यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत -
दर साडेबारा मैलांवर भाषा बदलते तशी राजकारणात दर आठ वर्षांनी पिढी बदलते. २०१७ मध्ये महापालिकेचे राजकारण केलेली पिढी आणि २०२५ मधली पिढी एकाचवेळी तिकिटांची दावेदार आहे आणि त्यातून हाणामारी सुरू आहे. गेली २५ वर्षे भाजपमध्ये काम करणारे कार्यकर्ते आता साठीच्या घरात आहेत आणि जे काही आहे ते याच निवडणुकीत मिळू शकते, पुढे एकदा साठीपार गेलो की आपल्याला कोणी विचारणार नाही, अशी त्यांची भावना आहे. त्याचवेळी वयाच्या वीस-बाविशीत काम सुरू करून आता वयाच्या पस्तिशीत असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना स्वत:कडे सत्ता हवी आहे. ही पिढी दहा-पंधरा वर्षांपूर्वी भाजपमध्ये आली तेव्हापासून तिने सत्ता जवळून पाहिली आहे, सत्तेची सुंदरी त्यांना मोहवते आणि त्यातूनच त्यांच्यात महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. आठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने दोन पिढ्यांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष दिसत आहे. ‘आपण किती दिवस नुसत्या सतरंज्या उचलायच्या?’ हा प्रश्न दोघांनाही सतावतो आहे. महापालिकेतील अर्थकारण अनेकांना खुणावत आहे. ‘माल फक्त नेत्यांनीच कमवायचा का’, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, ते केवळ ४५ वर्षांचे आहेत. आमदार, मंत्री, खासदारांच्या मुलामुलींना तिकिट देऊ नका हा आदेश त्यांचा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी तो कळविला अन् त्यातून आमदारांची बरीच मुले घरी बसली. नबीन यांच्या आदेशामुळे घराणेशाहीला पूर्णपणे चाप लागला असे नाही; पण त्याची सुरुवात नक्कीच झाली आहे. आधीपासून महापालिकेच्या राजकारणात आहेत किंवा ज्यांना शब्द देऊन आपल्या पक्षात आणले आहे, (जसे आ. बापू पठारेंचा मुलगा) अशांना यावेळी तिकिटे मिळाली; पण काँग्रेसच्या घराणेशाहीवर सडकून टीका करणाऱ्या भाजपमध्येच घराणेशाही जोपासली जाते या आरोपांतून पक्षाला मुक्त करण्याचा नितीन नबीन यांचा विचार दिसतो. या विचाराची पहिली झळ महाराष्ट्रातील भाजपच्या डझनभर नेत्यांना बसली आहे.
नव्या पिढीचे नितीन नबीन हे तिशी-चाळिशीतील चेहऱ्यांना पक्षात समोर आणतील, अशी भीती अनेकांच्या मनात दाटली आहे... तरुण अध्यक्षांनी सगळीकडे तरुणांना बसवायचे ठरविले तर आपल्याला घरी बसावे लागेल, असे साठीतील पिढीला वाटते आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, भाजपमध्ये महापालिकेतच नाही तर सर्वदूर भाकरी फिरवायची वेळ आल्याचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह तसेच रा. स्व. संघालाही वाटते आणि त्यातूनच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ‘नबीन’ प्रयोग केला गेला असाही एक तर्क दिला जात आहे.
एक इच्छुक उमेदवार महिला एका ज्येष्ठ नेत्याला जाहीर शिवीगाळ करते, तिकीट कापलेले अनेकजण जाहीरपणे वरिष्ठ नेत्यांचा उद्धार करतात, त्यांच्या गाड्या फोडतात, बी फॉर्म पळवतात, हे सगळे भाजपमध्ये घडावे याचे आश्चर्यच. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही काँग्रेसची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीनेच काँग्रेसला उतरती कळा लागली. आज यशाच्या शिखरावर भाजप आहे; त्यावेळी काँग्रेस होती; पण आपसातील भांडणे, हेवेदाव्यांनी काँग्रेसचे झालेले नुकसान भाजपला कधी चिकटेल ते सांगता येत नाही. नेत्यांचा धाक उरला नाही, हे वास्तव आहे.
बाहेरच्यांचे लाड अन्...जे कालपरवा भाजपमध्ये आले त्यांना तिकिटे देतात आणि आमच्यासारख्या निष्ठावंतांना नाही’, हा एक खूप मोठा रोष आहे. पक्ष मोठा करण्याच्या नादात अनेकांना बाहेरून आणले, पण हीच बाहेरची माणसे पक्षनिष्ठांच्या असंतोषाचे कारण ठरत असल्याने त्रांगडे झाले आहे. इतर पक्षांतून आलेली माणसे पैशापाण्याने गब्बर आहेत, दबंग आहेत. भाजपचा सतरंजी कार्यकर्ता त्यांच्यासमोर चमकधमकमध्ये अगदीच कमी पडतो.
पूर्वी भाजपचे बडे नेते हे आपली माणसे आणायची म्हणून ‘नालायकांनाही तिकिटे द्या’ असे करत नव्हते. आता मात्र हा प्रकार वाढला आहे. प्रत्येक बड्या नेत्याला संघटन नाही तर आपला संप्रदाय वाढवायचा आहे. आपली जात जोपासायची आहे. त्यातून जो आपला नाही त्यांची कत्तल सुरू आहे. उमेदवार घडवणे नाही तर ठरवणे सुरू आहे. आपण आपले दुकान चालवायचे, पक्षाचे काही बिघडले तर फडणवीस पाहून घेतील ही प्रवृत्ती बळावली आहे. धक्कादायक माहिती अशी की, आपल्या माणसांना उमेदवारी मिळावी म्हणून काही सर्व्हे मॅनेज करण्यात आले. मॅनेज केलेल्या या सर्व्हेंच्या आधारे तिकिटे देण्यात आली. पुणे, नागपूर आणि नाशिक हे या सर्व्हेंचे केंद्रबिंदू होते म्हणतात.
भाजप आज यशाच्या शिखरावर आहे, पण शिस्त तळाला जाताना दिसत आहे. काँग्रेस चुकली तिथे भाजप हसत हसत पोहोचत आहे. सत्ता टिकते; पण पक्षाची संस्कृती ढासळली की पक्ष टिकेलच की नाही, याची खात्री देता येत नाही.yadu.joshi@lokmat.com
Web Summary : BJP's success masks internal strife. Generational clashes over power, prioritizing personal gains over party values, and manipulated surveys plague the party. Discipline erodes, mirroring Congress's decline. The party risks its culture and future.
Web Summary : भाजपा की सफलता आंतरिक कलह को छुपाती है। सत्ता के लिए पीढ़ीगत टकराव, पार्टी मूल्यों पर व्यक्तिगत लाभ को प्राथमिकता, और हेरफेर किए गए सर्वेक्षण पार्टी को त्रस्त कर रहे हैं। अनुशासन का क्षरण, कांग्रेस के पतन को दर्शाता है। पार्टी अपनी संस्कृति और भविष्य को खतरे में डालती है।