विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 05:08 IST2025-12-08T05:08:27+5:302025-12-08T05:08:49+5:30
गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही.

विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. विमान रद्द झाल्याने वधू-वर स्वतःच्याच लग्नाच्या स्वागत-समारंभाला पोहोचू शकले नाहीत. प्रवाशांचे हाल होत आहेत. विमानतळांवर अराजक असल्यासारखे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून इंडिगो कंपनीची विमानसेवा विस्कळीत झाली आणि इतर विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केली. हैदराबाद, मुंबई, बंगळुरू, जयपूर, दिल्ली आणि पुणे या व्यस्त विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाता-येताना विलंब, सामान घेताना विलंब आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या तिकीट दरांचाही सामना करावा लागत आहे.
इंडिगो कंपनीच्या परिस्थितीचा गैरफायदा स्पर्धक कंपन्यांनी घेतल्याचे उघड आहे. इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा गोंधळ का उडतो आहे, यावरही विचार करणे महत्त्वाचे. एक तर, या कंपनीचे नेटवर्क व्यापक स्वरूपाचे आहे. दुसरे असे की, रात्रीच्या प्रवासासाठी याच कंपनीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. भारतात दर दहा प्रवाशांपैकी सहा प्रवासी इंडिगो कंपनीच्या विमानात बसतात. वैमानिकांसह केबिन क्रू कर्मचाऱ्यांची नऊ हजारांपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या इंडिगो विमान प्रवासी वाहतूक कंपनीविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे. कंपनी कोणतीही असो किंवा देश कोणताही असो, विमानसेवा विस्कळीत होण्याचा परिणाम संबंधित कंपनी आणि प्रवासी यांच्यापुरताच मर्यादित नसतो. प्रवासी घरून विमानतळावर पोहोचण्यापासून ते परतीच्या प्रवासानंतर विमानतळावरून इच्छितस्थळी पोहोचण्यापर्यंतच्या काळाचा संबंध याच्याशी असतो. या काळात विमान प्रवासी ज्या-ज्या घटकांना आर्थिक उलाढालींच्या अंगाने स्पर्श करतो, अशा पेट्रोलपंप, हॉटेल्स, रिक्षा, कॅब, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन कंपन्या अशा सर्व पूरक घटकांना विमानसेवा अनियमिततेचा फटका बसला आहे, बसतो आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो विमान कंपनीची ४३४ विमाने देश-परदेशात नियमित उड्डाण करतात. या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचे तास हे आठ ते दहा इतके होते. वाढत्या कामाचा ताण कमी करण्यासाठी 'डीजीएसए' (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) यांनी दहा तासांवरून सहा तास अशी कामाच्या वेळेत कपात केली.
त्यानुसार संगणकीय प्रणालीत बदल झाल्यानंतर काम संपताच नियमानुसार वैमानिकांसह इतर विमान कर्मचारी सहा तासांनंतर आपले काम थांबवू लागले. त्याचा परिणाम इंडिगो विमानसेवा ठप्प होण्यात झाला. याचा फटका सर्वच विमान कंपन्यांना बसला. मात्र, मोठे नेटवर्क असल्याने इंडिगोची यंत्रणाच कोलमडली. सर्व स्तरांवरून इंडिगो कंपनीविरोधात टीकेची राळ उठली, तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास कमी करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी कामांचे तास कमी करणे हा पर्याय योग्य असला, तरी विमान कंपनीच्या विमानांची संख्या, दैनंदिन उड्डाणे आणि सरासरी प्रवासी संख्या या बाबींच्या निकषावर केबिन क्रू आणि वैमानिकांची संख्या पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. आता या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू सांगत असले आणि काही मलमपट्टया केल्यासारखे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात सेवा नियमित आणि सुरळीत केव्हा होणार, याबाबत अद्यापही शंकाच आहे. एखाद्या विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाल्यावर तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची सरकारी भूमिका विमान प्रवाशांना नको आहे. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विमान कंपन्यांचे प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.
'फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन'चा नियम (एफटीडीएल) १ जुलैपासून लागू केल्यानंतर विमान कंपन्यांना वैमानिकांना आठवड्यातून ४८ तास विश्रांती देणे बंधनकारक करण्यात आले होते. 'डीजीसीए'ने क्रू मेंबरसह वैमानिकांच्या सलग रात्रपाळीवरही बंदी घातली होती. गेल्या आठवड्यापासूनच्या विमानसेवेच्या गोंधळानंतर आता साप्ताहिक विश्रांतीचा नियम मागे घेऊन आठवड्यात ४८ ऐवजी ३६ तास विश्रांतीचा नियम पूर्ववत करण्यात आला आहे. तो प्रत्यक्षात येईपर्यंत इंडिगोच्या विमान प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकाच कंपनीच्या घशात सगळे कोंबण्याची एकचालकानुवर्ती भांडवली व्यवस्था किती घातक आहे, याचा हा पुरावा. विकासाच्या मोठमोठ्या हवाई गप्पा मारणाऱ्या सत्ताधीशांना या अराजकाने जमिनीवर आणले आहे. त्यातूनही धडा घेतला नाही, तर विकासाचे आपले स्वप्न हवेतच विरणार आहे !