‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:26 IST2025-03-18T09:25:37+5:302025-03-18T09:26:13+5:30

एअर इंडियाला गंभीर शस्त्रक्रियेवाचून तरणोपाय नाही. जगात अग्रगण्य ठरायचे असेल तर या ७९ वर्षांच्या बाळाने खरेखुरे ‘टाटा’पण स्वतःत मुरवून घेतले पाहिजे.

article about Air India flight situation | ‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी

‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार -

भारतीय स्वातंत्र्याच्या नव्या निळाईत एका नव्या महाराजाने नभांगण काबीज केले.  पिळदार मिशांचा, ऐटबाज फेटा बांधलेला हा सदाबहार शुभंकर एअर इंडियासाठी बॉबी कुका यांनी घडवला होता.  हवाई प्रवासातील आतिथ्याचे तो देशी प्रतीक बनला. कालांतराने  त्याची तेजस्वी प्रतिमा  काळवंडून गेली.   नफा कमी होत तोटा वाढू लागला. एअर इंडियाचा तोटा हळूहळू ७०,००० कोटी रुपयांवर पोहोचला. अखेरीस पूर्वसूरींचे वचन मोदींनी पूर्ण केले. अकार्यक्षमता आणि तोटा यांच्या जोखडातून ‘महाराजा’ला मुक्त केले.

भारतीय उद्योगजगताचे आद्य सम्राट असलेल्या टाटांनीच एअर इंडिया १७,००० कर्मचाऱ्यांसह आपल्या ताब्यात घेतली; पण दुर्दैवाने महाराजा अधिकच जर्जर झाला. अधिक हालअपेष्टा त्याच्या नशिबी आल्या.

 गैरव्यवस्थेपायी प्रवाशांच्या संतापाला तोंड द्यावे लागत नाही असा दिवस एअर इंडियाच्या कारभारात क्वचितच  उजाडतो.  तज्ज्ञ अधिकारी  दिमतीला घेऊन नवे धनी   त्रुटींचा शोध घेत असतानाच नवनव्या समस्या ‘आ’वासून उभ्या राहत आहेत. या समस्या कमी होणं दूरच, दिवसेंदिवस त्या अधिकाधिक वाढतच गेल्या.

शुभंकर म्हणून ‘महाराजा’ मिरवणारी  ही  विमान कंपनी फार पूर्वीपासून  देशाच्या अस्मितेचे प्रतीक मानली जाते; परंतु   संचालन आणि सेवेतील  गडबड- घोटाळ्यांमुळे तिची  प्रतिमा आता  काळवंडून गेली आहे. कर्मचाऱ्यांच्या  कमतरतेमुळे उड्डाणांना सतत होणारे विलंब, ती रद्द होणे अशा  अनेक समस्या  कंपनीपुढे आहेत. त्यामुळे तिचा  विस्तार,  विकास आणि जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठीच्या  महत्त्वाकांक्षी योजना धोक्यात येत आहेत.

योग्य सोयी-सुविधा नसल्याने, प्रवाशांकडे दुर्लक्ष होत असल्याने, त्याचप्रमाणे त्यांच्या मागण्यांना कायमच वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याने प्रवासी सातत्याने संतापत असतात. जुनाट केबिन्स, खराब सुविधा आणि निकृष्ट सेवा याबद्दलच्या तक्रारी सतत समोर येतात.  ५ मार्चला कंपनीचे शिकागोहून दिल्लीला येणारे विमान मध्येच वळवून मूळ ठिकाणी परतवावे लागले. कारण विमानातील शौचालये नादुरुस्त झाली होती. याचा अर्थ, विमाने जुनी होत आहेत. त्यांची देखभाल योग्य त्या पद्धतीने होत नाही. प्रवाशांना आवश्यक त्या सुविधांचा  दर्जा वाढवण्याकडे  पुरेसे लक्ष दिले जात नाही. 

गेल्या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेच्या दीर्घ प्रवासात  असाच एक वैतागवाणा अनुभव  जुन्या  बोईंग ७७७ मधील प्रवाशांच्या वाट्याला आला. समोरची करमणूक यंत्रणा बिघडली होती आणि  आसने मोडकळीस आलेली होती. आधुनिकीकरणाच्या मंद गतीमुळे अनेक प्रवाशांना उड्डाणकाळात असे निकृष्ट अनुभव सोसावे लागत आहेत.  एअर इंडियात तांत्रिक वैगुण्येही सातत्याने समोर येताना दिसतात. विमानांचे मार्ग बदलावे लागतात, आपत्कालीन उपाय करावे लागतात.

   एअर इंडिया आज कात टाकण्याच्या अवस्थेत असताना या बाबी उगाळून तिच्या त्रासात भर टाकू नये, हे खरे. विमानांची कमतरता हे या समस्यांचे मुख्य कारण आहे.  इंडिगो या स्पर्धकाकडे ४२५ विमाने असताना एआयकडे केवळ १४० च आहेत. एमिरेट्ससारख्या जागतिक स्पर्धकापुढे तर हा आकडा अगदीच खुजा ठरतो. त्यातून पुन्हा त्यापैकी बोईंग ७७७ आणि त्याहून जुनी A३२० अशी  खूप सारी विमाने कालबाह्य झालेली आहेत.

हेही खरे, की एअर इंडियाने काही उत्तम बदलही घडवून आणलेत.  टाटांच्या नेतृत्वाखाली  महसूलात २५% वाढ, तोट्यात ५०% घट आणि  तसेच आर्थिक स्थिरस्थावर  दर्शवणारी  विमानांची महत्त्वाकांक्षी  ऑर्डर अशा अनेक सुधारणा  नक्कीच झाल्या. देशांतर्गत बाजारातील कंपनीचा  वाटा २०२२ ला ८.७टक्के होता,  तो २०२३ ला ९.७ टक्क्यांवर गेला.  वेळेवर विमाने सुटण्याचे प्रमाण २०२१ मध्ये ७०% होते ते २०२२ ला ९०% झाले. टाटांची शिस्त आणि आवाका यांचा लौकिकच याला अंशतः कारणीभूत आहे. पण  ४०% कर्मचारीवर्गाची सार्वजनिक उपक्रमातून आलेली बाबू मानसिकता पुरती पुसणे टाटांना अद्याप जमलेले नाही, असे दिसते.

अन्य आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या तुलनेत  एअर इंडियाचे  एक विशेष  बलस्थान आहे. आंतरराष्ट्रीय स्लॉटमधील आपला सगळा वाटा तिने अजून वापरात आणला नसल्याने बहुसंख्य  भारतीय प्रवाशांची ती पहिली पसंत बनू शकेल. जगात अग्रगण्य ठरायचे असेल तर  या  ७९ वर्षांच्या  बाळाने खरेखुरे ‘टाटा’पण  स्वतःत मुरवून घेतले पाहिजे, हे मात्र खरे!

Web Title: article about Air India flight situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.