ट्रम्प घायकुतीला आलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 04:34 IST2026-03-25T04:34:05+5:302026-03-25T04:34:05+5:30

अमेरिकेसोबत कोणतीही थेट बोलणी सुरू असल्याचा खुद्द इराणने इन्कार केला आणि जग पुन्हा बुचकळ्यात पडले. 

america iran war why donald trump is in hurry in this situation and its consequences | ट्रम्प घायकुतीला आलेत का?

ट्रम्प घायकुतीला आलेत का?

अठ्ठेचाळीस तासांत होर्मुझ सामुद्रधुनी मोकळी करा, अन्यथा भयंकर हल्ल्याचा सामना करा, अशी तंबी दिल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यू-टर्न घेतला. युद्ध थांबविण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू असल्याने आपण इराणचे वीज प्रकल्प व ऊर्जा सुविधांवरील हल्ले पाच दिवसांसाठी थांबवित आहोत, असे जाहीर केले. जगाला सुखद धक्का बसला. जगभरातील शेअर बाजारांमध्ये चैतन्य आले. इंधनाच्या किमती घसरल्या. पण, हा आनंद फार टिकला नाही. इराण व लेबनाॅनवरील हल्ले आपण थांबविणार नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले. अमेरिकेसोबत कोणतीही थेट बोलणी सुरू असल्याचा खुद्द इराणने इन्कार केला आणि जग पुन्हा बुचकळ्यात पडले. 

गळ्याच्या शिरा ताणून रोज इराणला इशारे देणारे ट्रम्प अचानक का नरमले, युद्ध थांबविण्यासाठी घायकुतीला का आले, यावर आडाखे बांधले जाऊ लागले. स्वत:च्या देशात तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून अमेरिकेवर युद्धखोरीचा आरोप आणि इंधन टंचाई व आर्थिक संकटांसाठी अमेरिकेला जबाबदार धरले जात असल्याने ट्रम्प गुडघे टेकण्याच्या मानसिकतेत आलेत का, असा प्रश्न उपस्थित झाला. ट्रम्प यांच्या या नरमाईची अनेक कारणे दिली जाताहेत. एकतर नाटो संघटनेची सदस्य राष्ट्रे तसेच अमेरिका ज्यांना मित्र मानते अशा बहुतेक देशांनी इराणविरोधात अमेरिका-इस्रायल जोडगोळीला मदत करण्यास जवळपास नकार दिला. हे सगळे भेकड आहेत, अशा शब्दांत त्याविषयी ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील या अपेक्षाभंगासोबतच खुद्द अमेरिकेत इराण युद्धाबद्दल सारेकाही ट्रम्प यांना अनुकूल आहे असे नाही. होर्मुझ सामु्द्रधुनी खुली करण्यासाठी नव्याने मोठा हल्ला करायचा तर मोठा खर्च होणार. अस्तित्वाची लढाई लढणारा इराण आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर जबर प्रतिहल्ले चढवणार. त्यामुळे मोठी जीवितहानी होणार. अमेरिकन जनमत आणखी विरोधात जाणार. शक्तिशाली, परंतु शांतताप्रिय ही अमेरिकेची प्रतिमा डागाळणार, असे अनेक मुद्दे ट्रम्प यांच्या विरोधात जाणारे आहेत. म्हणूनच, इराणवर दबाव कायम ठेवताना त्यांनी युद्धाची जबाबदारी इतरांवर ढकलायला सुरुवात केली आहे. 

युद्धविरामाच्या घोषणेनंतर टेनेसी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी संरक्षणमंत्री पिट हेगसट व लष्करप्रमुख डॅन केन यांचे नाव घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली. असे मानले जाते की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तसेच माध्यम क्षेत्रातील दादा रूपर्ट मर्डोक यांनी इराणवर हल्ल्यासाठी ट्रम्प यांना फशी पाडले आणि पिट हेगसट त्या बाजूने होते. याउलट, उपाध्यक्ष जे डी. व्हेन्स, गृहमंत्री मार्को रुबिओ, चिफ ऑफ स्टाफ सुझी वाइल्स आणि गेल्या आठवड्यात राजीनामा दिलेले नॅशनल काउंटरटेररिजम सेंटरचे प्रमुख जो केंट इराणवरील हल्ल्यांना अनुकूल नव्हते. अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये युद्धावरून अशा दोन फळ्या पडल्यामुळेही कदाचित ट्रम्प यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली असेल. 

अर्थात, जगापुढील आर्थिक संकट आणि जागतिक बाजारातील दबाव हे या नरमाईचे सगळ्यात मोठे कारण असावे. विनाशकारी हल्ल्यांचा सामना करताना इराणने आर्थिक युद्धाला तोंड फोडले. होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. परिणामी, जगभरातील तेल आणि गॅस पुरवठा अडकला. तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या, स्टॉक मार्केट कोसळले आणि अमेरिकेसह आशियाई देशांपुढे ऊर्जासंकट उभे राहिले. या साऱ्यांचा ठपका अमेरिकेवर आला. स्वत: ट्रम्प हे यशस्वी उद्योजक, व्यावसायिक आहेत. साहजिकच बाजार आणि अर्थव्यवस्थेबाबत ते खूप संवेदनशील आहेत. जगाची आणि पर्यायाने अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात आल्यानेच त्यांना दोन पावले मागे यावे लागले असावे. 

कदाचित या व अशाच अनुषंगिक कारणांनी ट्रम्प यांना इराण युद्ध थांबवायचे आहे. ही युद्धबंदी सन्मानजनक कशी राहील, यावर ते विचार करीत असावेत. स्टीव्ह विटकोफ व जारेड कुश्नर हे ट्रम्प यांचे विशेष दूत काही उच्चपदस्थ इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. इजिप्त, पाकिस्तान व तुर्की या देशांच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण सुरू आहे. जे काही असेल ते परंतु ट्रम्प यांच्यासारख्या अडेलतट्टू नेत्यालाही इराणने दोन पावले मागे जायला लावले, हे अधिक महत्त्वाचे. तेव्हा, सुरू असलेली किंवा नसलेली बोलणी यशस्वी व्हावीत आणि युद्धामुळे लादल्या गेलेल्या आर्थिक, तसेच इंधन संकटातून जगाची सुटका व्हावी, अशीच सर्वांची इच्छा असणार.

 

Web Title : क्या ट्रम्प ईरान युद्ध योजनाओं पर डगमगा रहे हैं? एक नज़र

Web Summary : ईरान पर ट्रम्प का नरम रुख युद्ध के खिलाफ वैश्विक दबाव, आर्थिक चिंताओं और घरेलू विभाजन के बाद आया है. इनकार और उतार-चढ़ाव के बीच बातचीत जारी है, जो ईरान के लचीलेपन को उजागर करती है.

Web Title : Are Trump's Iran War Plans Wavering? A Look at the Factors.

Web Summary : Trump's softened stance on Iran follows global pressure against war, economic anxieties, and domestic divisions. Negotiations continue amidst denials and fluctuating tensions, highlighting Iran's resilience.