सत्ता असो-नसो, दादा ‘मित्र’ होते, राहिले! आम्ही दोघांनीही एकमेकांबद्दल वैयक्तिक स्तरावरील मैत्रभाव जोपासला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:57 IST2026-01-29T07:55:14+5:302026-01-29T07:57:16+5:30
Ajit Pawar : अजितदादांची आणि माझी मैत्री ही राजकीय मतभेदांच्या पलीकडची होती. आम्ही अनेक वर्षे विधिमंडळात काम केले. एकमेकांवर राजकीय टीका-टिप्पणी केली. परंतु, आमच्या मैत्रभावात कधीही अंतर आले नाही.

सत्ता असो-नसो, दादा ‘मित्र’ होते, राहिले! आम्ही दोघांनीही एकमेकांबद्दल वैयक्तिक स्तरावरील मैत्रभाव जोपासला
- नितीन गडकरी
(केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग)
अजितदादांची आणि माझी मैत्री ही राजकीय मतभेदांच्या पलीकडची होती. आम्ही अनेक वर्षे विधिमंडळात काम केले. एकमेकांवर राजकीय टीका-टिप्पणी केली. परंतु, आमच्या मैत्रभावात कधीही अंतर आले नाही.
जनहिताच्या एखाद्या मुद्द्यावर मी काही आग्रह केला आणि ते अजितदादांनी मान्य केले नाही, असे घडले नाही. आणि दादांनी एखादा लोकहिताचा विषय माझ्यासमोर ठेवला आणि मी सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, असेही कधी घडले नाही. आमची मैत्री कायमच राजकारणविरहित होती.
पश्चिम महाराष्ट्रातील विकसित सहकार क्षेत्रातून जे काही मोठे राजकीय नेते पुढे आले, त्यात अजितदादांचे नाव महत्त्वाचे आहे. गेली तब्बल चाळीस वर्षे ते राजकारणात, सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. राज्यातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या विकासाचा त्यांना ध्यास होता. राजकीय नेत्यांना लोकांना, कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. सातत्याने गोड बोलावे लागते. आपण स्पष्ट बोललो तर चुकीचा संदेश जाईल, असे अनेकांना वाटते. अजितदादा मात्र या रीतीला अपवाद होते. ते उत्तम प्रशासक होते, तसे ते स्पष्टवक्तेही होते.
मला त्यांचा स्पष्टवक्तेपणा फार आवडायचा. त्यांचे मत सकारात्मक असेल तर ते तसे स्पष्ट सांगत. जे काम होऊ शकत नसेल, त्याबद्दल तसेही स्पष्टपणे सांगून मोकळे होणे हा त्यांचा स्वभाव होता. मात्र, एखाद्या कामाला होकार दिला असेल तर त्याचा पाठपुरावा करून ते शेवटाला नेण्यापर्यंतची जबाबदारी अजितदादा घेत, हे मी कित्येकदा अनुभवले आहे. त्यांच्या या नेतृत्वगुणामुळे त्यांच्याबद्दल शासन-प्रशासनात एक विश्वास निर्माण झाला. प्रशासनावर चांगली पकड ठेवून जनतेच्या हिताचे नेमके निर्णय करून घेत असताना त्यांची निर्णय क्षमता वेळोवेळी सिद्ध झाली. शिवाय त्यांची लोकाभिमुखताही अधोरेखित झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महाराष्ट्रात कामे करीत असताना मला त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव आला. भूसंपादनासह अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, तेव्हा महाराष्ट्राचा विकास केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या कामांना त्यांनी स्वतः संपूर्ण ताकदीने पाठबळ दिले.
राजकारणात कधी जमते, कधी जमत नाही. कधी पार्टी सोबत असते, कधी नसते. ते बघून आम्ही मैत्री केली नाही. त्यामुळे सत्तेत असो वा नसो, त्यांचे व माझे संबंध पूर्वी होते, तसेच ते अखेरच्या क्षणापर्यंत राहिले. राजकीय पदे आणि भूमिका बाजूला ठेवून वैयक्तिक स्तरावरील मैत्रभाव आम्ही दोघांनीही एकमेकांबद्दल जोपासला हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.
अजितदादा हे माझे राजकारणातले आणि राजकारणाच्या पलीकडले उत्तम मित्र होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वारसा त्यांनी चांगला चालवला. सुखी, संपन्न, समृद्ध महाराष्ट्र घडवण्याची ताकद त्यांच्याकडे होती. एका दमदार, दिलखुलास आणि कमालीची निर्णयक्षमता असलेल्या नेत्याला आपण सारे मुकलो आहोत. त्यांचे अचानक निघून जाणे ही माझ्यासाठी एक व्यक्तिगत हानी आहे.