संशय का मनी आला? अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 05:46 IST2026-02-19T05:43:55+5:302026-02-19T05:46:43+5:30
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार?’ - या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडायच्या आधीच त्यांचा मृत्यू ज्या विमान अपघातात झाला त्या अपघाताबद्दल संशयाचा धूर येऊ लागला आहे.

संशय का मनी आला? अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार?’ - या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडायच्या आधीच त्यांचा मृत्यू ज्या विमान अपघातात झाला त्या अपघाताबद्दल संशयाचा धूर येऊ लागला आहे. अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातील माहिती जसजशी पुढे येईल, तसे नव्या प्रश्नांना तोंड फुटणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलेले आक्षेप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे एकामागून एक दावे यामुळे या प्रकरणात खळबळ उडाली आहे. ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स नष्ट झाल्याचे वृत्त आले आणि गोंधळाची जागा संशयाने घ्यायला सुरुवात झाली. ताज्या वृत्तानुसार त्यातील डेटा डाऊनलोड करण्यात यश आले आहे. त्यामुळे या अपघाताचे पक्के सत्य बाहेर येते का, हे पाहणे महत्त्वाचे. जगात कोणत्याही विमानाला अपघात झाला की, सर्वप्रथम चर्चेत येणारा शब्द असतो तो ब्लॅक बॉक्स. फ्लाइट डेटा रेकॉर्डर.
वैमानिकांचे कॉकपिटमधील संभाषण जतन करणारे उपकरण. विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या प्रवासातील संपूर्ण तांत्रिक माहिती यात डिजिटल स्वरूपात नोंदवली जाते. हा ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसून केशरी असतो. अपघातानंतर सहज सापडावा, यासाठी तो विमानाच्या मागील भागात बसवण्यात येतो. ब्लॅक बॉक्समधून एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत वैमानिकांचे झालेले संभाषण, अपघाताच्या वेळी विमानात नेमके काय घडत होते, अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की, मानवी चुकीमुळे याची माहिती मिळू शकते. कु
ठली उपकरणे बंद पडली होती का, हवामानाची स्थिती, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाचा वेग, उंची, दिशा, इंधनसाठ्याची माहिती हे सर्व तपशील ब्लॅक बॉक्समधून स्पष्ट होतात. त्यामुळे त्यातून मिळणारी माहिती महत्त्वाची. राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते रोहित पवार यांनी अलीकडेच मुंबई व दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन संबंधित व्हीआरएस कंपनीच्या विरोधात विमानाच्या उड्डाणापासून अपघातापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. यातील दोन मुद्द्यांची तर्काच्या पातळीवर उत्तरे मिळणे गरजेचे आहे. यापैकी पहिला मुद्दा, या विमानाच्या मुंबईतील उड्डाणापूर्वी बारामती विमान वाहतूक कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला गेला, त्यावेळी तेथील दृष्यमानता व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. अंदाजे सव्वातासानंतर विमान पुण्यानजीक आल्यावर वैमानिकाने एटीसीशी संपर्क साधला त्यावेळी मात्र, दृष्यमानता कमी असल्याचे सांगण्यात आले.
दिवस जसा चढत जातो, तसा प्रकाश वाढत जातो, या निसर्ग नियमाला छेद देणारे हे उत्तर वाटते. दुसरा मुद्दा असा की, एका मिनिटात १५ किलोमीटर अंतर कापण्याइतके हे विमान शक्तिशाली होते का?, उतरण्याच्या वेळी वेग कमी असला तरी अचानक काय घडले किंवा अनुभवी वैमानिकाचा अंदाज चुकला का, कमी दृष्यमानतेमुळे एकदा गो राऊंड अर्थात हवेत एक फेरी मारून आल्यानंतर दुसऱ्यावेळी वैमानिकाने आता धावपट्टी दिसत असल्याचे सांगितले आणि उतरतेवळी विमान कलंडले कसे, या प्रश्नांची तांत्रिक व तार्किक पातळीवर उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून कंपनीचे विशेष ऑडिट सुरू केले आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो अर्थात विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरोनेदेखील तपास सुरू केला आहे.
डीजीसीए आणि एएआयबी या दोन प्रमुख संस्थाच विमानाचा अपघात आणि तांत्रिक मुद्दे याची तपासणी करू शकतात. कारण, तशा पद्धतीचे गुणात्मक मनुष्यबळ आणि तांत्रिक यंत्रणा त्यांच्याकडे आहे. अशी कोणतीही यंत्रणा/क्षमता नसलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीतून तसे पाहता काय साध्य होईल, हा प्रश्नच आहे. कोणत्याही गंभीर प्रकरणात विरोधकांनी सीबीआय चौकशीची मागणी करायची आणि सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याला होकार देऊन एक प्रक्रिया पार पाडायची, एवढेच काय ते ! तूर्तास तरी, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसह डीजीसीए आणि एएआयबीचा तपास यातून या प्रकरणाची उकल होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.