सोशल मीडियाच्या जबड्यातून मुलांची मानगूट कशी सुटेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:21 IST2026-04-01T08:21:58+5:302026-04-01T08:21:58+5:30

सोशल मीडियाचे व्यसन लावणारे राक्षसी अल्गोरिदम बंद किंवा बदलण्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरणारे दोन निकाल अमेरिकन न्यायालयांनी दिले आहेत..

American courts have delivered two rulings holding companies accountable for shutting down or modifying the addictive monstrous algorithms of social media | सोशल मीडियाच्या जबड्यातून मुलांची मानगूट कशी सुटेल?

सोशल मीडियाच्या जबड्यातून मुलांची मानगूट कशी सुटेल?

प्रसाद शिरगावकर

मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षक आणि वक्ते

लहान मुलांचा सोशल मीडियाचा अतिवापर, त्यांना लागू शकणारं व्यसन आणि त्या वापराचे त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी जगभरात वेळोवेळी चिंता व्यक्त केली जाते. काही देशांच्या आणि राज्यांच्या सरकारांनी १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्याची बंदीदेखील घातलेली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये दोन वेगवेगळ्या राज्यांमधल्या कोर्ट केसेसचे निकाल जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

पहिली केस लॉस एंजल्स शहरात केली नावाच्या एका वीस वर्षाच्या मुलीने इंस्टाग्राम चालवणारी मेटा कंपनी आणि यूट्यूब चालवणारे गुगल यांच्याविरुद्ध लावली होती. केलीने वयाच्या नवव्या वर्षी इन्स्टाग्राम वापरायला सुरुवात केली. 'इन्स्टाग्राम वापरायला लागल्यानंतर तिला वर्षभरात डिप्रेशन आणि अती-चिंता असा त्रास व्हायला लागल्याचं ती दाव्यात म्हणते. त्याचबरोबर तिला Body Dysmorphia नावाचा आजार जडला. या मानसिक आजारात 'आपण कसे दिसतो' याविषयी सातत्याने कमालीची चिंता वाटत राहते. इन्स्टाग्रामवर सातत्याने दिसणाऱ्या फिल्टर वापरून अत्यंत सुंदर केलेल्या फोटोंमुळे आपल्याला ही व्याधी जडली, असा तिचा दावा होता. या केसमधील साक्षी पुराव्यांच्या आधारे सोशल मीडिया कंपन्या वापरत असलेल्या अल्गोरिदम्समुळे लहान मुलांना सोशल मीडियाचं व्यसन लागू शकतं आणि त्याचा त्यांच्या मानिसक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष निघाला. अंतिम निकालात मेटा आणि गुगल या दोन्ही कंपन्यांना फिर्यादी मुलीला सहा मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई देण्यास सांगितलं गेलं.

अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको शहरातली दुसरी केसदेखील लहान मुलांच्या बाबतीतल्या मेटा कंपनीच्या धोरणांबद्दल होती. इंस्टाग्रामवर लहान मुलांच्या फीडवर अनेकदा अश्लील फोटो दाखवले जातात आणि लहान मुलांना सेक्स्युअली टार्गेट करणारी प्रोफाइल्स इंस्टाग्रामवर आहेत हे कंपनीला माहीत असून त्यांना अडवण्यासाठी काहीही केलं जात नाही. त्या केसमध्ये मेटा कंपनीतून बाहेर पडून 'व्हिसल ब्लोअर' बनलेल्या एका इंजिनिअरने तो कंपनीत काम करत असताना केलेल्या अनेक प्रयोगांमध्ये 'लहान मुलांना अश्लील कंटेंट दाखवला जात असल्याचं स्पष्ट झालं होतं' हे सांगितलं. हे लक्षात येऊनही कंपनीने ते रोखण्यासाठी काहीही न केल्याचं सांगितलं.

