ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...

By यदू जोशी | Updated: September 5, 2025 06:41 IST2025-09-05T06:40:36+5:302025-09-05T06:41:49+5:30

ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांचा द्वेष केला जातो; हे खरे नाही. एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री म्हणून दोनदा संधी देणारा समाज ब्राह्मणांप्रति जातीयवादी कसा?

Article on Manoj Jarange Patil's criticism of Maratha reservation and criticism Devendra Fadnavis on the basis of Brahmin caste | ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...

ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

परवा एक नेते भेटले. ‘भाजपमध्ये नसलो तरी मी फडणवीस यांचा चाहता आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर दिल्लीला निघून जावे’ असे म्हणत होते. फडणवीस दिल्लीला गेले पाहिजेत, असे काही नेत्यांना वाटते. त्यात त्यांच्या प्रगतीची कामना करणारे, त्यांना केंद्रात महत्त्वाच्या मंत्रिपदी आणि कालांतराने पंतप्रधानपदी पाहण्याची मनोमन सदिच्छा बाळगणारे आहेत. फडणवीस दिल्लीत गेले तर कटकट जाईल,  महाराष्ट्राचे मैदान आपल्यासाठी मोकळे होईल, असेही काहींना वाटते. त्यात पक्षातले अन् बाहेरचेही आहेत. पण, या सगळ्यांसाठी तूर्त एवढेच की फडणवीस लगेच कुठे जाणार नाहीत. 

राज्याच्या राजकारणात फडणवीसांची जात अडचणीची आहे; पण दिल्लीत गेले तर जातीची अडचण येणार नाही, असे त्यांना तिकडे पाठविण्याची फार घाई असलेले नेते सांगतात. फडणवीस यांची जात महाराष्ट्रात अडचणीची असती तर पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडे पुन्हा सूत्रे का दिली असती? २०१४ पासून दिल्लीने महाराष्ट्रातील नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराला ‘ब्राह्मण’ समजतो, तर दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना ‘ब्राह्मण’ समजत नसेल का? तीन टक्क्यांच्या समाजाचे फडणवीस यांना नेतृत्व देण्यात मोठी जोखीम आहे हे दिल्लीला कळतच असणार, तरीही त्यांनी विश्वास टाकला. पहिल्या कार्यकाळात आरक्षणासाठी निघालेले अनेक मोर्चे, मराठा विरुद्ध ओबीसी असा २०२४ च्या निवडणुकीआधी उभा राहिलेला मोठा संघर्ष असे चित्र असतानाही नेतृत्वाने त्यांनाच केंद्रस्थानी ठेवले. लोकसभेत दणकून मार खाल्ल्यावर आणि जातीय समीकरणांची धग मोठी असताना फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेला भाजप कितपत यश मिळवू शकेल, अशी शंका अनेक भाजपजनांमध्येही होती. पण ती फडणवीसांनी किंबहुना महाराष्ट्राने खोटी ठरविली.

जातीवरून फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटविणारा वर्ग कितीतरी मोठा होता हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे फडणवीस हे ब्राह्मण असल्यानेच त्यांचा द्वेष केला जातो असे  ब्राह्मणांसह ज्यांना वाटते ते खरे नाही. एका ब्राह्मणाला तो मुख्यमंत्री व्हावा यासाठी एकदा नाही तर दोनदा संधी देणारा समाज हा ब्राह्मणांप्रति जातीयवादी कसा म्हणायचा?

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर लगेच, ‘एक मराठा, लाख मराठा... एक पंत लाख शांत’ असे मेसेज फिरवले जात आहेत. जे लोक असा मेसेज फिरवत आहेत त्यांच्यासाठी एवढेच की मराठ्यांसह ज्या ज्या समाजांनी फडणवीस यांना स्वीकारले त्यांचा ते अपमान करत आहेत. गेली किमान तीस वर्षे फडणवीस यांचे राजकारण जवळून पाहणाऱ्यांपैकी एक असल्याने हे नक्कीच वाटते की या मेसेजमध्ये जो काही दर्प आहे तो फडणवीस यांना कधीही मान्य होणार नाही.   

मान गये जरांगे पाटील
बरेच जण म्हणतात की, मनोज जरांगे पाटील यांना फडणवीस यांनी आझाद मैदानापर्यंत येऊच द्यायला नको होते; नवी मुंबईतच थोपवून धरायला हवे होते. तसे केले असते तर मुंबईत पाच दिवस जे घडले ते घडलेच नसते. फडणवीस यांनी जरांगेना का येऊ दिले असावे?- जरांगे पाटील मुंबईत आल्याने जो आक्रोष, उद्रेक दिसून आला त्यापेक्षा अधिकचा उद्रेक त्यांना रोखून धरल्याने झाला असता. मराठा समाजाच्या भावना मुंबईच्या हद्दीत पोहोचता कामा नये ही फडणवीस यांची दादागिरी असून, त्यांच्या मनात द्वेष आहे असे आरोप झाले असते. त्यापेक्षा आंदोलक आक्रमक होतील, नागरिकांची गैरसोय होईल; पण सरकार ‘मराठाविरोधी’ असल्याचा आरोप लावता येणार नाही, असे काहीसे फडणवीस यांच्या मनात असावे. 

जरांगे पाटील मुंबईत आले, मागण्या मंजूर करवून घेतल्या. ‘जिंकलो रे राजेहो’ म्हणत त्यांनी मैदान मारले. कोणतीही राजकीय वा घराण्याची पार्श्वभूमी नसताना एक फाटका, गावरान बोलणारा माणूसही समाजाची एकसंध शक्ती उभी करून सरकारला झुकवू शकतो हे जरांगे पाटील यांनी सिद्ध केले आहे. अर्थात, सरकारने दिलेली आश्वासने, काढलेले जीआर यांची अंमलबजावणी कितपत होते यावरच मनोज जरांगें यांचे जिंकणे वा हरणे अवलंबून असेल. समाजाच्या प्रचंड विश्वासाचे दडपण त्यांच्यावर आहेच, त्यांची खरी कसोटी पुढे आहे.  प्रस्थापित नेतृत्वाला कंटाळलेला आणि अनेक प्रश्न मनात साचलेला मराठा तरुण जरांगे यांच्याभोवती एकवटला आहे. या तरुणाईची आक्रमकता पुढील आंदोलनांमध्ये कशी उपयोगात आणायची आणि आक्रस्ताळेपणा कसा थांबवायचा हेही जरांगे पाटील यांना बघावे लागेल. 

जाता जाता : परवा ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांच्या आईंची भेट झाली. थकल्या आहेत त्या आता बऱ्याच. टीव्ही पाहत नाही म्हणाल्या. त्यामुळे ते ‘काहीबाही’ त्यांनी ऐकलेलं नाही.

Web Title: Article on Manoj Jarange Patil's criticism of Maratha reservation and criticism Devendra Fadnavis on the basis of Brahmin caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.