लेख: कुबड्यांची गरज नाही, मित्रांनी आपल्या मार्गाने जावे! अमित शाहांचा 'मित्रपक्षांना' संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:10 IST2025-11-05T11:10:26+5:302025-11-05T11:10:51+5:30
भाजपची पुढली दिशा काय असेल, हे स्पष्ट झाले आहे.

लेख: कुबड्यांची गरज नाही, मित्रांनी आपल्या मार्गाने जावे! अमित शाहांचा 'मित्रपक्षांना' संदेश
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुंबईत नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले, त्यातला ‘संदेश’ आता महाराष्ट्राबाहेरही गेला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपल्यावर अजूनही अवलंबून आहे, असे ज्यांना वाटते त्या भाजपच्या प्रत्येक मित्रपक्षासाठी तो ‘संदेश’ महत्त्वाचा आहे. मुंबईत बोलताना शाह म्हणाले, ‘महाराष्ट्रात तिहेरी इंजिनचे सरकार आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाला यापुढे कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता नाही.’ - हे विधान त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर केले. ‘आघाड्यांवर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत’ असे त्यांना म्हणायचे होते. भाजप स्वबळावर स्थानिक निवडणुका लढवायला तयार आहे, असे ते म्हणाले. अर्थात, महायुतीतील घटक पक्ष नगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढतील, हा मुद्दा वेगळा.
कोणे एकेकाळी भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून होता. आता तो काळ संपला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला शिंदे गट सध्या भाजपबरोबर नांदतो आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या १४५ पैकी १३२ जागा जिंकून भाजप बहुमताच्या जवळ आला. याचा अर्थ मित्रपक्षांची मदत न घेता भाजप सरकार स्थापन करू शकत होता.
आता मित्रपक्षांशिवाय भाजप सत्तेवर येऊ शकतो, याची आठवण शाह यांना करून द्यावयाची असावी. महाराष्ट्रातून गेलेल्या या संदेशाचे पडसाद इतरत्र उमटले. बिहार आणि झारखंडमध्ये भाजपने याआधी मित्रपक्षांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला नसला, तरी त्या दिशेने भाजपचे प्रयत्न चालू आहेत; हेच शाह यांच्या विधानातून स्पष्ट होते. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली रालोआ निवडणूक लढवत आहे, हे पुन्हा एकदा शाह यांनी स्पष्ट केले; परंतु त्याचवेळी ते हेही म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत आमदारांची बैठक घेतली जाऊन काय तो निर्णय होईल’. - याचा अर्थ स्पष्ट आहे. मित्रपक्ष त्यांना पाहिजे त्या मार्गाने जाऊ शकतात.
धनखड परतले.. वादळानंतरची शांतता
अनेक महिने उठलेल्या वावड्या आणि त्यानंतरच्या शांततेनंतर जगदीप धनखड आणि परिवारात सगळे काही ठिकठाक असल्याची चिन्हे दिसतात. माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने अचानक राजीनामा दिला होता. त्यानंतर ५३ दिवस काटेकोर मौन पाळून आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधी समारंभाला ते राष्ट्रपती भवनात उपस्थित राहिले; आणि नंतर पुन्हा अज्ञातवासात गेले. पण आता सगळे काही ठीक दिसते आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार धनखड यांनी गप्प राहायचे ठरवले आहे. लवकरच माजी उपराष्ट्रपती ल्युटेन्स दिल्लीतील ‘३४, एपीजे अब्दुल कलाम मार्ग’ या ठिकाणी त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यात स्थलांतरित होतील. या बंगल्याची निवड त्यांनी स्वत: केली आहे. काही औपचारिक पूर्तता करावी लागल्याने थोडा वेळ लागला इतकेच.
‘तुम्हाला २ लाख रुपये मासिक निवृत्ती वेतन मिळेल, त्याचप्रमाणे तुमच्या पसंतीचे कर्मचारी नेमता येतील; त्यात स्वीय सहायक, अतिरिक्त सचिव, एक व्यक्तिगत सहायक, चार सेवक, परिचारक आणि डॉक्टरही तुम्हाला मिळू शकतील’ असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. याशिवाय आमदार-खासदारकीचे निवृत्ती वेतन आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल म्हणून २५ हजारांचा भत्ता मिळण्यासही ते पात्र आहेत. एकदा का निवासस्थान मिळाले, जी काही येणी आहेत ती मिळणे नक्की झाले आणि पक्षाचे दरवाजे खुले झाले की धनखड पुन्हा परिवारात येतील, अशी शक्यता आहे.
नितीश यांनी भोजपुरी सिनेमावाल्यांना दूर ठेवले.
बिहार विधानसभा निवडणुकीत जवळपास प्रत्येकच राजकीय पक्षाने भोजपुरी सिनेमातला एखादा नट, गायक अशा कलावंतांना उमेदवारी दिली. केवळ उमेदवारी दिली नाही तर त्यांना प्रचार मोहिमेतही भरपूर उपयोगात आणले. भाजपवर याचा सर्वात मोठा आरोप होतो. परंतु, राजदचे तेजस्वी यादव फार मागे नाहीत. खेसारी लाल यादव यांना त्यांनी तिकीट दिले आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराजनेही पंखुडी पांडे या अभिनेत्रीला उभे केले आहे. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकही नट किंवा गायक यावेळी पुढे केलेला नाही. प्रथेप्रमाणे संयुक्त जनता दलाची तिकिटे तळागाळातले कार्यकर्ते आणि संघटनात्मक काम करणाऱ्या व्यक्तींना दिली जातात.
भाजपने मात्र सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांना दरभंगातील अलीनगरमधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल निराहुआ यांनाही प्रचारकामात ओढले आहे. हे चित्रपट अभिनेते आणि गायक चांगला प्रचार करतात; उमेदवारांनाही त्यांचा फायदा होतो. असे असले तरी या भोजपुरी सेलिब्रिटी ब्रिगेडपासून नितीश कुमार दूर का राहिले? - हे एक कोडेच आहे.
harish.gupta@lokmat.com