बरं झालं, त्यानिमित्ताने दोषारोपांनी गाजत असलेल्या संसदेत एक पुस्तक तरी आलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 08:14 IST2026-02-14T08:13:45+5:302026-02-14T08:14:36+5:30

आजचे राजकारणी फार वाचत असतील अशी अपेक्षा नाहीच. पण राहुल गांधींच्या निमित्ताने का असेना, नव्या संसद भवनाला एका पुस्तकाचं दर्शन झालं !

Article on Naravane book was brought to the House due to Rahul Gandhi's allegations against the government in Parliament | बरं झालं, त्यानिमित्ताने दोषारोपांनी गाजत असलेल्या संसदेत एक पुस्तक तरी आलं! 

बरं झालं, त्यानिमित्ताने दोषारोपांनी गाजत असलेल्या संसदेत एक पुस्तक तरी आलं! 

अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’

भारतीय राजकारण दिवसेंदिवस किती गलिच्छ आणि आत्मकेंद्रित होत चाललेलं आहे, हे खरंच !- पण  फक्त आरडाओरडा, वचावचा भांडणं आणि दोषारोपांनी गाजत असलेल्या संसदेत नुकतीच चक्क एका पुस्तकावर चर्चा होताना दिसली… हे विशेष! 

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या नेहमीच्या कंटाळवाण्या, रटाळ आणि खर्चिक संघर्षाऐवजी  संसदेच्या ताज्या अधिवेशनात एका पुस्तकावर घमासान चर्चा नव्हे युद्धच रंगलेलं भारतीयांनी पाहिलं. हे पुस्तक निवृत्त लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी लिहिलेलं. लष्करी युद्धकला आणि रणनीतीवरील या आत्मकथनाचं शीर्षक आहे : ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’. या पुस्तकात जनरल नरवणे यांच्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीचं आत्मकथन आहे. हे पुस्तक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत आणल्यामुळे नेहमीच्या आरोप-प्रत्यारोपांवरून संसदेचं लक्ष एका पुस्तकाकडे वळलं, ही आनंदाची बाब ! लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांना त्यातील  उतारे वाचायची परवानगी दिली नाही, तो त्यांचा अधिकार आहे, हा भाग अलाहिदा… महत्त्वाचं आहे ते एका पुस्तकाचं संसदेत येणं!

प्रत्युत्तरादाखल जवाहरलाल नेहरुंवरील अनेक पुस्तकं आणि त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी १९७० मध्ये लादलेल्या आणीबाणीवरील कितीतरी पुस्तकं संसदेच्या पवित्र पावन परिसरात एकाएकी दिसू लागली. अर्थात, ज्या पुस्तकांवरून भाजपच्या खासदारांनी एवढं रणकंदन घडवलं ती त्यांनी वाचलेली नसतीलच.. लोकसभेच्या समृद्ध ग्रंथालयातला प्रचंड ग्रंथसंग्रह त्यांच्या मदतीला धावून आला असावा. तिथल्या कर्मचाऱ्यांना जुनी पुस्तकं बाहेर काढताना, त्यांच्यावरची धूळ झटकताना किती बरं वाटलं असेल ! नेहरू, इंदिरा आणि लेडी माउंटबॅटन यांच्यावरचे ते जुने, जीर्ण झालेले, अनेक वर्षात कुणाचा हात न लागलेले खंड… नव्या संसद भवनाचं दर्शन घडलं म्हणून त्यांनी राहुल गांधी आणि नरवणे यांचे आभारच मानले असतील. 

आजचे राजकारणी फार वाचत असतील अशी अपेक्षा बहुतेक भारतीय ठेवत नाहीत. भारतीय जनता पक्षात अटलबिहारी वाजपेयी  आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज आणि सुब्रह्मण्यम स्वामी हे सन्माननीय अपवाद. डॉ. आंबेडकर, राम मनोहर लोहिया, मधु दंडवते, मधु लिमये, पिलू मोदी, इंद्रजित गुप्ता, श्रीपाद अमृत डांगे, विठ्ठलराव गाडगीळ, सोमनाथ चटर्जी, अर्जुन सिंग आणि अर्थातच स्वतः नेहरू या खासदारांचं वाचन प्रगाढ होतं. संसदेतल्या चर्चांमध्ये ते विद्वत्तापूर्ण युक्तिवाद करत आणि त्यासाठी स्वसंग्रहातील ग्रंथांचाही संदर्भ घेत. काही राजकारण्यांची वैयक्तिक ग्रंथालयं मी स्वतः पाहिली आहेत. त्याशिवाय लोकसभेच्या ग्रंथालयातील पुस्तकंही ते नियमित वाचत असत. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश हे नियमित लोकसभेच्या ग्रंथालयाचा लाभ घेतात. 

याआधी संसदेत एखाद्या पुस्तकावरून असा वाद झाल्याच्या काही घटना आठवतात. शालेय पाठ्यपुस्तकातला एखादा धडा वगळणं किंवा नवा धडा समाविष्ट करणं यावरून काही वाद झाले.  माजी मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रह्मण्यम यांच्या पुस्तकाच्या दोन लाख प्रती खरेदी करण्याचा वादग्रस्त निर्णय युनियन बँकेने घेतला होता, तेव्हा आपल्या खासदारांनी फार काही तलवारी उपसल्याचं आठवत नाही. सलमान रश्दींच्या ‘सटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावरून चर्चेला तोंड फुटलं होतं तेव्हाही आत्ताएवढं घमासान रंगलं नाही. बांगलादेशी निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या ‘लज्जा’ या पुस्तकामुळे २००३ मध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. ‘द्विखंडितो’ या तस्लिमांच्या आत्मचरित्रावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती आणि त्याचे पडसाद लोकसभेतही उमटले होते. पण जनरल नरवणे यांच्या अद्याप औपचारिक प्रकाशन न झालेल्या पुस्तकाने इतिहास रचला आहे हे नक्की..

Web Title : आरोपों के बीच संसद में किताब पर चर्चा, एक स्वागत योग्य बदलाव!

Web Summary : जनरल नरवणे की किताब ने संसद में बहस छेड़ दी, जिससे ध्यान राजनीतिक झगड़ों से हट गया। इससे पुरानी किताबों की फिर से खोज हुई, जो तस्लीमा नसरीन जैसे लेखकों की किताबों पर अतीत के विवादों के बावजूद, विशिष्ट संसदीय चर्चा से बदलाव को उजागर करता है।

Web Title : Parliament discusses book amidst accusations, a welcome change indeed!

Web Summary : General Naravane's book sparked debate in Parliament, diverting attention from political squabbles. This led to rediscovering older books, highlighting a shift from typical parliamentary discourse, despite past controversies over books by authors like Taslima Nasreen.