राजर्षी शाहू महाराजांचा कृतिशील वारसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:15 AM2020-06-26T03:15:21+5:302020-06-26T03:15:32+5:30

जातीव्यवस्थेने अवनतावस्थेला नेलेल्या शूद्रातीशूद्रांच्या सामाजिक वेदना महाराजांना समजत गेल्या आणि अस्पृश्य उद्धाराचे कंकण त्यांनी हाती बांधले ते कायमचे!

The active legacy of Rajarshi Shahu Maharaj | राजर्षी शाहू महाराजांचा कृतिशील वारसा

राजर्षी शाहू महाराजांचा कृतिशील वारसा

googlenewsNext

-बी. व्ही. जोंधळे

राजर्षी शाहू महाराजांवर त्यांचे गुरू फ्रेजरसाहेबांनी पाश्चात्य संस्कृतीचे भौतिक संस्कार केले होते; पण शाहू महाराजांनीच स्वत:विषयी असे नमूद करून ठेवले आहे की, ‘परंपरेने अस्पृश्य ठरविलेल्या अस्पृश्यांची शिवाशिव जरी न झाली तरी शिवाशिव झाली असे समजून ते स्नान करत होते.’ मग शाहू महाराज परंपरेकडून आधुनिकतेकडे कसे वळले? तर वेदोक्त प्रकरणात वर्ण वर्चस्ववाद्यांनी खुद्द शाहू महाराजांनाच अस्पृश्य ठरवून त्यांचे क्षत्रियत्व नाकारले होते. पुढे वरिष्ठ वर्गाने त्यांना क्षत्रिय म्हणून मान्यता दिली; पण ब्राह्मणशाहीची शाहंूविषयक शत्रुत्वाची भावना नष्ट झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर शाहूराजांची वर्णवर्चस्वाविरुद्ध मनोभूमिका तयार झाली. जातीव्यवस्थेने अवनतावस्थेला नेलेल्या शूद्रातीशूद्रांच्या सामाजिक वेदना महाराजांना समजत गेल्या आणि अस्पृश्य उद्धाराचे कंकण त्यांनी हाती बांधले ते कायमचे!
भारतीय संसदेने १९५५ मध्ये राज्यघटनेच्या १७ व्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट केली; पण हेच काम शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानात ३०-३५ वर्षे आधीच केल्यामुळे ते निश्चितच ऐतिहासिक ठरले. राजर्षींचे अस्पृश्यतेबाबतचे विचार स्पष्ट होते. त्यांनी म्हटले आहे, ‘आमच्या धर्मात जातिभेदांमुळे जो उच्च-नीचपणा आला आहे, तशा प्रकारचा जन्मजात भेदभाव जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही, म्हणून अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे.’ जपानमधील सामुराई हे इतरांना तुच्छ लेखत; पण आधुनिक जपान घडविण्यासाठी सामुरार्इंनी आपला विशिष्ट दर्जा व हक्क सोडून दिले. असे आपणाकडेही व्हावे व उच्चजातींनी विशेष हक्क सोडून सामाजिक समतेची कास धरावी, असे राजर्षींना वाटत होते.


