बार्शीकरांचे दातृत्व...!
By Admin | Updated: April 15, 2016 04:31 IST2016-04-15T04:31:47+5:302016-04-15T04:31:47+5:30
‘नाम’ची प्रेरणा घेऊन बार्शीच्या शिवाजी शिक्षण संस्था व भगवंत देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करतात. राज्यातील शिक्षणक्षेत्राने आणि नामांकित देवस्थानांनी देखील तशीच

बार्शीकरांचे दातृत्व...!
- राजा माने
‘नाम’ची प्रेरणा घेऊन बार्शीच्या शिवाजी शिक्षण संस्था व भगवंत देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करतात. राज्यातील शिक्षणक्षेत्राने आणि नामांकित देवस्थानांनी देखील तशीच प्रेरणा घेतली तर.....
कुठलेही संकट असो, संकटग्रस्तांच्या मदतीला धावण्याची सहवेदना असेल तर दिलाशाबरोबरच त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील सापडतो. सध्याच्या आसमानी दुष्काळी संकटाला सामोरे जाण्याचे बळ नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या ‘नाम’ने दिले. त्या बळाने महाराष्ट्रात दातृत्वाचा पाझरदेखील फोडला! अनेकांनी त्यांची प्रेरणा घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावण्याचा निर्धार केला. शिक्षणाच्या प्रसारासाठी कर्मवीर भाऊरावअण्णा पाटील यांनी एका जमान्यात ‘मूठभर धान्य’ ही चळवळ गावागावात राबविली आणि रयतचा शिक्षणवृक्ष ग्रामीण भागात वाढला व जोपासला गेला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. शिवाजी शिक्षण मंडळ नावाने त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीने नेहमीच ग्रामीण माणूस आणि शेतकऱ्यांशी असलेली आपली नाळ अतूट राखली. तीच परंपरा आणि ‘नाम’ची प्रेरणा घेऊन याच शिक्षण संस्थेने आपला भाग दुष्काळाने होरपळत असताना गप्प न राहण्याचा निर्णय घेतला.
अवर्षण या संकटाचे ओझे घेऊन दुष्काळाशी लढत राहण्याची जणू सवयच शेतकऱ्याला आता झाली आहे. कायमच्या दुष्काळमुक्तीसाठी पाण्याचे शाश्वत स्रोत निर्माण करून ते जतन करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. या वास्तवाची जाणीव बांधाबांधांवर पोहोचण्याची गरज आहे. नेमक्या त्याच जाणिवेला बळकटी देण्याचे काम शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव बापूसाहेब शितोळे आणि त्यांच्या टीमचे सदस्य व्ही. एस. पाटील, पी. टी. पाटील, नंदन जगदाळे, प्रा. दिलीप रेवडकर, प्राचार्य डॉ. व. न. इंगळे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्राचार्य एस. के. मोरे, सुरेश पाटील, अरुण देबडवार आणि एस. ए. पाटील यांनी केले. पदरमोड करून दुष्काळग्रस्तांना मदत केली पाहिजे, या भावनेतून संस्थेतील प्रत्येक घटकाने निधी दिला आणि पाहातापाहाता ही रक्कम १५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. या रकमेतून आपल्याच भागात जलसंवर्धन व्हावे, या भावनेने या संस्थेने तो निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला.
देशात एकमेव म्हणून बार्शी येथील श्री भगवंत मंदीर ओळखले जाते. ग्रामदैवत असलेल्या या देवस्थाननेही या कामात मागे न राहण्याचा निर्णय घेतला. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख, मुकुंद कुलकर्णी, मिठूभाऊ सोमाणी, नानासाहेब सुरवसे, अनिल देशमुख यांनी देवस्थानच्या वतीने दोन लाख रुपये मदतनिधी दिला. आता या दोन्ही संस्थांच्या मदतीने १७ लाख रुपयांची कामे शाश्वत पाण्याच्या स्रोत संवर्धनासाठी होतील.
खरे तर राज्यात जवळजवळ पाच हजार महाविद्यालये आहेत. साडेपाच हजार मंदिरे आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेली असंख्य देवस्थाने आहेत. शिर्डी, सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाईसारख्या काही देवस्थानांचा व्यवहार कोटी-कोटींच्या घरात आहे. शिक्षण संस्था आणि देवस्थानांनी मनावर घेतल्यास दुष्काळग्रस्तांना खूप मोठी मदत होऊ शकते, हा संदेशच बार्शीकर संस्थांच्या दातृत्वाने दिला आहे.
या निमित्ताने बार्शी तालुक्यातील सावरगाव या छोट्याशा गावात तलावाच्या कामासाठी मिलिंद सुरवसे आणि बापू सुरवसे यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यांनी वैयक्तिक २५ लाख रुपये खर्च करून आपल्या गावातील तलाव उभारणीच्या कामाला गती दिली आहे. संतोष ठोंबरे, प्रतापराव जगदाळे, अजित कुंकूलोळ, मुरलीधर चव्हाण, मधुकर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली मातृभूमी प्रतिष्ठाननेदेखील तब्बल सात गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत. या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजना कामात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर मान्सूनची कृपा झाली तर आनंदीआनंद होईल.