लेख: घरात 'या' गोष्टी करा, तरच तुमचे काही खरे असेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:51 IST2026-02-22T11:46:25+5:302026-02-22T11:51:31+5:30
पूर्वी खाणे-पिणे घरी व मलमूत्र विसर्जन बाहेर असायचे. आत्ताच्या काळात जागेअभावी अगदी उलट परिस्थिती आहे.

लेख: घरात 'या' गोष्टी करा, तरच तुमचे काही खरे असेल...
- डॉ. सुहास वामनराव कुलकर्णी (सदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया)
घर असावे आरोग्यदायी, निरोगी प्रत्येक सदस्य, कानाकोपऱ्यातील स्वच्छता, ठरेल जीवजंतूचा कर्दनकाळ
प्रत्येक कुटुंबासाठी घर हे जसे, शांतता, समाधान, सुख-समृद्धी बहाल करणारे असावे तसेच ते आरोग्यदायीही असावे. हे सहज साध्य होऊ शकते ते घरातील स्वच्छतेमुळे. पूर्वी घरे कुटुंबाप्रमाणे खूपच मोठी होती. पुढील दार, अंगण, ओसरी, घर, माजघर, परसकड, मागील दार असे विज्ञानाधारित विभाजन असे. काळ बदलला तशी कुटुंबाची व्याख्याही बदलली. घरे लहान झाली; पण गरजा अपार वाढल्या.
कुटुंबातील प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात, उदा. झोपेतून उठण्याच्या, जागण्याच्या, झोपण्याच्या, कामाच्या, खाण्यापिण्याच्या, रात्री-अपरात्री घरी येण्या-जाण्याच्या, कपडे परिधानाच्या. हे सर्व सांभाळताना वेळेचा ताळमेळ बसत नाही व त्यातून निर्माण होते घरातील अस्ताव्यस्तता व अस्वछता. त्यामुळे आरोग्य बिघडते. घरातील स्वच्छतेचे सूक्ष्मजीवशास्त्रीय ऑडिट करून घेण्याला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. यात हवा, पाणी, अन्न, वस्त्र व निवारा यांचे विज्ञानाधारित चाचणीयुक्त परीक्षण केले जाते.
पूर्वी खाणे-पिणे घरी व मलमूत्र विसर्जन बाहेर असायचे. आत्ताच्या काळात जागेअभावी अगदी उलट परिस्थिती आहे. अर्थात शौचालये घरात आल्याने त्यापासून होणाऱ्या संसर्गाच्या अगदी जवळ मानव पोहोचला. त्यामुळे 'युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन'च्या केसेस व 'अँटिबायोटिक रेसिस्टन्ट'चे प्रमाण वाढलेले दिसून येते. घरातील बाथरूम व शौचालये ही रोगकारक जंतुविरहित आहेत का? हे तपासणे क्रमप्राप्त आहे.
घरातील हवा कितपत शुद्ध आहे? धूलिकणांचे, परागकणांचे प्रमाण किती आहे? हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच घरातील उपकरणांची, स्वयंपाक बनवण्याच्या जागेची, ड्राय बाल्कनीची, बेडरूमची, फरशींची, भिंतींचीही स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. घरातील सदस्य जर वरचेवर आजारी पडत असतील व सर्दी, खोकला, अॅलर्जी, पोटाचे विकार, स्कीन इन्फेक्शनमुळे त्रस्त असतील तर या आजारासाठी कारणीभूत जंतू घरात आहेत, हे नक्की.
या नेमक्या गोष्टी कराव्यात...
नेमाने घराच्या कानाकोपऱ्यातील स्वछता करावी.
घरातील फरशा पुसताना त्यात योग्य प्रमाणात जंतुनाशक आहे, याची खात्री करावी.
पडदे, पांघरुणे ठराविक कालावधीत धूत जावे.
कपाटातील कपड्यांना वारा-ऊन देत जावे.
बाथरूम व टॉयलेट रोज स्वच्छ करावे.
अन्नाचा व धान्याचा साठा टाळावा. ताजे स्वच्छ व शिजवलेल्या अन्नाला प्राधान्य द्यावे.
गरज भासल्यास पेस्ट कंट्रोल करून घ्यावी.
आपल्या आरोग्य बदलाची वेळीच दखल घ्यावी.