लेख: पुरुषांना हवीय केअरटेकर, बायकांना हवे आहे एटीएम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:11 IST2026-02-01T11:09:57+5:302026-02-01T11:11:07+5:30
चिता काकूंचा मुलगा सुमेध शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि चांगली नोकरी मिळाल्यावर त्याने तिथेच राहायचं ठरवलं. काकू अधूनमधून तिकडे जात-येत राहिल्या तरी इथे मात्र त्या एकट्याच राहत होत्या. नातेवाईकही आपापल्या आयुष्यात व्यग्र होते. 'आई, तू तुझ्यासाठी जोडीदार बघ' असा पठडीत न बसणारा सल्ला सुमेधनेच काकूंना दिला. ते का महत्त्वाचं आहे तेही तो काकूंना समजावत राहिला.

लेख: पुरुषांना हवीय केअरटेकर, बायकांना हवे आहे एटीएम!
चिता काकूंचा मुलगा सुमेध शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि चांगली नोकरी मिळाल्यावर त्याने तिथेच राहायचं ठरवलं. काकू अधूनमधून तिकडे जात-येत राहिल्या तरी इथे मात्र त्या एकट्याच राहत होत्या. नातेवाईकही आपापल्या आयुष्यात व्यग्र होते. 'आई, तू तुझ्यासाठी जोडीदार बघ' असा पठडीत न बसणारा सल्ला सुमेधनेच काकूंना दिला. ते का महत्त्वाचं आहे तेही तो काकूंना समजावत राहिला.
काकू श्रीमंत नसल्या तरी सुमेधच्या बाबांच्या मागे त्यांच्या पेन्शनला स्वतच्या नोकरीची जोड देत त्यांनी निगुतीने घर चालवलं. सुमेधचं शिक्षण केलं. आता सुमेध स्थिरस्थावर झाल्यावर तर त्यांना कसलाच ताण नव्हता. अशात जोडीदाराचा शोध सुरू केल्यानंतर काकूंना बऱ्याच कडू-गोड अनुभवांना सामोरे जावं लागले. कारण उतारवयातही जोडीदाराचा शोध घेताना अपेक्षांची चौकट ही बहुतेक पहिल्या लग्नासाठी असते तशीच जाचक होती.
पण काकू जग पाहिलेल्या होत्या. त्यांनी आधीच 'मला माझी आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी नाही तर भावनिक आणि मानसिक सोबत करणारा जोडीदार हवा आहे,' ही स्पष्ट भूमिका घेतली. त्यांना 'उतारवयात सेवा करण्यासाठी 'केअरटेकर' नव्हे तर साथ देणारी जोडीदार हवी' असा विचार करणारे अजित काका भेटले. दोघांनीही आपापल्या मुलांना, जवळच्या नातेवाइकांना या नात्याची कल्पना दिली. आपल्याकडे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचं काय करायचं याच्या स्पष्ट नोंदी असलेली मृत्युपत्र केली आणि आता दोघेही सुखाने लिव्ह-इनमध्ये राहतात.
पण असे जोडीदार सगळ्यांनाच मिळतात का?
साठी किंवा सत्तरीत दुसरं लग्न करत असताना बहुतांश स्त्रिया आणि पुरुष हे खऱ्या अर्थाने फक्त 'जोडीदार' शोधत असतात हे खरं. पण वरवर पाहता 'गुडी गुडी' वाटणाऱ्या अपेक्षा जरा खरवडून बघितल्या तर मजेशीर गोष्टी हाती लागतात.
अशावेळी काय करायचं ?
- जोडीदाराचा शोध हा कोणत्याही वयात घेत असलात तरी आपल्या अपेक्षा अवास्तव नाहीत ना याचा विचार करावाच लागतो.
- सेकंड इनिंग सुरू करणारे स्त्री, पुरुष जेव्हा अशी अपेक्षांची यादी घेऊन जोडीदार शोधायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांनी वास्तवाची जाण आणि भान दोन्ही ठेवायला हवं.
- अवास्तव अपेक्षांचे पंख छाटून 'कॉमन मिनिमम' काय आहे हे प्राधान्याने ठरवा.
- आजारपणं, शुश्रूषा हा अशा उतारवयात एकत्र येण्यातला फार संवेदनशील मुद्दा असतो.
बहुतेकवेळा पुरुषांमध्ये 'तिचं आजारपण तिचं तिने पाहावं, माझी मात्र सेवा शुश्रूषा मन या वयात नव्याने पत्नी शोधणाऱ्या पुरुषांना शक्यतो आपली जोडीदार वयाच्या चाळिशी पन्नाशीतली असावी असं वाटतं. ती आपल्याला 'सूट' होणारी हवी, प्रवास, नाटक, सिनेमा, अशा सगळ्या छंदांमध्ये आपल्याला साथ देणारी हवी, आपली आजारपणं काढणारी हवी... आणि हो, मुख्य म्हणजे रोजच्या रोज साग्रसंगीत स्वयंपाक करून जेऊ घालणारी हवी असंही ज्येष्ठांना वाटतं. यावर कहर म्हणजे होता होईतो तिचा खर्च तिचा ती करू शकणारी असेल, तर अति उत्तम! थोडक्यात म्हणजे बहुतांश पुरुषांना 'कंपॅटिबल केअरटेकर' हवी आहे.
आणि स्त्रिया? त्यांच्या अपेक्षाही काही कमी नाहीत. जोडीदाराचं मासिक उत्पन्न किमान पन्नासेक हजार असावं. त्याने आपली हौसमौज पुरवावी. जमलंच तर त्याने आपल्याला परदेश प्रवास घडवावेत. मी शॉपिंग केलं, साड्या, दागिने घेतले तर त्याने आडकाठी करू नये... उलट प्रोत्साहनच द्यावं. आणि हो, 'मेड' ठेवून देशोदेशीचे पदार्थ रांधून घेऊ, खाऊपिऊ, मजा करू... पण आयुष्यभर रांधा-वाढा-उष्टी काढा केलंय, आता तेवढं मात्र त्याने करायला लावू नये...थोडक्यात म्हणजे उतारवयात पुन्हा जोडीदार शोधणाऱ्या स्त्रियांना 'कंपॅटिबल एटीएम' हवं आहे.
या अशा टोकाच्या अपेक्षा मनात ठेवून जोडीदार शोधणारे स्त्री-पुरुष पुढे जाऊन एकटेच राहण्याची शक्यता अधिक असते. उतारवयात मुलं आपापल्या आयुष्यात गुंतलेली असताना, एकटं घर खायला उठलेले असताना आपल्याला नेमकं काय हवंय?... पैसा आहे. हाताशी भरपूर वेळ आहे, शहरात राहत असाल तर मन रमवायला अनेक गोष्टी आहेत, पण घरात दोन शब्द बोलायला मात्र कुणी नाही. बरं नसताना हातात वेळच्या वेळी औषधं देणारा किंवा देणारी कुणी नाही.... मग महत्त्वाचं काय? पैसा? सेवा-शुश्रूषा? शॉपिंग? की परदेश प्रवास? याचा विचार मात्र ज्याचा त्याने आणि जिचा तिने करायचा आहे.
- भक्ती बिसुरे
bhaktibisure@gmail.com