न्यूयॉर्क ते नंदुरबार व्हाया धडगाव! देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झालेली असताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:01 IST2025-02-15T07:00:36+5:302025-02-15T07:01:06+5:30

अमेरिकेत वास्तव्य असलेला खान्देशचा तरुण ‘स्वदेश’ दर्शनाच्या ओढीने नंदुरबार भागातील पाड्यांवर चार दिवस फिरतो. त्याला काय दिसतं? - एक अस्वस्थ नोंद!

An Indian youth living in the US brought to light the plight of tribal people in the remote areas of Dhadgaon-Nandurbar | न्यूयॉर्क ते नंदुरबार व्हाया धडगाव! देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झालेली असताना...

न्यूयॉर्क ते नंदुरबार व्हाया धडगाव! देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झालेली असताना...

मुकेश भावसार, अमेरिकास्थित मनुष्यबळ 
विकास व्यावसायिक

गेली दोन वर्षे मी अमेरिकेत भरपूर फिरलो. भारत बराच बघून झाला होता; मात्र मूळचा खान्देशचा असूनही मी धडगाव-नंदुरबारच्या दुर्गम भागात कधी गेलो नव्हतो. भारतात दीड महिन्यासाठी आलो होतो. त्यातल्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्र जवळून बघावा वाटलं. बाइकवर जायचं ठरवलं. धडगाव भागात संदीप देवरे हा मित्र त्याच्या ‘यंग फाउंडेशन’मार्फत प्राथमिक शिक्षण आणि जनजागृतीसंदर्भात काम करतो. त्याच्यासोबत धुळ्याहून निघालो. चार दिवस धडगाव तालुका आणि सातपुडा पर्वत पिंजून काढला. भाषेचा अडसर ओलांडत लोकांशी बोलत राहिलो. शिरपूर-बोराडीमार्गे आम्ही आधी गुऱ्हाडपाणीला पोचलो आणि माझ्या ‘स्वदेश’ भेटीची सुरुवात झाली...

गावची वाट सुरू झाली आणि मोबाइलची रेंज गेली. गावात प्रपेश भेटला. त्याच्या घरात अंधार आणि शांतता. एक सोलर लाइट सुरू होता आणि काही मोबाइल चार्जरच्या वायर लटकत होत्या. बाहेर विजेचे खांब आणि तारा दिसत होत्या. प्रपेश म्हणाला, “हा सगळा शो आहे सर. महाराष्ट्राची वीज दिवसातून २-३ तास असते. जवळच ‘एमपी’ आहे. तिकडून लोक वायर टाकून वीज घेतात. ती निदान ५-६ तास तरी असते.” धुळ्यात शिकलेल्या प्रपेशचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याने बनवलेल्या एका गाण्याला ७ लाखांवर व्ह्यूज आहेत, हे कळल्यावर मी उडालोच! त्याला इतरही व्हिडीओ बनवायची कामं मिळतात. त्यातून मिळणारे पैसे आणि शेती यावर त्याची गुजराण चालते. त्याच्या घरासमोरच अंगणवाडी होती. छतावर सोलरचं पॅनल. वरून एक डबा लटकत होता. त्यात फोन टाकला की, एकजण डबा छतावर घेतो मग फोनला रेंज आली की, इंटरनेट मिळतं आणि त्यावर टीव्ही जोडून शैक्षणिक व्हिडीओ चालवले जातात.

