लेख: भारतातल्या जेन झींचे आई-बाबा आणि आजी-आजोबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 07:50 IST2026-02-23T07:48:25+5:302026-02-23T07:50:50+5:30
बूमर्स, जेन एक्स, मिलेनियल्स आणि जेन झी यांची जी वैशिष्ट्यं सांगितली जातात तीसुद्धा पाश्चात्त्य जगाच्या संदर्भानेच ठरवली जातात.

लेख: भारतातल्या जेन झींचे आई-बाबा आणि आजी-आजोबा
-राही श्रु. ग. (सीनिअर रिसर्च फेलो जवाहरलाल नेहरू विद्यापीठ)
जागतिक पातळीवर बूमर्स ते झूमर्स या पिढ्यांची चर्चा होते तेव्हा बहुतांश वेळा ही चर्चा पाश्चात्त्य संदर्भामध्येच होत असते. बूमर्स, जेन एक्स, मिलेनियल्स आणि जेन झी यांची जी वैशिष्ट्यं सांगितली जातात तीसुद्धा पाश्चात्त्य जगाच्या संदर्भानेच ठरवली जातात. जागतिक पातळीवर काही सामाजिक, आर्थिक प्रवाह सगळीकडेच पाहायला मिळत असले तरी, भारतात मात्र पिढ्यांचं वर्गीकरण काहीसं वेगळ्या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
स्वतंत्र भारतातली सर्वात जेष्ठ पिढी साधारण १९३१ ते १९५०च्या दरम्यान जन्मलेली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अखेरचा टप्पा, फाळणी आणि नव्याने मिळालेलं स्वातंत्र्य अनुभवलेली ही पिढी.
अमेरिकन अर्थाने या पिढीतल्या लोकांना 'ग्रेटेस्ट जनरेशन', 'सायलंट जनरेशन' किंवा 'बूमर्स' यापैकी कुठल्याही पिढीचे प्रतिनिधी म्हणता येणार नाही. स्वातंत्र्यलढ्याचं वारं पिऊन ही पिढी वाढली. त्यांच्या बालपणातच त्यांनी नव्या स्वतंत्र देशाची स्वप्नं पाहिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाच्या कथा ऐकत ही मुलं कळती झाली. त्यांच्या बालपणात आणि तारुण्यात हळूहळू आधुनिकतेशी आणि लोकशाही देशाच्या जडणघडणीशी त्यांची ओळख झाली.
परंपरा आणि आधुनिकता, समूहकेंद्री आणि व्यक्तिकेंद्री विचारसरणी अशी रस्सीखेच आयुष्यभर त्यांच्या वाट्याला आली. समता, स्वातंत्र्य आणि न्यायासाठी झालेल्या समाजसुधारणांच्या चळवळींनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच जातसंस्था, पितृसत्ता आणि धार्मिक पुराणमतवादावर हल्ला चढवायला सुरुवात केली. ही पिढी स्वतंत्र भारताची, तरुण मतदारांची पहिली पिढी ठरली.
स्वतंत्र देशाच्या उभारणीसाठीचे प्रयत्न, नव्या संस्थांची स्थापना आणि नेहरूवादी राजकारणाचा काळ हे या पिढीचे तारुण्य. काटकसर आणि कष्ट करत ही पिढी वाढली. आधुनिकतेबरोबर जुळवून घेण्याचा या पिढीने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला.
१९५१ ते १९८०च्या दरम्यान जन्मलेले भारतीय लोक अमेरिकन अर्थाने बूमर्स आणि जेन एक्स यांचं मिश्रण आहेत. भारत-चीन युद्ध, पंचवार्षिक योजनांमधून होणारा आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास आणि पुढे आणीबाणी या महत्त्वाच्या घटना या पिढीच्या बालपणी घडल्या. नेहरूंच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणाची दिशा वेगाने बदलत गेली.
स्वातंत्र्यलढ्याच्या अनुभवाचा, त्यागाचा आणि समाजपरिवर्तनाच्या एका पठडीतल्या विचारसरणीचा दुवा असलेली पिढी काळाच्या पडद्याआड जाऊ लागली तशी देशासमोरच्या नव्या आव्हानांना, विशेषतः सुरक्षा आणि आर्थिक विषमतेला तोंड देण्यासाठी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जन्मलेली पिढी सज्ज झाली. इंदिरा गांधींच्या राजकारणाने देशाच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम केले. बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि बांगलादेश युद्धाने भारताची एक बलशाली समाजवादी देश म्हणून ओळख निर्माण झाली. पण, त्याचवेळी आणीबाणीने लोकशाहीसमोरची आव्हानं दाखवून दिली.
आंबेडकरवाद, स्त्रीवाद आणि मार्क्सवादाच्या आदर्शाना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी देशभरात आंदोलनं उभी राहिली. एकाचवेळी डाव्या आणि उजव्या राजकीय समूहांनी काँग्रेसच्या काहीशा नेमस्त राजकारणाला आव्हान दिलं. आधीच्या पिढीपेक्षा सावध आणि चिकित्सक अशी ही पिढी सध्या उद्योगधंदे, राजकारणापासून सांस्कृतिक विश्वाचं नेतृत्व करते आहे.
कल्याणकारी राज्यसंस्थेतून सोयीसुविधा, शिक्षण आणि प्रसंगी रोजगारदेखील मिळवलेल्या या पिढीने खासगीकरणाचं मात्र स्वागत केलं. याच पिढीतल्या एका समूहाने समता-सामाजिक न्यायासाठी आंदोलनं उभी केली, तर दुसऱ्या एका कंपूने धार्मिक राष्ट्रवादावर आधारित राजकारण रेटलं. भारतातल्या जेन झींचे आई-बाबा आणि आजी-आजोबा हे असे अनेक विरोधाभासांच्या उंबरठ्यावरून या पिढीकडे पाहात आहेत.
raheeshrutiganesh@gmail.com