शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांचा जुगार; नऊ वर्षात तिसऱ्यांदा साथीदार बदलून मुख्यमंत्रिपद राखले कायम...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 10:24 IST

भाजपच्या २०२४ साठीच्या योजनेत बिहारला महत्त्वपूर्ण स्थान होते.

बिहारच्या राजकारणाने अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा कूस बदलली आहे. नऊ वर्षात तिसऱ्यांदा साथीदार बदलून नितीशकुमार यांनी त्यांचे मुख्यमंत्रिपद कायम राखले आहे. बुधवारी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांचा शपथविधीही पार पडला. गत सहा वर्षात भाजपने विरोधी पक्षांची चार राज्य सरकारे उलथवली; पण यावेळी मात्र नितीशकुमार यांनी भाजपलाच सत्तेतून बेदखल केले, तेदेखील भाजपच्याच मेहेरबानीने मुख्यमंत्रिपद मिळालेले असताना ! बिहारमधील या राजकीय भूकंपाचे हादरे केवळ त्या राज्यापुरतेच मर्यादित राहणार नाहीत, तर राष्ट्रीय पातळीवरही  जाणवतील. सदासर्वदा निवडणूक लढविण्याच्या सिद्धतेत असलेल्या भाजपने २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला केव्हाच प्रारंभ केला आहे.

भाजपच्या २०२४ साठीच्या योजनेत बिहारला महत्त्वपूर्ण स्थान होते. त्या अनुषंगानेच भाजपच्या सात प्रमुख आघाड्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिण्यांची बैठक बिहारच्या राजधानीत नुकतीच घेण्यात आली; मात्र भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्या बैठकीत प्रादेशिक पक्षांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाने भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. तो भाजपने जाणीवपूर्वक खेळलेला डाव होता, की नड्डा यांची जीभ घसरली होती, हे यथावकाश स्पष्ट होईल. पण राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात नितीशकुमार यांनी मोठा जुगार खेळला आहे. तशीही नितीशकुमार यांची ही मुख्यमंत्रिपदाची अखेरची कारकीर्द होती. त्यामुळे त्यांना काहीही गमवायचे नाही.  

एवीतेवी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायचेच आहे, तर एकदा पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?- असा विचार करून त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले असावे. नितीशकुमार यांचे राजकीय गणित बरोबर आहे; पण ते करताना त्यांनी त्यांची विश्वसनीयताच पणाला लावली आहे. नितीशकुमार यांनी राजकीय कोलांटउड्या घेण्याचा असा विक्रम केला आहे, की त्यांना पलटूराम ही उपाधीच मिळाली. २०१७ मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिली तेव्हा, “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्यासोबत राहण्याची अनुमती माझ्या अंतरात्म्याने दिली नाही”, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर कोणत्याही न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही खटल्यातून दोषमुक्त केलेले नाही. मग  पुन्हा त्यांच्यासोबत जाण्याची अनुमती अंतरात्म्याने कशी दिली, हा प्रश्न विचारला जाणार आणि त्याचे उत्तर देणे नितीशकुमार यांच्यासाठी नक्कीच सोपे नसेल.

सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा देऊन नितीशकुमार यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती.  त्यांनी आता ज्या राजदसोबत हातमिळवणी केली आहे, त्याची कारकीर्द कुशासन, गुन्हेगारांचे थैमान आणि भ्रष्टाचारासाठीच ओळखली जाते. त्यामुळे नितीशकुमार राजदसोबत राहून स्वत:ची प्रतिमा कशी जपतील, हा प्रश्नच आहे. दुसरीकडे भाजपची वाटचालही सोपी नसेल. त्या पक्षाकडे नरेंद्र मोदी हा हुकमी एक्का आहे. त्या बळावरच २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बिहारमध्ये उत्तम यश मिळवले होते; पण २०१४ मध्ये जदयू एकटा लढल्याने तिरंगी लढत झाली, तर २०१९ मध्ये जदयू भाजपसोबत होता. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या विरोधात काॅंग्रेस, जदयू, राजद, डावे अशा सात पक्षांची आघाडी असेल. त्यामुळे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता कागदावर तरी दिसते. जदयू रालोआतून बाहेर पडल्याने राज्यसभेत तर भाजपला आत्ताच फटका बसला आहे.

भरीस भर बिहारमध्ये भाजपकडे राज्य पातळीवर मोठा चेहराही नाही. त्यासाठी त्या पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच जबाबदार आहे. एखाद्या नेत्याने थोडी चमक दाखवताच, त्याची राज्यातून केंद्रात अथवा केंद्रातून राज्यात उचलबांगडी करण्याची खेळी, भाजपच्या नेतृत्वाने केली आहे. परिणामी बिहारमध्ये भाजपचा चेहरा तयार होऊ शकला नाही. त्याचे परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच, २०२५ मधील विधानसभा निवडणुकीतही भाजपला भोगावे लागू शकतात. अर्थात जिथे अजिबात जनाधार नव्हता, त्या राज्यांमध्येही कमळ फुलविण्याची कमाल भाजपने केली आहे. त्यामुळे जनाधार असलेल्या बिहारमध्ये भाजप नक्कीच पाय रोवू शकतो. आगामी काळात बिहारमध्ये भाजप विरुद्ध राजद, अशीच लढाई प्रामुख्याने बघायला मिळू शकेल; कारण नितीशकुमारांनंतर जदयूकडेही चेहरा नाही!

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा