मैथिली ठाकूर : मधुबनीची गायिका विधानसभेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:11 IST2025-11-15T10:06:14+5:302025-11-15T10:11:08+5:30
Maithili Thakur: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाची स्टार उमेदवार म्हणून मैथिली ठाकूरच्या उमेदवारीची चांगलीच चर्चा रंगली. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात २००० मध्ये जन्माला आलेली मैथिली ही शास्त्रीय आणि लोकसंगीत गायिका म्हणून लोकप्रिय आहेच.

मैथिली ठाकूर : मधुबनीची गायिका विधानसभेत!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाची स्टार उमेदवार म्हणून मैथिली ठाकूरच्या उमेदवारीची चांगलीच चर्चा रंगली. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात २००० मध्ये जन्माला आलेली मैथिली ही शास्त्रीय आणि लोकसंगीत गायिका म्हणून लोकप्रिय आहेच. मैथिली, हिंदी आणि भोजपुरी या भाषांमधील तिची गाणी चाहत्यांच्या ओठांवर असतात. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॉलोइंग आहे. टीव्हीवरच्या म्युझिक रिअॅलिटी शोजमध्येही तिच्या गाण्यावर प्रेम करणारे श्रोते आहेत, पण वयाच्या अवघ्या पंचविशीत भाजपने मैथिलीला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगरची उमेदवारी दिली. तरुण उमेदवार म्हणून ती निवडूनही आली आणि मैथिली पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.
लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांचा वापर निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी करण्यावरून मैथिलीच्या उमेदवारीची चर्चा चांगलीच रंगली होती. बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना एका मुलाखतीत पत्रकाराने मैथिलीला तिच्या विधानसभा मतदारसंघासाठी तिची 'ब्लू प्रिंट' काय असेल याबद्दल विचारले. त्यावर 'ब्लू प्रिंट ही बात खासगी आहे, त्याबद्दल जाहीरपणे कसे बोलू' अशा आशयाचे उत्तर दिल्यामुळे सोशल मीडियावर तिला जबरदस्त ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये एका वृत्तवाहिनीतील चर्चेचा कार्यक्रम 'मन नहीं हैं' असं सांगत मैथिलीने अर्धवट सोडला होता. तिच्या कमाईवरूनही सोशल मीडियात अनेकदा चर्चा रंगली. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, तिचे वार्षिक उत्पन्न ३.०४ कोटी रुपये आहे.
लोकप्रिय गायिका ते तरुण आमदार हा मैथिलीचा प्रवास अतिशय रंजक आहे. स्वतःला मिथिलेची कन्या असं म्हणवणाऱ्या मैथिलीला बिहारच्या बेरोजगारी आणि गरिबीवर मार्ग काढायचा आहे. हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले उद्दिष्ट असेल, असे तिने म्हटले आहे. प्रत्यक्षात ते करण्यात तिला कितपत यश येते, तरुणांच्या समस्यांना ती कितपत न्याय देऊ शकते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.