लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर

By यदू जोशी | Updated: June 6, 2025 08:19 IST2025-06-06T08:19:02+5:302025-06-06T08:19:43+5:30

उद्धव ठाकरे राजबरोबर गेले तर?- या शंकेने काँग्रेस, शरद पवार गट त्रस्त! भाजपबद्दल एकनाथ शिंदे साशंक, भाजप आणि काका ‘संवादा’चा पुतण्याला घोर!

Article about Maharashtra Politics Mahayuti Mahavikas Aghadi and future combinations | लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर

लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाराष्ट्राच्याराजकारणात आज मित्रांच्या ज्या जोड्या आहेत त्या ऑक्टोबर वा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत थोड्याफार बदलतील. ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा,’ असे काहींच्या बाबतीत घडू शकते. गुलाबाच्या झाडाला चाफ्याची फुले लागू शकतात. महाराष्ट्राच्याराजकारणात काहीही घडू शकते; हा अलीकडील वर्षांचा अनुभव आहेच निवडणूक जवळ येईल तसे पोळे फुटेल. राज्यपातळीवर एक युती/ आघाडी दिसेल; पण जिल्ह्याजिल्ह्यांत भलतेच चित्र राहील. गेली साडेतीन वर्षे रिकामे असलेले अनेक नेते, कार्यकर्ते निवडून येण्यासाठी आसुसलेले आहेत. त्यामुळे बंडखोरांचे पेव फुटेल.

मुळात सत्तेत असलेल्या महायुतीतील तीन पक्ष आणि सत्तेबाहेर असलेली महाविकास आघाडी हे दोन्ही आपापल्या मित्रांबद्दल सध्या साशंक आहेत. आहेत सोबत; पण एकमेकांविषयी त्यांना संशय आहे. उद्धव ठाकरे हे राजबरोबर जातील आणि आपल्याला अंगठा दाखवतील असे काँग्रेस, शरद पवार गटाला वाटते. शरद पवार-अजित पवार मनोमिलन होईल अन् आपण हात चोळत बसू, अशी शंका काँग्रेस अन् उद्धवना वाटते. महाविकास आघाडीचे निर्माते/ दिग्दर्शक शरद पवारच होते, तेच गेले तर ही आघाडी राहणार नाहीच. बिचारी काँग्रेस! तिच्याबद्दल मात्र कोणाला तसे काही वाटत नाही. त्यांना नवीन मित्र मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आहेत त्यांना सोबत राहू दे रे देवा! अशी प्रार्थना करण्यापलीकडे त्यांच्या हाती काही नाही.

भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांची स्थिती आणखीच वेगळी आहे. भाजपबद्दल एकनाथ शिंदे साशंक आहेत. दोन ठाकरेंनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकले तर आपले काय होईल, ही चिंता त्यांना सतावत असणार. अजितदादांना शरद पवारांसाेबत जायचे नाही; पण काकांकडे लोकसभेचे आठ खासदार आहेत म्हणून भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने दोघांना एक व्हायला सांगितले किंवा काकांना सोबत घेतले तर आपली पंचाईत होईल, असे अजितदादांना वाटत असणार. मुख्यमंत्रिपदाची इच्छा मनात बाळगून असलेले एकनाथ शिंदे कोणती पावले टाकतात, याविषयी भाजप सतर्क असेल. अशाप्रकारे सध्याचा काळ मित्रांनी मित्रांबाबत साशंक असण्याचा आहे. 

संदीप देशपांडे, अमित ठाकरे बोलल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. एकत्र यायचे असेल तर तुम्हाला काँग्रेसची साथ सोडावी लागेल, अशी अट राज यांनी टाकली आहे म्हणतात. म्हणजे नवीन साखरपुडा करायचा असेल तर आधीचे लग्न मोडावे लागेल. काँग्रेसचा हात सोडला तर गेल्या दोन निवडणुकांत मुस्लिमांनी भरभरून दिलेली मते हातून जाण्याची भीती आहेच. त्या नुकसानीची भरपाई राज करून देतील का, याचे गणित मातोश्री नक्कीच मांडत असेल. ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे जसे त्यांचे हिशेब आहेत, तसे इतरांचेदेखील आहेत. एकनाथ शिंदेंना चाप लावायचा असेल तर मातोश्री-शिवतीर्थ एकत्र येण्याच्या प्रयत्नांना भाजप हवा देईल. राज-उद्धव संदर्भातील सर्व हालचालींवर म्हणून तर शिंदे दुर्बीण लावून बसले आहेत. 

धुळ्याचा धडा काय घेतला?

अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या सर्किट हाउसवरील खोलीत १ कोटी ८४ लाख रुपये सापडल्याच्या प्रकरणातून विधानमंडळाने काहीही धडा घेतलेला दिसत नाही. आमदारांच्या वर्तनाची चौकट निश्चित करण्यासाठी नीतिमूल्य समिती स्थापन करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्याला विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुजोरा दिला होता; पण अद्याप समिती काही झाली नाही. अंदाज समितीच्या निमित्ताने विधानमंडळाची बदनामी झाली हे लक्षात घेता विधानमंडळाच्या विविध समित्यांचे  अध्यक्ष आणि सदस्य आमदार यांच्यासाठी काही आचारसंहिता शिंदे-नार्वेकर लगेच तयार करतील ही अपेक्षाही फोल ठरली आहे. तो पीए पाटील आहे ना; तसे दोनचार बदमाश कर्मचारी, अधिकारी आहेत विधानभवनात. त्यांच्या पार्श्वभागावर लाथ का मारली जात नाही? धुळ्याच्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हायची आहे; पण अजून एसआयटी लागली नाही. देशभरातील अंदाज समित्यांची दोन दिवसांची बैठक जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत होत आहे. त्यापूर्वी तरी नीतिमूल्य समिती अन् एसआयटी करा. 

Web Title: Article about Maharashtra Politics Mahayuti Mahavikas Aghadi and future combinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.