शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दृष्टिकोन: चिमुकल्यांचा आश्वासक ‘वन्स मोअर’ दुर्लक्षू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:33 IST

वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सने मुलांचा बदलता कल लक्षात घेऊन अनेक परीकथा अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे पडद्यावर साकार केल्या.

संदीप प्रधानअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जुने समीकरण आहे. त्यामुळे ९३व्या संमेलनातही अध्यक्षांच्या निवडीपासून ठरावांच्या विषयांपर्यंत वादविवाद झडलेच. मात्र, या वादविवादांच्या वावटळीत एक गोष्ट दुर्लक्षित राहिली आणि ती म्हणजे बालकुमार मेळाव्यात बालकविता, गोष्टी यांना लहानग्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मोठ्यांच्या वादांचा लवलेश त्या मेळाव्याला नव्हता. अनेक कवितांना छोट्यांनी ‘वन्स मोअर’ दिला आणि कवींनी ही आग्रहाची मागणी अव्हेरली नाही.

आपल्याकडे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते व त्याचे व्यासपीठ हे बालसाहित्याच्या चर्चेकरिता उपलब्ध असते. मात्र, अखिल भारतीय संमेलनातही एक कोपरा बालसाहित्यिक व बालरसिक यांना लाभला, हे स्वागतार्ह आहे. बालसाहित्याचा विचार केला तर सानेगुरुजी किंवा विंदा करंदीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचा उल्लेख टाळणे अशक्यच आहे. आजही बालसाहित्याचा विचार करायचा तर राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, दिलीप प्रभावळकर, विजया वाड, अनंत भावे, एकनाथ आव्हाड यांच्याच साहित्यकृती बालगोपाळांमध्ये लोकप्रिय आहेत. मुळात बालसाहित्य लिहिणे, हे प्रचंड आव्हानात्मक आहे. बालकांच्या मनोव्यापाराचा विचार करून त्यांना भावेल, रुचेल, आवडेल असे लिहिणे हे वाटते तितके सोपे नाही. मुलांकरिता पुस्तके प्रसिद्ध करायची तर ती रंगीबेरंगी चित्रांनी नटलेली, आकर्षक असायला हवी. छपाईचा खर्च आणि पुस्तकांचा खप हे गणित जुळणे गेल्या काही वर्षांत अवघड झाल्याने मोठ्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीवरच सावट असताना लहानग्यांची गुळगुळीत कागदावरील, रंगीत पुस्तके छापणे टाळण्याकडे कल वाढला आहे.

श्यामची आई यांसारखे पुस्तकही एकेकाळी शाळाशाळांमध्ये हेतुत: खपवल्याने खपाचे व लोकप्रियतेचे विक्रम करू शकले. नाटकांची पुस्तके नाटकांचे प्रयोग होतात तेथे किंवा लहान मुलांची पुस्तके शाळाशाळांमध्ये खपवण्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. बऱ्याचदा प्रकाशक पुस्तके छापतात, मात्र त्याच्या खपाकरिता प्रयत्न करीत नाहीत. त्याचा फटका लेखकांना व चांगल्या पुस्तकांना बसतो. बालसाहित्याबाबत हेच दुखणे आहे.

गेल्या काही वर्षांत बहुतांश मुले ही टीव्ही, मोबाइल, गेम्स या विश्वात रमलेली दिसतात. अनेकदा मुलांच्या प्रश्नांची सरबत्ती नको किंवा त्यांनी मस्ती करू नये, याकरिता पालकही त्यांच्या हातात मोबाइल देतात किंवा कार्टून्स लावून देतात. त्यामुळे मुलांनी पुस्तके वाचावीत, ही मुळात पालकांचीच मानसिकता नसेल, तर मुलांच्या हाती पुस्तके कशी दिसणार? अनेक उच्चमध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये मुलांना मराठी बोललेले समजते. मात्र, ती इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याने त्यांना मराठी वाचता येत नाही. किंबहुना, एकेकाळी गणित हा विषय अनेक मुलांचा शत्रू नंबर एक असायचा, तर आता या मराठी मुलांना मराठी हा शत्रू नंबर एक वाटू लागला आहे. त्यामुळे जर अशी परिस्थिती असेल, तर बालसाहित्य कुणी व कुणाकरिता प्रसिद्ध करायचे, असा प्रश्न निर्माण होतो.

शहरात अशी परिस्थिती असली, तरी उस्मानाबादमध्ये बालकुमार मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद आश्वासक आहे. त्यामुळे राज्याच्या अन्य काही भागांत मराठी बालसाहित्याची भूक असलेला एक वर्ग निश्चित आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ ही कल्पना यशस्वीरीत्या राबवली व सध्या वेगवेगळ्या नाटकांचे शेकडो प्रयोग होत आहेत. ज्या मुलांना नाटक म्हणजे काय? ते सादर करण्याकरिता नाट्यगृहे असतात, याची गंधवार्ता नव्हती, अशा मुलांना नाट्य चळवळीशी जोडण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. वंचित घटकांमधील मुलांना साहित्य, नाट्यविषयक आवड आहे. परंतु, पोटाची भ्रांत त्यांना त्याकडे वळण्यास मज्जाव करते. ज्या वर्गाकडे पोटाची भ्रांत नाही, त्या वर्गाची बालसाहित्याची आवड शुष्क झाली आहे, असा पेच निर्माण झाला आहे. तरीही, वंचितांच्या रंगमंचावरील नाटकांची पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे.

वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सने मुलांचा बदलता कल लक्षात घेऊन अनेक परीकथा अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे पडद्यावर साकार केल्या. मुलांच्या अभिरुचीमधील बदल लक्षात घेऊन बालसाहित्य हे अशा पद्धतीने छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर आणण्याकरिता मातब्बर लेखक, निर्माते यांनी प्रयत्न करायला हवे. तरच, बालगोपाळांना काही दिल्याचा आनंद आपल्याला लाभेल.

(लेखक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन