अदानी, पवार, बारामती आणि ‘एआय’; नवऊर्जेचे चैतन्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:12 IST2026-01-01T11:12:13+5:302026-01-01T11:12:36+5:30
जातीय, प्रादेशिक आणि राजकीय भेद दूर सारत दूरदृष्टी असलेला उद्योजक म्हणून शरद पवारांनी अदानींना बारामतीत बोलावले, यामागे दूरदृष्टी आहे..!

अदानी, पवार, बारामती आणि ‘एआय’; नवऊर्जेचे चैतन्य
शरद पवारांना अनेक गोष्टी काळाच्या आधीच कळतात, असे उगीचच म्हटले जात नाही. म्हणूनच ते केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या विश्वातही सातत्याने रस घेताना दिसतात. आज सर्व जग ‘एआय’ने व्यापले असताना, बारामतीसारख्या ठिकाणी ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’सारखे जागतिक दर्जाचे केंद्र उभे राहणे, ही दूरदृष्टीचा प्रत्यय देणारी घटना आहे.
या सेंटरच्या उद्घाटनासाठी पवार देशातील कोणत्याही बड्या प्रभावी नेत्याला किंवा केंद्रीय मंत्र्यांना सहज निमंत्रित करू शकले असते. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक उद्योगविश्वातील आघाडीचे नाव असणाऱ्या गौतम अदानी यांना निमंत्रित केलं. अदानी हे देशातील प्रमुख उद्योजकच नव्हे, तर जागतिक पातळीवरचा एक महत्त्वाचा चेहरा आहे. ऊर्जा, बंदरे, विमानतळ, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, सिमेंट आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमधील त्यांचे काम देशाच्या भविष्याला नवी दिशा देणारे आहे. अशा उद्योगपतीची उपस्थिती कोणत्याही प्रकल्पाला केवळ आर्थिक बळच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यास मदत करते, हे द्रष्टेपण पवारांकडे आहे.
गौतम अदानी राज्याच्या भूमिकेला विरोध करत नाहीत, तर उलट राज्याच्या उद्दिष्टांना पूरक अशी खासगी गुंतवणूक करतात. हे माहीत असल्यामुळेच पवार ‘मराठी - गुजराती’ या वादात न अडकता ‘विकासाचा चेहरा’ म्हणून अदानींचा उल्लेख करतात. राजकीय टीकेची कोणतीही पर्वा न करता त्यांच्याशी कौटुंबिक संबंध दृढ करतात. जातीय, धार्मिक, प्रादेशिक आणि राजकीय भेद दूर सारत केवळ दूरदृष्टी असलेला उद्योजक म्हणूनच पवारांनी अदानींना बारामतीत बोलावले.
अदानी यांनी देशासह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करून विकासाला गती दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे दळणवळण, रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढल्या. मुंबईतील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने आधुनिक तंत्रज्ञान व विश्वासार्ह सेवा दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे लाखो नागरिकांना चांगली घरे, पायाभूत सुविधा व स्वच्छ परिसर मिळणार आहे. दिगी बंदर आणि सौर व पवन प्रकल्पांमुळे औद्योगिक वाढ, व्यापार आणि विकासाला बळ मिळाले आहे. बारामतीसह राज्यातील युवकांना अदानींच्या मदतीने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा पवारांचा उद्देश आहे. त्याशिवाय अदानींच्या माध्यमातून थेट केंद्राशी संवाद साधणे जास्त परिणामकारक ठरणार असल्याची जाणीवही पवारांना आहे.
उद्घाटन सोहळ्यात पवारांनी अदानी यांनी शून्यातून सुरू केलेल्या प्रवासाचे कौतुक करत त्यांचा संघर्ष अधोरेखित केला, तर अदानी यांनी ‘एआय’ ही चौथी औद्योगिक क्रांती आहे, जी नोकऱ्या कमी करणार नाही, तर उलट वाढवेल आणि सर्वसामान्यांना क्षमता देईल. शेतकरी, छोटे उद्योजक, विद्यार्थी यांना ‘एआय’ टूल्समुळे जागतिक संधी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.
महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक राज्य आहे. तरी मराठी माणसाची मानसिकता नोकरी करण्याची आहे. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन तरुणांना नव्या उद्योग-व्यवसायांकडे झेपावण्याची संधी मिळावी, हाच उद्देश या आयोजनाचा होता. अदानींच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. अदानी याआधी बारामतीत २०२३ मध्ये ‘सायन्स सेंटर’च्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळेप्रमाणे यावेळीही ‘एआय सेंटर’साठी कोट्यवधी रुपयांची भरीव मदत त्यांनी दिली आहे. गेल्या दोन दशकांपासून अदानींसोबत असलेल्या संबंधांचा फायदा बारामती आणि परिसराला होत आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बारामती आज नवी उंची गाठत आहे. बारामती केवळ राजकीय केंद्र न राहता तंत्रज्ञानाचे हब बनावे, यादृष्टीने सुरू असलेल्या सक्रिय प्रयत्नांना अदानी समूहाची भक्कम साथ लाभत आहे. भविष्यात एआय-आधारित स्टार्टअप्स, रोजगाराच्या संधी आणि संशोधनाचे केंद्र म्हणून बारामतीची ओळख निर्माण होणार आहे. त्याशिवाय राजकारणापलीकडे जाऊन मागील दोन दशके जपलेल्या कौटुंबिक संबंधांचा फायदा शरद पवारांना आजही होत आहेच. उद्योगविश्वातील ब्रॅण्डला ‘एआय सेंटर’च्या निमित्ताने बारामतीच्या मातीशी कनेक्ट करून नव्या संधींची समीकरणे पवार भविष्यात नक्कीच साधतील.
sachin.kapse@lokmat.com