‘AI अंगणवाडी’ : चिमुकल्यांच्या जगात डिजिटल जादू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:28 IST2025-08-09T09:27:05+5:302025-08-09T09:28:01+5:30
नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे राज्यातील पहिली ‘एआय अंगणवाडी’ सुरू झाली. या नव्या प्रयोगाने काही उत्तरे शोधली, नवे प्रश्नही तयार केले आहेत!

‘AI अंगणवाडी’ : चिमुकल्यांच्या जगात डिजिटल जादू!
राजेश शेगोकार, वृत्तसंपादक लोकमत, नागपूर
‘एआय अंगणवाडी’ हे शब्द ऐकले की, पहिले प्रश्न मनात येतील ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अंगणवाडी सेविका किंवा त्यांची मदतनीस करणार की दिवसातून काही तास खिचडीपुरती तिथे येणारी लहान-लहान मुले? आणि मुला-मुलींसाठी ते असेल तर अजून बोबडे बोलही व्यवस्थित बोलू न शकणाऱ्या चिमुकल्यांचा एआयशी काय संबंध?..
नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील राज्यातील पहिल्या एआय अंगणवाडीने या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली दिली आहेत. इथला ‘एआय’चा प्रयोग लहान मुलांच्या आकलनाची, ज्ञानाची कक्षा विस्तारण्यासाठीच आहे आणि पुढचा टप्पा त्या मुलांच्या पोषणाशी, आरोग्याशी संबंधित असेल. नागपूर जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने साधा फळा व खडूने चालणारी वडधामना अंगणवाडी स्मार्ट झाली. कोलाबा नावाच्या टेक पार्टनरने ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी स्मार्ट अभ्यासक्रम बनवला. त्यात मुलांच्या तार्किक, बौद्धिक क्षमतेचा विकास केंद्रस्थानी आहे.
अंगणवाडीत स्मार्ट बोर्ड व व्हर्च्युअल रिॲलिटी सेट्स आले. अत्यंत उत्साही अशा अंगणवाडी सेविका सरोज कुकडे यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. व्हीआर सेट्सच्या माध्यमातून बडबडगीते, चित्रकला, नृत्य या आधीच्या अभ्यासक्रमांना नवे पंख लाभले. एआय प्रणाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा घेऊ लागली. किती शिकवले, किती आत्मसात झाले, याच्या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या. मुले वेगवेगळया बाैद्धिक, तसेच आकलन क्षमतेची असतात. सर्वांना एखादी गाेष्ट सारख्याच काठीण्य पातळीवर शिकवली तर काही पुढे जातात, काही मागे राहतात. पारंपरिक शिक्षणातील ही अडचण एआय दूर करताे. प्रत्येकाची गती पाहून त्याच्या मागच्या किंवा पुढच्या पायरीवर विशेष लक्ष दिले जाते. कोणते मूल चुणचुणीत व कोणते थोडे स्लो आहे, हे समजले की, जे स्लो आहे त्याला व्हीआर सेट्सवर अधिक समजून सांगितले जाऊ लागले. जे आधीच स्मार्ट, हुशार आहे, त्याला थोडे अवघड प्रश्न विचारले जाऊ लागले.
नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘मिशन बाल भरारी’ उपक्रमातून ही एआय अंगणवाडी साकारली आहे. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांची. त्यातून लहान मुलांच्या डिजिटल शिक्षणाने पुढचा टप्पा गाठला. एआय सक्षम व्हीआर सेटमुळे मुलांना आभासी जगाची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. अंगणवाडी ताईने सांगितलेली गोष्ट त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. मुले उत्साहाने, हसतमुखाने, शिकत आहेत. पुढचा टप्पा आहे, पोषण व आरोग्याच्या ट्रॅकिंगचा. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पोषणद्रव्ये व मूल्याची उपलब्धता, गरज हे सारे सांभाळले जाईल. त्याचा फायदा गरोदर व स्तनदा मातांनाही होईल.
येत्या गांधी जयंतीला, २ ऑक्टोबर रोजी भारतातील अंगणवाडी योजनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. नेमक्या याचवेळी ही एआय अंगवाडी नावाची झगमगती क्रांती दरवाजावर उभी आहे आणि तिच्या वलयाला चिंताजनक प्रश्नांची किनार आहे. इतक्या लहान वयात मुलांना स्क्रीनवर आभासी शिक्षण दिल्याने त्यांच्या मेंदूचा विकास कोणत्या दिशेने होईल? बालपणीच पाटी-खडूऐवजी व्हीआर सेटचा वापर झाल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व टोकाचे आभासी होणार नाही का?
आता काही भाैतिक चिंता.. महाराष्ट्रात सध्या एकूण १,०८,००५ अंगणवाडी केंद्रे आणि मिनी अंगणवाडी आहेत. तिथे सहा वर्षांच्या आतील १ कोटी ३१ लाख मुला-मुलींची नोंद आहे. शहरी भागातल्या अंगणवाड्या झोपडपट्ट्यांमधील खुराड्यात तर ग्रामीण आदिवासी भागातील अंगणवाड्या उघड्यावर, झाडाखाली भरतात. देशभरातील अंदाजे २ लाख अंगणवाड्यांना इमारत नाही. अंगणवाडी सेविका व मदतनीस अत्यंत तुटपुंज्या मानधनावर प्रचंड काम करतात. या पार्श्वभूमीवर, बालकांच्या बुद्धिमत्तेची व्याख्या व विकास करणाऱ्या नव्या प्रयोगाचे स्वागत करतानाच अंगणवाडी ताई आणि तंत्रज्ञानातील एआय यांची सांगड घालणारे धोरण राबवायला हवे.
rajesh.shegokar@lokmat.com