कंपनीच्या या धोरणांचा परिणाम म्हणून लहान मुलांना दिसणारा अश्लील कंटेंट किंवा लैंगिक शोषणकर्त्या गुन्हेगारांनी त्यांना 'टार्गेट' करण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. या दोन्ही गोष्टी लहान मुलांच्या मानसिक, भावनिक आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठीही योग्य नाहीत, असा निष्कर्ष या केसमधील ज्युरीने काढला आणि मेटा कंपनीला दोषी ठरवून त्यांना तब्बल ३७५ मिलियन डॉलर्सचा दंड केला. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध सध्या हजारो केसेस लावल्या गेल्या आहेत. यातील बहुसंख्य केसेस या लहान मुलांवर होणारे परिणाम किंवा लहान-मोठे सगळ्यांना लागणारं व्यसन आणि त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या बाबतीतील आहेत.

मेटा कंपनीच्या तीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप) सुमारे तीन अब्ज वापरकर्ते (युजर्स) आहेत. यूट्यूबवर अडीच अब्ज तर टिकटॉकवर दोन अब्ज. अधिकाधिक युजर्स मिळवणं आणि युजर्सना अधिकाधिक वेळ अॅपवर व्यतित करायला उद्युक्त करणं यासाठी या कंपन्या सदैव प्रयत्नशील असतात. त्यासाठी 'युजर एंगेजमेंट'चे नवनवे अल्गोरिदम तयार करतात. आता AI च्या मदतीने हे अल्गोरिदम स्वतःहून प्रगत, अधिक शक्तिशाली आणि घातक होत चालले आहेत. सोशल मीडियाच्या या अजस्त्र महाजालात लहान- मोठे सगळेच लोक अडकत चालले आहेत आणि असंख्य लोकांना त्याचे मानसिक, भावनिक, शारीरिक दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत. आपण स्वतः त्यात अडकले असू तर सोशल मीडियाचा वापर थांबवणं किंवा कमी करणं हे आपल्या हातात आहे, मात्र लहान मुलं या महाजालात अडकत असतील तर त्याविषयी कायदेशीर आणि सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनच प्रयत्न करायला हवेत. अमेरिकेत या कंपन्यांवर लावलेल्या हजारो कोर्ट केसेस हे कायदेशीर मार्गाच्या लढ्याचं उदाहरण आहे.

आपल्याकडे कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील आणि आंध्र प्रदेश सरकारने १३ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरायला बंदी घातली आहे. हे सरकारी यंत्रणेच्या वापरातून सोशल मीडियाच्या तावडीतून लहान मुलांना वाचवण्याचं उदाहरण आहे. लहान मुलांच्या मानसिक आरोग्याच्या जोपासनेसाठी आणि त्यांच्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष जगातल्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही मार्गाचा अत्यंत प्रभावी आणि व्यापक वापर करत रहायला हवं. याचबरोबर सोशल मीडियाची चटक आणि व्यसन लावणारे राक्षसी अल्गोरिदम बंद किंवा बदलण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव कसा आणता येईल, याचाही विचार आणि कृती करायला हवी.
 

Web Title : बच्चों को बचाना: सोशल मीडिया के चंगुल से कैसे बचाएं?

Web Summary : सोशल मीडिया का अत्यधिक उपयोग बच्चों के मानसिक स्वास्थ्य को नुकसान पहुंचाता है, जिससे लत और बॉडी डिस्मॉर्फिया जैसी समस्याएं होती हैं। अमेरिकी मुकदमों में हानिकारक सामग्री और एल्गोरिदम के लिए कंपनियों पर जुर्माना लगाया गया है। कुछ सरकारें छोटे बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगा रही हैं, जिससे मजबूत सुरक्षा की आवश्यकता है।

Web Title : Rescuing Children: How to Protect Them from Social Media's Grip

Web Summary : Social media overuse harms children's mental health, leading to addiction and issues like body dysmorphia. US lawsuits highlight the dangers, with companies facing penalties for harmful content and algorithms. Some governments are banning social media for young children, prompting a need for stronger protections.