हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

By विजय दर्डा | Updated: July 21, 2025 06:57 IST2025-07-21T06:56:43+5:302025-07-21T06:57:41+5:30

विधानभवन परिसरात हाणामारी होऊन उघडपणे शिव्या दिल्या गेल्या, त्यातल्या निर्लज्जपणाने अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.

Are these Party Members or gangs of goons Clash Between BJP MLA And NCP SP Leader At Vidhan Bhavan | हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

- डाॅ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह


महाराष्ट्र विधानभवनाच्या परिसरात गेल्या आठवड्यात आमदारांच्या समर्थकांमध्ये मोठी मारामारी झाली. एकमेकांना आई-बहिणीवरून शिव्या देत कपडे फाडले गेले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राजकीय कार्यकर्ते हे असे वागू शकतात? हे कार्यकर्ते होते की गुंडांची टोळी, या प्रश्नाने जनभावना संतप्त आहे. 

ज्या लोकांवर आरोप होत आहेत, त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव बाबा टकले यांच्याविरुद्ध आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत. टकले यांच्यावर  कारवाईही झालेली आहे. या दोघांना आणि इतरांना विधानभवनात येण्याची परवानगी कशी मिळाली? - हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. टकले यांच्याकडे तर विधानभवनात प्रवेशाचा पासही नव्हता. सुरक्षेच्या संदर्भात हे फार गंभीर आहे. 

संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर अगदी विधानभवनातही सुरक्षा व्यवस्था काटेकोर असली पाहिजे, असा आग्रह सुरू झाला. पास नसेल तर कुणालाही विधानभवनात प्रवेश करता येऊ नये. परंतु या घटनेने  नवीन चिंता उत्पन्न केली आहे. हल्ली म्हणे पाच ते दहा हजार रुपये देऊन पास मिळतात. हे खरे आहे? एका पक्षाचे म्हणणे असे, की हे सारे अचानक झाले. दुसऱ्या पक्षाचे म्हणणे, ही घटना सुनियोजित होती.  कुणाच्या बाजूने कोणाकडून आधी तयारी केली गेली होती, कोणाला जास्त मारले, कोणी आई-बहिणीवरून जास्त शिव्या दिल्या, कोणत्या पक्षाच्या समर्थकांचे कपडे जास्त फाटले याने काहीही फरक पडत नाही. हा चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे?- यापूर्वीही विधानसभेत जोरदार वादविवाद झाले आहेत. गोंधळ झाला आहे. पेपरवेटही फेकण्यात आले आहेत, पण अशी लाजिरवाणी घटना याआधी कधी घडलेली नाही. ‘या घटनेमुळे आमची मान खाली गेली आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते अगदी बरोबर आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशा प्रकारच्या घटना होत असतात; परंतु त्यापासून महाराष्ट्र दूर होता. या राज्यात ही नवी विकृती आली कुठून? 

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांची हजेरी घेतली आणि यापुढे विधानभवनात आगंतुकांना येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे जाहीर केले. ‘मंत्र्यांनी विधानसभेत बैठका करू नयेत, त्या मंत्रालयातच कराव्यात’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या. परंतु, प्रश्न केवळ विधानभवनाचा नाही. प्रश्न तर महाराष्ट्रातील राजकारणाच्या बदलत्या स्वरूपाचा आहे. आजवर आपण महाराष्ट्रात राजकीय पावित्र्याचा  अभिमान बाळगत आलो. मी देशभर फिरतो; परदेशातही जातो आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या पवित्र्याबद्दल अभिमानाने बोलतो. पण आता? आपल्या राजकारणावर गुन्हेगारी प्रवृत्तीची काळी सावली पडली आहे काय, अशी शंका माझ्या मनात येते. राजकारणात गुंडगिरी करणाऱ्या काही लोकांना माझे हे म्हणणे खटकू शकते. परंतु, त्यातील वास्तव कोणाला नाकारता येईल? देशातील दुसऱ्या राज्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याकडचे राजकारणही गुन्हेगारीची शिकार होते आहे हे वास्तव नाही का? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या २८६  आमदारांपैकी ११८ जणांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत, हे वाचून मी हैराण झालो. समग्रतेने विचार करायचा तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासाठी कोणत्याही एका पक्षाला दोषी ठरवता येणार नाही.

राजकारणात सर्वच पक्ष सतराशे-साठ प्रकारचे उद्योग करतात आणि सगळे काही एकाच उद्देशाने केले जाते.., ते म्हणजे निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकणे ! सत्तेच्या शिखरावर टिकून राहायचे असेल तर जिंकून येण्याची क्षमता असलेली व्यक्ती जरी गुन्हेगारीचा डाग लागलेली असेल तरीही तिला आम्ही तिकीट देऊ. साम, दाम, दंड, भेद हेच राजकारणाचे स्वरूप झाले आहे. सर्व राजकीय पक्ष गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांकडे काणाडोळा करतात. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. आपल्या वागण्यामुळे नवीन पिढी काय शिकेल याचाही विचार अनेक आमदारांच्या  मनात येत नाही. संजय गायकवाड यांचेच प्रकरण पाहा. त्यांनी कँटीनमधील एका माणसाला किती भयंकर रीतीने मारले! खाद्यपदार्थ चांगले झाले नसतील; परंतु त्यासंबंधी तक्रार करण्यासाठी सभागृहाची एक समिती आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार या आमदारांना कुणी दिला? 

साध्या-सरळ समर्पित कार्यकर्त्यांच्या जागी बेधडक मारपीट करण्याची क्षमता असलेले लोक राजकारणात घुसले आहेत हेच वास्तव आहे. गुंडगिरी ज्यांच्या रक्तात असते, अशा नामचीन लोकांना हल्ली नेते पाळतात आणि अनेकजण बेशरमपणे असेही म्हणतात, की त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आम्ही त्यांना बरोबर ठेवत आहोत. 

ळूहळू या गुंडांच्या फौजेवर राजकारण्यांचे नियंत्रण राहिले नाही तर ते राजकारणाला आपली दासी करतील. कार्यकर्त्यांच्या नावावर जोवर गुंडांची फौज तयार होत राहील तोवर सामान्य जनतेला शरमेने मान अशीच खाली घालावी लागेल.

Web Title: Are these Party Members or gangs of goons Clash Between BJP MLA And NCP SP Leader At Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.