नेत्यांच्या पायाची भिंगरी आणि दादांच्या अपघाती मृत्यूचा धडा
By Shrimant Mane | Updated: January 30, 2026 09:17 IST2026-01-30T09:16:51+5:302026-01-30T09:17:24+5:30
Ajit Pawar Death: धकाधकीच्या जगण्यात जसे ‘स्लो लिव्हिंग’ गरजेचे मानले जाते, तसेच राजकारण या सर्वव्यापी क्षेत्रातही थोडे ‘स्लो गोइंग’ ही गरज बनली आहे.

नेत्यांच्या पायाची भिंगरी आणि दादांच्या अपघाती मृत्यूचा धडा
- श्रीमंत माने
( संपादक, लोकमत, नागपूर)
बारामतीत कधीकाळी जिथे उजाड माळरान होते, तिथल्याच शैक्षणिक नंदनवनात, ते शिवार समृद्ध करण्यात मोठा वाटा असलेल्या अजितदादा पवार या कर्तबगार नेत्याला अथांग जनसागराने साश्रुनयनांनी, दाटलेल्या कंठाने अखेरचा निरोप दिला. लाडक्या दादासाठी बायाबापड्या गहिवरल्या, कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. ‘दादा परत या, परत या’ अशी गगनभेदी सामूहिक हाक दिली. शासकीय इतमामात अजितदादांवर अंतिम संस्कार झाले तेव्हा पोलिसांच्या संचलनातही चाहत्यांचे हुंदके स्पष्ट ऐकू येत होते. बुधवारचा भयंकर विमान अपघात आणि त्या निमित्ताने नियतीने
खेळलेल्या खेळीमुळे राज्य व देशभरातील मान्यवर दिङ्मूढ होते. अजितदादांसह पाचजणांच्या अपघाती मृत्यूचा तणाव चोवीस तासानंतरही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
बऱ्याचवेळा बुर्झ्वा, शहरी मानसिकतेसाठी हेटाळणीचा, मनोरंजनाचा विषय ठरलेले दमदार, तडफदार, रांगडे, मिश्कील, ऊर्जावान आणि महत्त्वाचे म्हणजे कठोर प्रशासक अजितदादा प्रत्यक्ष सामान्यांना किती प्रिय होते, याचे दर्शन त्यांच्यावरील अंतिम संस्काराच्या निमित्ताने विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर घडले. त्यांना हा निरोप छोट्या पडद्यावर पाहताना कोट्यवधींचे डोळे पाणावले. राज्याच्या कानाकोपऱ्यात दैनंदिन व्यवहार थांबले. कारण, अवघे मराठी जनमानस एका अनामिक पोकळीत घुसमटल्याचा अनुभव दोन दिवस येत आहे आणि आपल्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी धावतपळत बारामतीत पोहोचलेला प्रत्येकजण एक अशीच पोकळी घेऊन आपापल्या गावी परतला आहे.
या पोकळीत काही प्रश्न आहेत. गेली किमान वीस-पंचवीस वर्षे भविष्याच्या दिशेने महाराष्ट्राने टाकलेल्या प्रत्येक पावलाला ज्यांच्या निर्णयक्षमतेचा संदर्भ होता, अशा अजितदादांच्या पश्चात महाराष्ट्राचे काय होणार, राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने पुढे जाणार, त्या राजकारणात सर्वसामान्यांच्या आशाआकांक्षांना काय स्थान असेल, असे सार्वजनिक प्रश्न तर आहेतच. शिवाय सगळ्याच पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांचे काही वैयक्तिक प्रश्नही आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पक्षाच्या दोन्ही फळ्यांचे ऐक्य ही आता औपचारिकता उरली आहे. दोन्ही गटांचे नेते, कार्यकर्त्यांची त्यासाठी मानसिक तयारी झाली आहे. अजितदादा यासाठी गेले काही महिने प्रयत्न करीत होते. परिणामी, एकप्रकारे हे ऐक्य ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.
अर्थात, महायुतीमध्ये सामील झाल्यानंतरही अजितदादांनी प्रयत्नपूर्वक जपलेली महाराष्ट्रातील शिव-शाहू-फुले-आंबेडकर ही पुरोगामी विचारधारा पुढे न्यायची तर एक येताना सत्तेचा मोह सोडावा लागेल आणि सत्ता टिकवायची असेल तर विचारधारेला बगल द्यावी लागेल. हा एक पेच आहे आणि आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडवावा लागेल. अजितदादांच्या अपघाती निधनामुळे स्वत: थोरले पवार किती हताश, हतबल झाले हे काल राज्याने पाहिलेच आहे. अशावेळी ते पुढाकार घेऊन हा पेच हाताळतात, की सगळे निर्णय नव्या पिढीच्या हातात सोपवितात, हे पाहावे लागेल. असो.
अजितदादांच्या या आकस्मिक जाण्याने सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांचे भल्या पहाटे तयार होणे, सूर्योदयापूर्वी बैठका घेणे, इतर नेत्यांच्या तुलनेत अर्धा दिवस पुढे असण्याची. हा एका कर्तबगार नेत्याच्या काैतुकाचा विषय आहे आणि त्यात काही गैरदेखील नाही. खरा प्रश्न आहे, या निधनाने आपण आणि आपले राजकारण काही धडा शिकणार आहे की नाही?
आपले साऱ्यांचे जगणे प्रचंड धकाधकीचे झाले आहेच; पण त्यापेक्षाही आपले राजकारण अधिक धावपळीचे झाले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि सारे काही राजकारण याचा अतिरेक झाला आहे. त्यातही सत्ताकारणाने राजकारणावर मात केली आहे. प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि तिच्यासाठी काहीही करायची तयारी आहे. नेते, कार्यकर्ते, पक्षांचे ‘थिंंक टँक’ सगळेच एका दुष्टचक्रात अडकले आहेत. इतकी सगळी धावाधाव सुरू आहे, की निवडणुकीच्या प्रचाराचा प्रभाव आपण कोणत्या नेत्याने किती सभा घेतल्या आणि किती रोडशो केले यावर मोजतो. एका दिवसात दहा-दहा सभा घेतल्या जातात आणि त्याचाही जोरजोरात प्रचार केला जातो. पायाला भिंगरी हा अभिमानाने मिरविण्याचा विषय झाला आहे. ही भिंगरी विमाने, हेलिकाॅप्टर, चारचाकी गाड्यांच्या आधारे भिरभिरते. मुळात ही सगळी यंत्रे आहेत. त्यांची देखभाल किंवा बिघाड, यंत्र चालवणाऱ्या माणसांच्या मर्यादा यापैकी कशाचाही विचार न करता ही भिंगरी सुरू आहे.
धकाधकीच्या जगण्यात जसे ‘स्लो लिव्हिंग’ गरजेचे मानले जाते, तसेच राजकारण या सर्वव्यापी क्षेत्रातही थोडे ‘स्लो गोइंग’ ही गरज बनली आहे. सार्वजनिक जीवनात आपण एखादी गोष्ट करू शकलो नाही, ही रूखरूख गरजेची आहे. अशी हुरहुर किंवा पोकळी आवश्यक आहे. अजितदादांसारखे उमदे नेतृत्व गमावल्यानंतर निर्माण झालेल्या व्यापक, सार्वजनिक पोकळीपेक्षा ती वैयक्तिक पोकळी केव्हाही परवडेल.
shrimant.mane@lokmat.com