लेख: हल्ली तुम्ही गुगल कमी वापरायला लागला आहात ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:35 IST2025-09-01T09:34:09+5:302025-09-01T09:35:24+5:30

माहिती मिळवण्यासाठी आपण किती वेळा ‘गुगल’ करतो? त्याऐवजी चॅटबॉटचा वापर आता वाढला आहे; पण त्याचे गुण-दोषही समजून घ्यायला हवेत.

Article: Have you started using Google less lately? | लेख: हल्ली तुम्ही गुगल कमी वापरायला लागला आहात ना?

लेख: हल्ली तुम्ही गुगल कमी वापरायला लागला आहात ना?

साधना शंकर
लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

आजकाल आपण किती वेळा गुगलवर जातो आणि काही सर्च करतो? किती माहिती आपण गुगलवरून मिळवतो? गुगलचा तुमचा वापर आधीसारखाच आहे की, आता तुम्ही चॅट जीपीटी, ग्रोक किंवा मेटाला गुगलपेक्षा अधिक प्राधान्य देता? संवादात्मक एआय, जे आता सतत अधिक चांगले होत आहे आणि इंटरनेटवरील जुनी, मूलभूत पद्धत ढवळून काढत आहे. लोक ऑनलाइन माहिती आता कशी शोधतात? जनरेटिव्ह एआयचा उदय आणि वापरकर्त्यांचे वर्तन यामुळे माहिती शोधण्याची पद्धत आता मुळातून बदलते आहे आणि याचा परिणाम संपूर्ण डिजिटल विश्वात जाणवतो आहे.

पूर्वी आपल्याला जी माहिती हवी असायची त्यासाठी आपण ‘गुगल’ करत होतो आणि त्यानंतर मिळालेल्या लिंक्सवर क्लिक करून आपल्याला हवी ती माहिती मिळवत होतो. आता कोणत्याही एआय चॅट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाइप करा आणि ते तुम्हाला विश्लेषणासहित, संकलित तयार उत्तर देते. त्यासाठी इतर कुठेही जाण्याची गरज नाही. वापरकर्त्यासाठी हे खूप सोपे आहे, पण याचा अर्थ असा की, ‘एआय’ला माहिती पुरवणाऱ्या विविध साइट्सवर येणारी वाहतूक (ट्रॅफिक) त्यामुळे कमी होते. गमावलेले वाचक म्हणजे गमावलेले उत्पन्न! नेमका वापर मोजणे अवघड आहे, पण विविध अहवालांनुसार सर्च इंजिन्सवरील मासिक ट्रॅफिक १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्यावर्षी गुगलने आपल्या परिणामांमध्ये एआय-निर्मित सारांश जोडायला सुरुवात केली आणि ‘Let Google do the Googling for you’ अशी घोषणा केली. ही घट संपूर्ण इंटरनेटवर जाणवते आहे. वृत्त प्रकाशक आणि कंटेंट निर्माते यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. 

एआय मॉडेल्सना अनेकदा त्यांच्या कंटेंट संदर्भात प्रशिक्षण दिले जाते. पण त्यांच्या उत्तरांमध्ये ते लिंक्स किंवा श्रेय, स्रोत देत नाहीत, परिणामी त्या त्या वेबसाइटवरील ट्रॅफिक आणि त्यांचा महसूल कमी होतो. त्यामुळे काही वृत्तसंस्था आणि कंटेंट प्लॅटफॉर्म्सनी आधीच प्रतिकार करण्यास सुरुवात केली आहे. एआय कंपन्यांसोबत त्यांनी परवाना करार केले आहेत किंवा त्यांचा डेटा संरक्षित करण्यासाठी ‘पेवॉल्स’ (सदस्यत्व शुल्क) लावायला सुरुवात केली आहे. ही समस्या व्यापक आहे. यामुळे संदर्भ साइट्सची ट्रॅफिक जवळपास १५ तर हेल्थ साइट्सची ट्रॅफिक ३१ टक्क्यांनी घटली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, ट्रॅव्हल ॲग्रिगेटर्स आणि रिव्ह्यू साइट्सची चिंता त्यामुळे वाढली आहे. उदाहरणार्थ, दिलेल्या बजेटमध्ये फ्लाइट्स आणि निवासासह सुट्टीची योजना ‘एआय’ला विचारून मी एकच सर्वंकष उत्तर मिळवू शकतो, तर मग मी बुकिंग किंवा ट्रॅव्हल साइट्सवर कशाला जाईन?

ज्या वेबसाइट्सवर लोक जाहिरातींद्वारे कमाई करत होते, त्यावर क्लिक करणे हाच इंटरनेट चालवण्याचा मार्ग होता, ती प्रणाली आता संकटात आहे. भविष्यातील इंटरनेट आजच्या इंटरनेटपेक्षा खूप वेगळे असू शकते. विविध वेबसाइट्सनी आपला डेटा आता ‘पेवॉल्स’मागे सुरक्षित ठेवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे इंटरनेटवरील (फुकट) माहितीचा स्रोत कमी होत आहे. कंटेंट निर्माते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ई-मेल्स, सोशल मीडिया आणि वैयक्तिक संपर्क यांचा वापर करू लागले आहेत. अनेक खटले सुरू आहेत. परंतु, लहान साइट्सही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, ज्यांच्याकडे या आघाडीवर लढण्याची क्षमता नाही.

‘एआय’चे वापरकर्ते म्हणून आपल्याला फक्त ‘एआय’च्या उत्तरांवर अवलंबून राहण्याचे धोके लक्षात ठेवले पाहिजेत. ‘एआय’ची उत्तरे अनेकदा चुकीची, पक्षपाती आणि चुकीची असू शकतात, हे सर्वज्ञात आहे. एआय अनेकदा माहितीचा स्रोत देत नाही आणि पारंपरिक वेबसाइट्सप्रमाणे दिलेल्या माहितीची ‘मालकी’ आणि जबाबदारी ते घेत नाहीत. आपण ‘एआय’ला विचारलेले प्रश्न कसे संग्रहित केले जातात किंवा वापरले जातात हे अजूनही अज्ञात आहे. ज्यामुळे गोपनीयतेबद्दल चिंता निर्माण होते. 
पारंपरिक इंटरनेट रूपांतरित होत असताना, त्याऐवजी काय येणार हे संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचे आहे. जर खुल्या इंटरनेटचा अविश्वसनीय स्रोत हळूहळू नाहीसा झाला, तर सगळ्यांसाठी ती एक मोठी शोकांतिका असेल.

Web Title: Article: Have you started using Google less lately?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.