अधिवेशनातही महाराष्ट्रच ! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:12 AM2024-02-20T08:12:38+5:302024-02-20T08:14:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांना अभिवादन केले.

agralekh Lok Sabha elections the BJP focused its attention on Maharashtra | अधिवेशनातही महाराष्ट्रच ! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले

अधिवेशनातही महाराष्ट्रच ! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांना अभिवादन केले. तत्पूर्वी रविवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतानाही मोदींनी शिवरायांचे स्मरण केले होते. अयोध्येत काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात स्वामी गोविंद देव गिरी यांनी, पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठेपूर्वी पाळलेल्या कठोर धार्मिक नियमांना तपश्चर्या संबोधत, राज्यकर्त्याने तशी तपश्चर्या केल्याचे केवळ शिवरायांचेच उदाहरण आपल्याला आठवते असे गौरवोद्गार काढले होते. पंतप्रधानांनी शिवरायांना त्यांच्या जयंतीला अभिवादन करणे, हा स्थापित परंपरेचा भाग असला तरी स्वामी गोविंद देव गिरी यांचे उद्गार आणि आपण शिवरायांच्या पदचिन्हांवर चालण्याचा प्रयत्न करीत आहोत अशा आशयाचे स्वतः पंतप्रधानांचे वक्तव्य, हा केवळ योगायोगाचा भाग मानता येणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, हे स्पष्टपणे दिसते आहे. त्यामध्ये काहीही वावगे नाही.

शेवटी महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभा सदस्य असलेले राज्य आहे. गत निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४१ जागा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या होत्या. अर्थात तेव्हा अविभाजित शिवसेना रालोआचा भाग होती. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीने बरीच नाट्यमय वळणे घेतली. शिवसेनेचे विभाजन झाले आहे आणि त्या पक्षाचा एक गट रालोआत परतला असला तरी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत महाविकास आघाडीचा भाग आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना तर भाजपची  कट्टर विरोधक बनली आहे. ठाकरे गट मोदींवर अत्यंत कडवट टीका सातत्याने करीत असतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात किमान गतवेळी जिंकल्या तेवढ्या जागा जिंकणे, हे भाजपचे उद्दिष्ट आहे; कारण `हिंदी हार्टलँड’ किंवा `काऊ बेल्ट’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये भाजपची कामगिरी, गत लोकसभा निवडणुकीत अत्युच्च पातळीच्या अगदी निकट जाऊन पोहोचली होती. त्यामध्ये फार सुधारणेला आता वाव नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील गतवेळच्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याशिवाय भाजपचा ‘अब की बार, चार सौ पार’ हा नारा प्रत्यक्षात उतरू शकत नाही, याची भाजप नेतृत्वाला जाण आहे.

 महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन जवळपास साडेतीनशे वर्षे उलटली असली तरी, आजही ते मराठी माणसाच्या हृदयात वसलेले आहेत. शिवराय  महाराष्ट्राची अस्मिता आहेत. शिवसेनेचे तर नावच शिवरायांच्या नावावरून बेतलेले आहे. त्याच शिवसेनेच्या एका गटाशी भाजपला लवकरच दोन हात करायचे आहेत. शिवरायांचे नाव आणि मराठी अस्मिता हाच शिवसेनेचा वर्षानुवर्षांपासूनचा हुकमी एक्का आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लढाई जिंकायची असल्यास आपणच शिवरायांचे खरे वारस आहोत, हे मतदारांच्या मनावर ठसविण्याशिवाय तरणोपाय नाही आणि नेमके तेच भाजप आणि मोदी करीत आहेत, असे दिसते. अर्थात मोदी ते प्रथमच करीत आहेत असेही नाही. ते कसे शिवरायांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, हे त्यांनी भूतकाळातही अनेकदा सांगितले आहे. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही. शिवराय सगळ्यांचे आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचा, त्यांचा वारसा सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो जसा उद्धव ठाकरेंना आहे, तसाच तो नरेंद्र मोदींनाही आहेच; पण शिवराय होणे सोपे नसते!

शिवराय एकमेवाद्वितीय होते, आहेत आणि यापुढेही असतील! त्यांच्या थोडेफार जरी जवळ पोहचता आले तरी पुष्कळ झाले. राज्यकर्ता कसा असावा, याची भारतात दोनच उदाहरणे सांगितली जातात. एक प्रभू श्रीरामचंद्र आणि दुसरे म्हणजे शिवराय! प्रजाहितदक्षता हे दोघांचेही वैशिष्ट्य! प्रजेच्या हितासाठी स्वतः कितीही कष्ट उपसण्याची दोघांचीही तयारी होती. प्रभू श्रीरामचंद्र तर अमर्त्यच! जगातील एका मोठ्या वर्गाचे दैवत! शिवरायांनीही स्वकर्तृत्वावर महाराष्ट्राचे आराध्यदैवत ही उपाधी मिळवली. त्यामुळे दोघांचाही वारसा सांगणे सोपे; पण त्यांचे गुण, कर्तृत्व अंगी बाणवणे तेवढेच कठीण! राज्यकर्ता होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याने प्रभू श्रीरामचंद्रांचे, छत्रपती शिवरायांचे केवळ गुणगान न करता, त्यांचे थोडेफार जरी अनुकरण केले तर देशात खरोखर रामराज्य अवतरु शकेल!

Web Title: agralekh Lok Sabha elections the BJP focused its attention on Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा