कुबड्या नकोत; पण, तीच तर मजबुरी!
By यदू जोशी | Updated: October 31, 2025 09:06 IST2025-10-31T09:06:23+5:302025-10-31T09:06:23+5:30
स्वबळाची प्रचंड इच्छा असलेल्या भाजपसाठी केंद्रातील सरकारच्या संख्याबळाचा विचार करता मित्रांना घेऊन चालणे ही मजबुरी आहे.

कुबड्या नकोत; पण, तीच तर मजबुरी!
यदु जोशी
राजकीय संपादक, लोकमत
भाजपच्या आलिशान प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन करायला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. ५५ हजार चौरस फूट विस्तार असलेले देशातील सर्वात श्रीमंत पक्षाचे, देशातील सर्वांत श्रीमंत राज्यात आणि देशातील सर्वात श्रीमंत भागात (चर्चगेट) होत असलेले हे कार्यालय. भाजप है तो मुमकीन है.. एखाद्या माणसाने गरिबीवर मात केली तर आपण त्याचे काय कौतुक करतो; मग, एखादा पक्षही श्रीमंत झाला तर काय चुकले? भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एवढे मोठे कार्यालय उभारायचे तर पैसा लागेल,' असे म्हणत 'प्रत्येकाने समर्पण निधी द्यावा,' असे आवाहन पक्षजनांना केले. त्याला लगेच प्रतिसाद मिळत भरभरून पैसा येईल.
हाच तर फरक आहे भाजप अन् काँग्रेसमध्ये. काँग्रेसचे नेते श्रीमंत झाले, पक्ष गरीब झाला. भाजपमध्ये नेते, कार्यकर्त्यांना दररोज सकाळ-संध्याकाळ पक्षासाठी उत्तरदायी करणारी यंत्रणा कार्यरत आहे. आपण पक्षापेक्षा मोठे नाही ही जाणीव बाळगावीच लागते. एखाददुसरा जाणीव विसरलाच तर त्याला फटका मारून ताळ्यावर आणणारेही बसले आहेत. कोणालाही मन मानेल तशी 'मुरली' वाजवता येत नाही अन् वाजवली तरी वरच्या दरबारात गुण खाडकन कमी होतात. आज लगेच जाणवणार नाही; पण, 'रेटिंग सिस्टिम' सुरूच राहते.
काँग्रेसमध्ये असे काही नाही. पक्षासाठी काहीच केले नाही तरी पदे मिळू शकतात. स्वतःच्या संस्था सांभाळून वेळ उरलाच तर पक्षाच्या एखाद्या कार्यक्रमात झळकायचे; एवढाच काय तो अनेकांचा काँग्रेसशी संबंध उरला आहे. एवढ्या पडझडीतही हर्षवर्धन सपकाळांचा आत्मविश्वास मानला पाहिजे. ते स्वबळाची भाषा करीत आहेत. राज यांचे बोट धरून उद्धव ठाकरे मविआतून निघून गेले तर सपकाळ यांना ते हवेच आहे. हा माणूस एक तर काँग्रेसला वर आणेल किंवा एकदम खाली नेईल, मधले काही होणार नाही. वर आणले तर अधिक बरे, कारण, काँग्रेसची दुरवस्था पाहवत नाही. आपल्याच लोकांनी मारून घायाळ केलेला असा दुसरा पक्ष नाही. भाजपला सत्तेत येण्यासाठी प्रभूरामाचा फायदा झाला; पण, खरी रामभरोसे पार्टी काँग्रेस आहे. सपकाळ मोठी मजल मारू पाहत आहेत, हातपाय बांधलेल्या काँग्रेसला ऑलिम्पिकमध्ये धावायला नेत आहेत; पण, स्वबळ काँग्रेसला पूर्णपणे परवडणारे नाही. शरद पवार आणि अन्य काही पक्षांची मदत ही घ्यावीच लागेल, कारण, सपकाळ यांची इच्छा आणि वास्तव यात फरक आहे. उद्धव ठाकरेंना तोडणेही तेवढे सोपे नाही; कारण, मुस्लीम मतबँकेत त्यांना सहानुभूती आहे.
महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष वेगवेगळ्या संदर्भात स्वबळाकडे जाऊ पाहत आहेत. शक्तिहीन झालेल्या काँग्रेसलाही मित्रांचे बळ नको आहे आणि भाजपलादेखील हळूहळू मित्रपक्षांवरील अवलंबित्व कमी करत करत एक दिवस स्वबळावर सत्तेत यायचे आहे. अनेक वर्षे शक्तिशाली राहिलेल्या पण आज कमकुवत झालेल्या कॉंग्रेसला स्वबळाचे वेध लागले आहेत अन् बलाढ्य भाजपलाही कुबड्या नको आहेत. शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या कुबड्यांवर असूनही आपल्याला कुबड्यांची गरज नाही, असे भाजपला वाटते. स्वबळाची प्रचंड इच्छा असलेल्या भाजपसाठी मित्रांना घेऊन चालणे ही मजबुरी आहे. 'आपल्याला कुबड्यांची गरज नाही' हे वाक्य पक्षजनांचा आत्मविश्वास दुणावण्यासाठी ठीक आहे; पण, ती वास्तविकता नाही. केंद्रातील अपरिहार्यता बघता महाराष्ट्रात मित्रांच्या हातात हात घालून चालणे भाजपला भाग आहे. कुबड्यांची गरज नाही म्हणतात त्यांना ती आजतरी आहेच आणि 'आपण म्हणजेच पाय आहोत' असे कुबड्यांनीही समजू नये यातच खरे राजकीय शहाणपण आहे. कुबड्यांशिवाय चालण्याची कोणत्याही राजकीय पक्षाची क्षमता नाही, ही महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाची हकिकत आहे.
चैतालीताईंना वंदन
चैताली चिवटे या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगावच्या तलाठी. आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्याही अवस्थेत अतिवृष्टीग्रस्त गावांमधील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी त्या रोज १५-२० किलोमीटर दुचाकीने फिरल्या. आज त्यांच्याशी बोललो. शेतकरी, सामान्य माणसांचे दुःख दूर करण्यासाठी ही ताई स्वतःचा त्रास विसरली. आपल्या पोटातील बाळाला तिने समजावले. शेतीच्या बांधावर, मोडून पडलेल्या झोपड्या, घरांच्या ठिकाणी त्या गेल्या. लोकांना दिलासा दिला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी संवेदनशीलतेचा परिचय देत चैतालीताईंना फोन केला, त्यांचे अभिनंदन केले. इतना कौतुक तो बनता है ना!
जाता जाता
स्वतःच्या ट्रस्टसाठी लोकांकडून देणग्या घेणारे भाजपचे दोन-तीन आमदार माहितीत आहेत. आमदारांनी असे करणे बरे नव्हे. पुढे उगाच नाही नाही ते आरोप होतील, उगाच 'मोहोळ' कशाला उठवून घ्यायचे? त्यापेक्षा त्यांनी लोकांकडून मदत घेऊन ती मुख्यमंत्री मदत निधीत जमा केली तर किती चांगले होईला काही ठिकाणी सत्तारूढ अन् विरोधी आमदारांच्या नावे 'मंच' वगैरे स्थापन झाले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष आमदारांच्या दावणीला बांधले गेले आहेत. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. काँग्रेसचे बरेच आमदार तर प्रदेशाध्यक्षांनाही मोजत नाहीत. आमदारांपैकीच प्रदेशाध्यक्ष पाहिजे, असे जाहीरपणे बोलतात.
yadu.joshi@lokmat.com