आपल्या तरुण मुलांकडे आपले पुरेसे लक्ष आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 04:48 IST2025-10-20T04:48:07+5:302025-10-20T04:48:51+5:30
चाळिशीत आजारी पडणारी मोठी लोकसंख्या, की आनंदी लोकांचा चैतन्यमय समाज?- यातली निवड आता, आजच करायला हवी आहे!

आपल्या तरुण मुलांकडे आपले पुरेसे लक्ष आहे का?
डॉ. गौरी करंदीकर, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अडोलसंट हेल्थ (IAAH) तर्फे जगभरात १३ ते १९ ऑक्टोबर हा ‘जागतिक पौगंड आठवडा’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचे घोषवाक्य आहे : Thriving Inside and Out -Strengthening Adolescent Physical And Mental Health. १२-२५ वयोगटातील तरुण मुले आणि मुली. या तरुण मंडळींना असलेल्या सुखसोयी आधीच्या पिढ्यांच्या तुलनेने जास्त दिसत असल्या तरी त्यांना येणाऱ्या अडचणी - आरोग्य, करिअर, सामाजिक नातेसंबंध, मैत्री- या अनेक पटीने जास्त आहेत. या अडचणींचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो.
आर्थिक सुधारणा, शहरीकरणामुळे खाण्यापिण्याची उपलब्धता वाढली आहे. परंतु, भारतातल्या या वयोगटात ॲनिमियाचे (शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता) प्रमाण वाढते आहे. एकीकडे स्थूलता आणि दुसरीकडे अत्यंत कमी वजन असा विरोधाभास मोठा आहे. जंकफूडचे प्रमाण वाढल्याने आहारात जीवनसत्त्वांची कमतरता मोठी आहे. आपण काय खावे यावर सोशल मीडिया, मित्रमंडळींचा प्रभाव असल्याने परिस्थिती अवघड होते. व्यसनांना आलेली प्रतिष्ठाही वाढते आहे. तरुणांत मानसिक अस्वास्थ्य भयावह रीतीने वाढताना दिसते. तासनतास स्क्रीनसमोर बसल्याने मान आणि पाठीचे विकार वाढत आहेत. त्यात घरातून अभ्यास आणि ट्युशनचे प्रेशर, सोशल मीडियाचे व्यसन यामुळे तरुणांमध्ये पीसीओएस आणि मेटॅबोलिक सिंड्रोम म्हणजेच वाढलेले कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि स्थूलता याचे परिणाम दिसू लागले आहेत.
आयुष्याला स्थिरता देणारी चांगली मैत्री अभावाने मिळते. जोडीदाराबरोबरच्या नात्यामध्ये स्थैर्य आणि विश्वास असेल याची शाश्वती नाही. यामुळे मन कायम संभ्रमावस्थेत असते. कौटुंबिक वातावरण एकलकोंडे, त्यातून शिक्षण आणि नोकरीसाठी एकटे राहण्याची वेळ, आपले घर सोडून इतर शहरांमध्ये इतर देशांमध्ये राहण्याची गरज आणि एक महत्त्वाकांक्षा यामुळे मुलांना अनेक वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दक्षिण आशियामध्ये प्रत्येकी ४ पैकी १ तरुण व्यक्ती एकटेपणा बरेच वेळा अनुभवते, असा निष्कर्ष लॅन्सेटमधल्या संशोधनात प्रसिद्ध झाला आहे.
बदलत्या जागतिक परिस्थितीचा व्यक्तिगत आयुष्यातील शिक्षण, नोकरी यावर होणारा परिणाम हा या वयातल्या काळजीचा एक नवाच मुद्दा! त्यातूनही ताण आणि मानसिक अस्वास्थ्य वाढते. हे बदल आता शहरातून ग्रामीण भागातही झिरपले आहेत. महाराष्ट्रामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ग्रामीण मुला-मुलींपैकी २१ टक्क्यांमध्ये नैराश्याचे प्रकार दिसून येतात, शहरांमध्ये २५ टक्के मुले ही नैराश्याला बळी पडलेली आहेत.
एकुणातच तरुण वयात जगण्यासाठी धडपड करण्याची वेळ या मुलांवर आलेली आहे. म्हणूनच यावर्षीच्या पौगंड आठवड्याचे घोषवाक्य आहे thrive म्हणजे नुसतं survive नव्हे, तर आनंदाने, मनमोकळेपणाने, उदार मनाने जगणे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघणे. शरीराच्या स्वास्थाबरोबरच मनाच्या स्वास्थ्याकडेही लक्ष देणे! मनातून उमेद असणे, जग एक्सप्लोर करण्याची जिद्द असणे, आनंदी व मोकळ्या श्वासाने जगणे या गोष्टी तरुण मनांमध्ये रुजवण्याची गरज आहे.
एक कुटुंब म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचा आहार, विहार, झोप, डिजिटल माध्यम वापरण्याची संस्कृती आणि मुलांच्या मानसिक स्वास्थ्याकडे बारीक लक्ष असणे गरजेचे, अपेक्षित आहे. शाळांमध्ये मैत्री व मित्रपरिवार जपणे, व्यायाम, खेळायचे तास, जीवनकौशल्ये शिकणे यांना प्राधान्य देणे जरुरी आहे. लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या जास्त असणे पुरेसे नाही, तरुण पिढीचा पाया शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम असेल तरच आपला देश आणि हा समाज सक्षमपणे पुढे जाऊ शकतो. चाळिशीत आजारी पडणारी एक मोठी लोकसंख्या की आनंदी, उत्साही लोकांचा चैतन्यमय समाज?- यातली निवड आपल्याला आता, अगदी आजच करायला हवी आहे! khrc@hotmail.com