षणामुळे येऊ शकतो. ही माहिती संकलित झाल्याचा फायदा प्रदूषण कमी करण्याच्या एकंदर प्रयत्नांनाही होतो. एखादा मृत्यू / आजार प्रदूषणामुळे झाला असं निदान रुग्ण पातळीवर तरी करता येत नाही. पण जेव्हा अनेक लोकांची माहिती एकत्र संकलित करून अभ्यासली जाते तेव्हा आजारी किंवा मृत्युमुखी पडण्यामागे प्रदूषण किती प्रमाणात कारणीभूत आहे हे सांगता येऊ शकतं.
हवा प्रदूषणाला ‘सायलेंट किलर’ असं संबोधलं जातं. जो शत्रू सहजी दिसत नाही किंवा जाणवत नाही त्याच्याबद्दल आपण गाफील राहण्याची शक्यता खूपच असते. प्रदूषणाच्या बाबतीत नेमकं हेच घडतं. आपण जिथे राहतो त्या ठिकाणची हवा किती प्रदूषित आहे हे समजून घेण्यासाठी प्रदूषणाची कमाल पातळी हे योग्य परिमाण नाही. प्रदूषणाने सुरक्षित पातळी ओलांडली असे किती दिवस होते, त्या ठिकाणचे प्रदूषणाचे मुख्य स्रोत कुठले, आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाण किती, ही परिमाणं जास्त आवश्यक आहेत. याबद्दल विचारलेले प्रश्न, या मुद्द्यांशी जोडून झालेली चर्चा आपल्याला शाश्वत उत्तरांपर्यंत पोचवू शकेल.
( विषेश सहभाग : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे)
ritu@prayaspune.org,
vinay@prayaspune.org