भगवान बिरसा मुंडा : आदिवासी परंपरेचा प्रेरक वारसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:27 IST2025-11-15T10:27:31+5:302025-11-15T10:27:49+5:30
Bhagwan Birsa Munda: महान आदिवासी नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती. त्यांचे हे १५०वे जयंती वर्ष. त्यानिमित्त...

भगवान बिरसा मुंडा : आदिवासी परंपरेचा प्रेरक वारसा
- प्रा. डॉ. अशोक वुईके
(आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र)
भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा अविभाज्य भाग असलेल्या आदिवासी समाजाचे देशाच्या इतिहासात आणि विकास प्रवासात एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. या समाजाने केवळ आपल्या परंपरा, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपल्या नाहीत, तर स्वातंत्र्य संग्रामातही शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. या अमूल्य योगदानाची स्मृती जपण्यासाठी आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस 'जनजाती गौरव दिवस' म्हणून साजरा केला जातो; तो स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त.
त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध 'उलगुलान' या क्रांतीचे नेतृत्व केले आणि आदिवासी समाजाला स्वाभिमान, एकता आणि स्वावलंबनाचा संदेश दिला. ते आदिवासी समाजातील सामाजिक न्याय आणि धार्मिक सुधारणा चळवळीचेही अग्रदूत होते. आदिवासी समाजात त्यांनी नवचेतना निर्माण केली. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त देशभरात 'जनजाती गौरव वर्ष' साजरे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने हे वर्ष अत्यंत उत्साहात साजरे करण्याचे निश्चित केले आहे. यानिमित्त देशभरातील आदिवासी समाजाच्या संस्कृती, इतिहास आणि योगदानाबद्दल अनेक कार्यक्रम होतील.
केंद्राचे जनजाती कल्याण
प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन), एकलव्य मॉडेल निवासी शाळा, वन धन विकास केंद्रे तसेच प्रधानमंत्री आदिवासी विकास अभियान यांसारख्या योजनांद्वारे आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार व सांस्कृतिक जतनावर भर दिला आहे. पीएम जनमन योजना व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाद्वारे आदिवासी समाजाचा शाश्वत विकास होत आहे. 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत २५ प्राधान्य क्षेत्रे आणि १७ मंत्रालये निश्चित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांची निवड या अभियानासाठी करण्यात आली. आदिवासी समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) आहे. त्यात सर्वांना पक्की घरे, प्रत्येक घरी नळाने पाणी, गावा-गावापर्यंत रस्ते, प्रत्येक घरापर्यंत वीज, शिक्षणासाठी वसतिगृह, कौशल्य विकास, गावोगावी फिरते वैद्यकीय पथक, दुर्गम भागापर्यंत दूरसंचार सेवा यावर लक्ष केंद्रित केले आहे.
गौरव वर्षात उपक्रम
जनजाती गौरव वर्षाच्या निमित्ताने १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर विविध उपक्रम राबविले गेले. स्पर्धा, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य, पर्यावरणविषयक उपक्रम तसेच जनजागृती अशा विविध विषयांवरील कार्यक्रम झाले. त्यात समाजाच्या संस्कृतीचा गौरव, शैक्षणिक व सामाजिक विकास आणि जनजाती समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जनजागृती घडविण्याचे उद्दिष्ट होते. आदिवासी समाजाच्या योगदानाचे स्मरण करताना ग्रामविकासात लोकसहभाग वाढविणे हे जनजातीय गौरव वर्षाचे मुख्य लक्ष्य आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था
आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे आदिवासी जीवनावर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करणे तसेच आदिवासी जीवन व विकासाशी संबंधित विषयांवर सखोल संशोधन करणे, हे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या संस्थेमार्फत आदिवासी विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी युवकांसाठी प्रशिक्षणे होतात. आदिवासी संस्था, आदिवासी कला व संस्कृती जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे संचालन संस्था करते. हस्तकला प्रदर्शनांचे आयोजन, विविध शहरी भागांमध्ये आदिवासी कलेचे प्रदर्शन आणि आदिवासी जीवनावर आधारित लघुपटांची निर्मिती यांसारख्या उपक्रमांद्वारे आदिवासी वारशाचे संवर्धन करण्यात येते. संस्था ५० वर्षांपासून कार्यरत आहे. केंद्र शासनाने या संस्थेला देशातील सर्व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थांची नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे. संस्थेचे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास, सक्षमीकरण आणि सांस्कृतिक संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
सरकारचा अनोखा पुढाकार
राज्य सरकारतर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणा निर्माण करून त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधणे हा आहे.
शबरी नॅचरल्स या उपक्रमाद्वारे आदिवासी विकास महामंडळाच्या या अभिनव उपक्रमाने ई-कॉमर्सच्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली. त्यातून आदिवासींचे आर्थिक सक्षमीकरण साधले जात आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आश्रमशाळांचे योगदान महत्त्वाचे आहे.
जनजाती गौरव वर्ष हा आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि योगदानाचा गौरव करणारा उत्सव आहे. या उपक्रमांद्वारे आदिवासी समाजाच्या विकासाचा प्रवास केवळ साजरा होत नाही, तर तो देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाचा घटक ठरतो. आदिवासी संस्कृती, कला आणि वारसा जतन करण्यासोबतच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न शासन सातत्याने करत आहे.