अस्वस्थ आहात? आज ना उद्या हे चित्र बदलेल..पण कसे?; छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देणं महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:12 IST2026-04-29T09:12:03+5:302026-04-29T09:12:27+5:30
राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म या तीन गोष्टी सज्जनांना एकत्र आणतात, पण अनेकदा दुर्जनही याच तीन गोष्टींचा आधार घेऊन आपला डाव साधतात!

अस्वस्थ आहात? आज ना उद्या हे चित्र बदलेल..पण कसे?; छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देणं महत्त्वाचे
डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता,
महाराष्ट्र अंनिस
राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म या तीन गोष्टींच्या बाबतीत माणसाचे मन खूप हळवे असते. जगाच्या इतिहासात डोकावून बघितले तर आपल्या लक्षात येऊ शकेल की बहुतेक वेळा या तीन गोष्टींनी स्वतंत्रपणे अथवा एकत्रित येऊन लोकांना एकत्र आणण्याचे काम केले गेले आहे. ज्यावेळी हे एकत्र येणे काही चिरंतन मानवी मूल्यांना पुढे नेणारे असते तेव्हा जगात खूप मोठ्या गोष्टी घडून येतात.
राष्ट्र कल्पनेला धरून लढवले गेलेले भारतासारख्या देशाचे स्वातंत्र्यलढे हे याचे उत्तम उदाहरण आहेत. राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म यांची गंमत अशी आहे की याच तीन गोष्टी जसे सज्जनांसाठी एकत्र येण्याचे महत्त्वाचे कारण असू शकतात तसेच अनेकवेळा दुर्जनदेखील याच तीन गोष्टींचा आधार घेऊन आपला डाव साधत असतात !
जर्मनी, इटली, रशिया, कंबोडिया अशा अनेक ठिकाणी हे घडलेले आहे. सध्याच्या कालखंडात आखातातील देशांवर इस्त्रायल आणि अमेरिकेने लादलेले युद्ध हेदेखील याचेच एक उदाहरण. भारतासह आशिया खंडातील अनेक देशांच्या राष्ट्र कल्पना आणि धर्म यांचा वापर करून आपले राजकारण पुढे ढकलण्याचे प्रयोग चालूच आहेत अशा परिस्थितीमध्ये केवळ चांगुलपणाच्या आधारे मानवी मूल्यांना धरून आपल्या आजूबाजूचे जग चालावे, असे वाटणाऱ्या लोकांना खूप हताशा येणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर हंगेरीसारख्या छोट्याशा देशात झालेला सत्ताबदल मात्र हे चित्र पालटू शकते असा आशावाद जागवणारा, मानवकेंद्री सज्जनपणावर आपला विश्वास वाढवणारा आहे.
त्याचे झाले असे की हंगेरीमधील गेली पंधरा वर्षे जणू एकाधिकारशाही राबवणाऱ्या व्हिक्टर ऑर्बान यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये निर्णायक पराभव झाला. अमेरिकेसारख्या सर्व शक्तिमान देशाचे पाठबळ, पंधरा वर्षांची अनिर्बंध सत्ता, जाणीवपूर्वक मोडकळीला आणलेल्या यंत्रणा, बळाचा आणि पैशाचा अनिर्बंध वापर या सगळ्याच्या विरोधात हंगेरीमधल्या लोकांनी भूमिका घेतली.
जगाच्या इतिहासात डोकावून पहिले तर आपल्याला यामुळे धक्का बसावा असे काही नाही. ज्यांच्या राजवटीवरचा सूर्य कधीही मावळत नव्हता त्या ब्रिटिशांच्या साम्राज्याचा अंत झाला. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिनपासून अनेक एकाधिकारशहांचाही पराभव झाल्याचे दाखले फार जुने नाहीत. राष्ट्र विचारधारा किंवा धर्म यांच्या गारुडातून बाहेर पडायला लोक वेळ घेतात, पण आज ना उद्या ते स्वत:चा विचार करू लागतात. एकदा का योग्य विचारांनी जनसमूहांची पकड घेतली की मग भल्या भल्या दमनकारी राजवटीदेखील चुटकीसरशी कोसळू शकतात. लोक बदल घडवून आणतात- हाच हंगेरीतील सत्ता बदलाचा सांगावा आहे. आज ना उद्या हे चित्र पालटेल या भावनेने आपण आशावादी राहणे आणि आपल्या पातळीवर छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देत राहणे मात्र महत्त्वाचे आहे.
hamid.dabholkar@gmail.com