अंगणवाडी सेविका म्हणाल्या, ‘‘अनेकदा फोनला रेंज मिळाली नाही म्हणून हजेरी लावता येत नाही. पगारही कट होतो; पण करणार काय?”
पुढे नेवाली-पानसेमल-खेतीयामार्गे तोरणमाळला पोचलो. सकाळी गप्पांमध्ये कळलं की, आम्ही राहिलो ते गेस्ट हाऊस झोपडीत राहणाऱ्या सुभाषच्या जमिनीवर बांधलं होतं. त्याला मिळालेल्या भाडेकराराच्या ८-१० लाखांत वाटे पडून त्याला फार काही हाती लागलं नव्हतं. मिळालेले पैसे सुभाषने स्वतःचं घर पक्कं करण्यात टाकले. तो आता या गेस्ट हाऊसवर काम करतो! तोरणमाळला आदिवासींची जमीन भाड्याने घेऊन त्यावर काही लॉज, हॉटेल्स उभी आहेत. शिक्षणाचा अभाव आणि व्यावसायिक समज  नसल्यामुळे ज्याची जमीन असते तोच उलट तिथे तुटपुंज्या मोबदल्यात कामाला जातो. सुभाषच्या घरासमोर रस्त्याच्या नावावर थोडे सिमेंटचे तुकडे दिसत होते. एकच काम अनेक योजनांतर्गत झालेलं दाखवून २० वर्षांत रस्ता मात्र एकदाच झालेला. तोरणमाळच्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना बँकेच्या कामासाठी तब्बल ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, हे कळल्यावर थंडीतही मला घाम फुटला. नेटवर्कची समस्या असली किंवा बँकेच्या वेळेत पोहोचता आले नाही, तर हात हलवत परत यावं लागतं हे वेगळंच!

 पुढे कुंड्या आणि नर्मदेच्या खोऱ्यात असलेल्या उडद्या आणि साद्रीला गेलो. २०१६-१७ मध्ये इथल्या आणि आसपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून क्लस्टर शाळा म्हणून तोरणमाळला मोठी निवासी आश्रमशाळा उभी केली गेली. काही मुलं या शाळेत गेली-टिकली. बाकी घरीच!  दोन-तीन दिवसांत शेकडो शाळाबाह्य मुलं-मुली मला रस्त्यावर हिंडताना, गुरं राखताना दिसली.

कुंड्या, उडद्या, साद्री, भादल या पाड्यांवर तर विजेचे खांब अजूनही पोचलेले नाहीत. रस्ते म्हणजे डोकं गरगरेल अशी फक्त नागमोडी वळणं... अनेक जागी दरड कोसळलेली. महिने-महिने ती कोणी बाजूला करत नाही. ज्याला पुढे जायचं असेल त्यानेच दगडधोंडे बाजूला करून रस्ता मोकळा करायचा! अनेकजण घाटातल्या दगडधोंडे असलेल्या रस्त्यावर बाइक घसरून पडतात, हातपाय मोडून कायमचे जायबंदी होतात. घाटात कठडे क्वचित जागी. सरकारी दवाखाने आहेत; पण डॉक्टरअभावी बरेचसे बंदच... जवळच्या दवाखान्यात जायचं म्हणजे उभा सातपुडा ओलांडून १०० किलोमीटर पलीकडे, अर्धा दिवस घालवून शहादा किंवा धडगाव गाठायचं! आदिवासींचं मरण स्वस्त आहे. 

भर दुपारी १-२ किलोमीटर डोंगर चढत-उतरत, नंतर बोटीने नदी ओलांडून साद्रीला गेलो. संदीपची शाळा पहिली. ‘नर्मदे’त डुबकी मारून संध्याकाळी परत तसेच उडद्याला मुक्कामी आलो. संदीपने त्याच्या ‘यंग फाउंडेशन’मार्फत या सगळ्या पाड्यांवर चालणाऱ्या शाळा दाखवल्या. प्रवीण, गणेश ही गावचीच पोरं या शाळांमध्ये शिकवतात. ही पोरं २०-३० किलोमीटर लांब चालत जाऊन शाळा, कॉलेज करून पुढे धुळे-नंदुरबारला राहून शिकलेली.  हे तरुण स्वेच्छेने मुलांना अक्षर-अंकओळख व्हावी, त्यांनी तोरणमाळच्या शाळेत जावं म्हणून प्रयत्न करतात. ५ आणि ६ वर्षांची अनेक मुलं आपल्या घरून शेतं आणि काटेकुटे तुडवत, एकटी चालत या पर्यायी शाळेत येतात. सारं चित्र अस्वस्थ करणारं. मी भेटलो त्यातल्या काही आदिवासींना, तर आपण कोणत्या देशात राहतो, हेही माहिती नाही. देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झालेली असताना त्यांची ही परिस्थिती असेल तर दुसरं काय होणार? 
    mukeshbhavsar001@gmail.com

Web Title: An Indian youth living in the US brought to light the plight of tribal people in the remote areas of Dhadgaon-Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.