खेर खरे बोलले; ...तर अतृप्तांचे करपट ढेकर म्हणून ग्लासभर सोडा पिऊन टीका पचवली असती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:34 AM2021-05-15T08:34:10+5:302021-05-15T08:35:46+5:30

खेर यांच्या पत्नी किरण या भाजपच्या खासदार आहेत. शिवाय खेर हे याच सरकारमध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिले आहेत.

Anupam Kher spoke the truth about Narendra Modi government | खेर खरे बोलले; ...तर अतृप्तांचे करपट ढेकर म्हणून ग्लासभर सोडा पिऊन टीका पचवली असती!

खेर खरे बोलले; ...तर अतृप्तांचे करपट ढेकर म्हणून ग्लासभर सोडा पिऊन टीका पचवली असती!

Next

ख्यातनाम पत्रकार करण थापर, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन हे बोलले असते तर धक्का बसला नसता. लॅन्सेट किंवा न्यू यॉर्करने ही टिपणी केली असती तर “देशातील ‘नामदार’ मंडळींनी विदेशी पत्रकारांना हाताशी धरून रचलेले षडयंत्र” असे समजून त्याकडे कानाडोळा केला असता. सुब्रह्मण्यम स्वामी किंवा अरुण शौरी यांनी ही शेरेबाजी केली असती तर अतृप्तांचे करपट ढेकर म्हणून ग्लासभर सोडा पिऊन ही टीका पचविली असती. मात्र, सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनीच कोरोना हाताळणीत केंद्र सरकारची गाडी रुळावरून घसरल्याची टीका केल्याने अन्य अनेकांना धक्का बसला. (Anupam Kher spoke the truth about Narendra Modi government)

खेर यांच्या पत्नी किरण या भाजपच्या खासदार आहेत. शिवाय खेर हे याच सरकारमध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिले आहेत. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी याच खेर यांनी ‘आयेगा तो मोदी ही’ असे ट्वीट करून ट्रोलर्सना  अंगावर घेतले होते.  त्यामुळे खेर यांनी ‘गुजरात के शेर’ नरेंद्र मोदी यांना का ललकारले, याचे अनेकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. गेले तीन आठवडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर अक्षरश: हाहाकार माजविला आहे. दररोज तीन लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. अनेकांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध होत नाहीत. व्हेंटिलेटर पुरेसे उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनअभावी मुंबई, गोव्यापासून दिल्लीपर्यंत शेकडोंचे बळी गेले आहेत, हे वास्तव आहे; पण हे चित्र देशातील ‘गोदी मीडिया’ व चाय-बिस्कुट पत्रकार हेतूत: निर्माण करीत असल्याचे उच्चरवात सांगण्याचे ठरलेले असताना संप्रदायातील खेर यांनी असा वेगळा सूर लावण्यामुळे संप्रदायात गोंधळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपल्या कर्कश्य ट्वीटमुळे ‘चिमणी उडाली भुर्र’ अशी अवस्था झालेल्या कंगना राणावत व तत्सम ट्विटरटोळांनी खेर यांना जाब विचारला नसला तरी आपण भलतेच पातक केल्याचे लक्षात आल्याने खेर यांनी सारवासारव करण्याकरिता ‘गलती उन्ही से होती हैं जो काम करते है, निकम्मो की जिंदगी तो दुसरो की बुराई खोजने मे ही खत्म हो जाती है’ असे ट्वीट केले. अर्थात ही खेर यांची पश्चातबुद्धी आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. खेर हे कलाकार आहेत. शिवाय त्यांना कुणाची खुशमस्करेगिरी करून खुर्ची टिकवायची नाही. त्यामुळे त्यांच्यातील संवेदनशील माणूस गंगेच्या पात्रात तरंगणारी प्रेते पाहून कळवळला असेल तर त्यात गैर काहीच नाही. 

जवळचे नातलग गमावल्यामुळे फोडलेला टाहो कानावर पडल्याने खेर यांच्या मनात चर्र झाले असेल, तर त्यात चूक काहीच नाही. आज अनेक भारतीयांच्या मनात कोविड हाताळणीबाबत संभ्रम, संताप आहे.  भारतामध्ये  विश्वगुरूंनी घडविलेल्या चमत्कारामुळे कुंभमेळ्यात डुबकी मारायला लक्षावधी लोक जमले. ऑस्ट्रेलियापासून वेस्ट इंडिजपर्यंतचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये आपली बॅट तळपेल या हेतूने भारतभूमीत दाखल झाले. पश्चिम बंगालमधील रणभूमीत विनामास्क प्रचार करणारे  गृहमंत्री अमितभाई शहा यांना पाहूनच अनेकांनी आपल्या तोंडावरील मास्क भिरकावून ते बाजारपेठांपासून सिनेमागृहात बिनदिक्कत फिरू लागले होते. अनेक कोविड केंद्रांना कुलूप ठोकले. 

ऑक्सिजन उत्पादन घटले. रेमडेसिविर व अन्य इंजेक्शनची मागणी आता संपली म्हणून औषध कंपन्यांनी उत्पादन बंद केले. मार्चअखेरीस अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. एप्रिल महिन्यात काही राज्यांमध्ये रुग्ण वाढले. त्यात महाराष्ट्र असल्याने व तेथे महाविकास आघाडीचे सरकार असल्याने टीकेला धार चढली. मात्र, अचानक राजधानी दिल्लीवर कोरोनाने स्वारी केली आणि प्रेतांच्या राशी रचल्या जाऊ लागल्या. व्हीव्हीआयपींना खाटा मिळणे मुश्कील झाले. राजकीय नेते, कलाकार, पत्रकार, लेखक असे अनेक जण अपुऱ्या सुविधा व बेफिकिरीचे बळी ठरू लागले तेव्हा अनेक जण बोलू लागले. नाराजीचा सूर देशभर घुमू लागला. वेगवेगळ्या देशांत लसीकरणाने यापूर्वीच गती घेतली असताना देशात लसींची बोंब असल्याचे पदोपदी जाणवू लागल्याने नाराजीचा सूर हा चीड, संताप, आक्रोश यामध्ये बदलू लागला. लसीकरणापेक्षा सेंट्रल व्हिस्ता पूर्ण करण्याची लगबग अधिक दिसल्यानेच खेर यांच्यासह अनेकांचा पारा चढला. हा प्रकल्प पूर्ण करण्यापेक्षा लसीकरण करण्याचा सूर आळवला गेला. अर्थात कोरोनाचा भर ओसरू द्या, देशात नव्या इव्हेंटचे वारे वाहू लागताच लोक सारे विसरतील यावर संप्रदायाची गाढ श्रद्धा आहे. त्या श्रद्धेवर खेर यांनी ओरखडा काढला हे मात्र निश्चित.
 

Web Title: Anupam Kher spoke the truth about Narendra Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app