‘ॲडल्टिंग १०१’ - ‘अक्कल’ शिकविणारा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:59 IST2025-06-12T10:56:39+5:302025-06-12T10:59:53+5:30
‘Adulting 101’ : रोजच्या जगण्यात आवश्यक अशा छोट्या-मोठ्या जीवनकौशल्यांसाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये, यासाठी तयार व्हायचं असेल तर हल्लीची पिढी, खासकरून ‘जेन झी’ तरुण-तरुणी ‘ॲडल्टिंग १०१’ला पसंती देत आहेत. ‘ॲडल्टिंग १०१’ या नावाचा अभ्यासक्रमच जगातील अनेक विद्यापीठांनी सुरू केलाय.

‘ॲडल्टिंग १०१’ - ‘अक्कल’ शिकविणारा अभ्यास
एखाद्या दुर्गम रस्त्यावरून प्रवास करत असताना आपली गाडी पंक्चर झाली तर स्वतःचं स्वतः शर्टाच्या बाह्या मागे सारून, कारमधली आवश्यक हत्यारं काढून कुणाकुणाला पंक्चर काढता येईल किंवा निदान स्टेप्नी जोडता येईल? दैनंदिन आयुष्य जगताना अशा कितीतरी लहान-मोठ्या अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात आणि त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आपण कुणावर तरी अवलंबून असतो. पण रोजच्या जगण्यात आवश्यक अशा छोट्या-मोठ्या जीवनकौशल्यांसाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये, यासाठी तयार व्हायचं असेल तर हल्लीची पिढी, खासकरून ‘जेन झी’ तरुण-तरुणी ‘ॲडल्टिंग १०१’ला पसंती देत आहेत. ‘ॲडल्टिंग १०१’ या नावाचा अभ्यासक्रमच जगातील अनेक विद्यापीठांनी सुरू केलाय. या अभ्यासक्रमात चक्क जीवनावश्यक कौशल्यं शिकवली जातात. त्यामुळे रोजचं जगणं जगताना एखादी अडचण आलीच तर मदत करायला कुणीतरी येईल म्हणून वाट बघत बसण्याची गरज पडत नाही.
बदलत्या जगाच्या गरजांशी संवादी असलेल्या या अभ्यासक्रमाची रचना फार रंजक आहे. अभ्यासक्रमात काय नाही? तुमच्या स्वयंपाकघरात आग लागू नये यासाठी काय करायचं? आग लागली तर काय करायचं, इथंपासून ते नाती अर्थपूर्ण कशी करावीत इथंपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या जातात. १९९७ ते २०१२ या काळात मुलांना जन्म दिलेल्या पालकांनी आपल्या मुलांना (हीच ती ‘जेन झी’ पिढी) अति लाडावून ठेवल्यामुळे अनेक जीवनावश्यक कौशल्यं या मुलांना अवगत नाहीत. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींसाठीही आजची तरुण मुलं इतरांवर अवलंबून आहेत.
जीवनावश्यक कौशल्यं पालकांनी मुलांमध्ये रुजवावीत असं जगभरातले तज्ज्ञ सांगतात. मात्र, तसं न केलेल्या पालकांनी आपल्या मुलांना ‘ॲडल्टिंग १०१’सारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास सांगावं, असंही ते सुचवतात. अमेरिेकेत तसेच अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये ‘ॲडल्टिंग १०१’चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी त्यांच्यासाठी प्रवेशही घेत आहेत.