राजर्षी शाहूंनी अस्पृश्यांना माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी अनेक जाहीरनामे प्रसिद्ध करून त्यास कायद्याचे रूप दिले. उदा. १ जानेवारी १९१९ रोजी महसूल, न्याय इ. खात्यांसंबंधी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे, ‘आमच्या संस्थानात जे अस्पृश्य नोकरी धरतील त्यांना प्रेमाने वागवावे. हे मान्य नसणाºया अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा. त्यास पेन्शन मिळणार नाही.’ आरोग्यविषयक जाहीरनाम्यात, ‘हुजुरांच्या असे पाहण्यात आले आहे की, अस्पृश्यांना शाळा खात्याच्या कंपौंडमध्ये येऊ दिले जात नाही. सरकारी इमारती खासगी उपयोगासाठी दिलेल्या नसल्यामुळे अस्पृश्यांना तुच्छतेने वागविण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. हे मान्य नसणाºयांनी नोकरीचा राजीनामा द्यावा.’ असे म्हटले आहे. ६ डिसेंबर १९१९ च्या जाहीरनाम्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळणे हा त्यांनी गुन्हा ठरविला होता. राजर्षींनी अस्पृश्य समाजाची सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य दिले. अस्पृश्यांची वेठबिगारी नष्ट क रून त्यांच्या नावे जमिनी करून दिल्या. अस्पृश्य तरुणांना तलाठी केले. वकिलीच्या सनदा दिल्या. कारकून केले. संस्थानातील नोकºयांमध्ये ५० टक्के आरक्षण ठेवले. राजकन्येच्या विवाहात पाहुण्यांचे स्वागत करण्याचा मान अस्पृश्यांना दिला. त्यांच्या सरकारदरबारी अस्पृश्य नोकरचाकर होते. अस्पृश्यांच्या हातचे अन्नोदक त्यांनी स्वीकारले. ते आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. आपल्या संस्थानात १९१७ मध्ये त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा संमत केला होता. आपल्या कागलकर-घाटगे घराण्यातील कन्या, महाराजांच्या चुलत भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकरांचे पुत्र यशवंतरावांशी त्यांनी निश्चित करून पार पाडला. मराठा-धनगर आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराजांचे घनिष्ठ संबंध होते. बाबासाहेबांना आपला लंडनमधील उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी अर्थसाह्य केले होते. माता रमार्इंना ते बहीण मानत. १९२० मध्ये बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्राचा मायना ‘रा. लोकमान्य आंबेडकर’ असा होता तेव्हा ‘लोकमान्य’ ही पदवी केवळ टिळकांना लावली जात होती. ती शाहंूनी बाबासाहेबांना लावून बाबासाहेब हे तमाम मागासवर्गीय-शोषित-वंचितांचे नेते होणार आहेत, हेच सूचित केले होते. शाहू महाराजांनी अस्पृश्य उद्धारासाठी अंगीकारलेल्या समाजहितैषी धोरणांवर सनातनी पत्रांनी जेव्हा टीका केली तेव्हा त्यांनी विनोदाने म्हटले, ‘दोन सवयी मला लागल्या आहेत. एक अंग रगडून घेणे व दुसरे बामणी वृत्तपत्रांतील शिव्या खाणे.’ लोकाभिमुख कार्यामुळे राजर्षींची लोकप्रियता वाढू लागल्यावर इंग्रज राज्यकर्त्यांनी महाराजांनी प्रबोधन कार्यातून अंग काढून घ्यावे, अन्यथा त्यांची सत्ता काढून घ्यावी लागेल, असे दडपण आणले. यावर महाराजांनी कळविले, ‘तुम्ही मला गादीवरून काढण्याची भाषा कशाकरिता करता? तशी वेळ येण्यापूर्वी मी स्वत:च राजीनामा देईन; पण बहुजनांच्या उद्धाराचे कार्य मी प्राणांतीही सोडणार नाही.’

राजर्षींनी दलितोद्धारासाठी मोठे काम केले तेव्हा प्रश्न असा की, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणाºया महाराष्ट्रातील बहुसंख्याक समाजाने राजर्षींचा कृतिशील वैचारिक वारसा खरोखरंच अंगीकारला आहे काय? असेल तर दलितांवर नित्यही अमानुष अत्याचार का होत असतात? आंतरजातीय विवाह केला म्हणून दलित तरुणांची हत्या का होते? दलितांची तुटपुंजी प्रगती सवर्णांच्या डोळ्यांत का सलते? राज्यात अलीकडे कोरोना काळातही दलितांवर अत्याचार होत आहेत. ते राजर्र्षींच्या वैचारिक परंपरेत बसतात काय? जातीय सलोखा टिकविण्याची खरी जबाबदारी कुणाची? या प्रश्नांचा बहुसंख्याक समाज सहिष्णुभावाने विचार करणार आहे की नाही? तात्पर्य, शाहू महाराजांचा दलितांप्रती असलेला सामाजिक न्यायाचा वारसा बहुसंख्याक समाजाने कृतिशीलपणे जपणे हीच खरी राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना ठरेल.
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबाद)

Web Title: The active legacy of Rajarshi Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.