रडारच्या डोळ्यांनाही चकवा देणारा आशादायी प्रयोग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहा तरुणांचा भीमपराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:37 IST2025-12-18T08:36:06+5:302025-12-18T08:37:01+5:30
देशासाठी काहीतरी करायचं, या ध्येयानं झपाटलेले सहा तरुण एकत्र आले आणि शत्रूच्या रडारची दृश्यमानता कमी करणारा एक अनोखा प्रयोग सफल झाला.

रडारच्या डोळ्यांनाही चकवा देणारा आशादायी प्रयोग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहा तरुणांचा भीमपराक्रम
प्रा. तुषार देशपांडे
सहयोगी प्राध्यापक, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
नागपूरच्या मातीपासून, अमरावतीच्या संघर्षातून, नाशिकच्या अभ्यासातून, जामनेर आणि मुक्ताईनगरच्या स्वप्नांसह जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत अशा वेगवेगळ्या वाटांनी सहा स्वप्नं एकत्र आली आणि जन्म झाला 'शिल्डटेक' या संकल्पनेचा !
दीपांशू रहांगडालेची साधी पण संस्कारांनी समृद्ध पार्श्वभूमी, साहिल झांबरेच्या दारिद्र्यातून उगवलेली जिद्द, भार्गव रायकरचं शास्त्रीय ज्ञान आणि प्रयोगशील मन, प्राजक्ता लंकेचा आत्मविश्वास, नेत्रदीप कदमची चिकाटी आणि चैतन्य सातपुतेचा संघर्षातून घडलेला आत्मविश्वास - ही सहा वेगळी व्यक्तिमत्त्वं, पण एकच ध्येय, देशासाठी उपयोगी पडू शकेल असं काहीतरी करायचं. त्याच दृष्टीनं मग अभ्यास, संशोधन सुरू झालं. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रसायन अभियांत्रिकी आणि पेंट टेक्नॉलॉजीच्या वर्गात केवळ अभ्यास नव्हे, तर स्वप्नांनाही आकार देण्याचं काम सुरू झालं.
त्याचंच मूर्त रूप म्हणजे या विद्यार्थ्यांनी केलेलं संशोधन. या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगात असं एक कोटिंग तयार केलं आहे, जे भारतीय लढाऊ विमानांवर चढवलं तर शत्रूच्या रडार्सनाही ही विमानं चकवा देऊ शकतील. यामुळे भारतीय लढाऊ विमानं शत्रूला दिसू शकणार नाहीत. रडारची दृश्यमानता कमी करतील. भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या संशोधनाला यामुळेच 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५' स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
देशाच्या संरक्षण साधनांसाठी कमी खर्चात, पण अतिशय प्रभावी असं 'स्टेल्थ कोटिंग' विकसित करण्याचं आव्हान या विद्यार्थ्यांनी पेललं आणि देशातील संरक्षण साधनांना अधिक सुरक्षित, अधिक सक्षम बनविण्याची संधी साधत त्यासाठी आपलं सारं कौशल्य आणि अभ्यास पणाला लावला. या संशोधनाचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक असल्यानं रडार आणि त्यासंदर्भातील इतर चाचण्या आता डीआरडीओमध्ये केल्या जाणार आहेत.
हा प्रकल्प प्रयोगशाळेपुरता मर्यादित नव्हता, तो होता आत्मनिर्भर भारत बिल्ड फॉर इंडिया, बिल्ड फॉर द वर्ल्ड या राष्ट्रीय स्वप्नाशी जोडलेला. स्वप्नपूर्तीच्या जवळ जाण्याची मेहनत सोपी नव्हती. रात्री उशिरापर्यंत संशोधन, शोधनिबंधांचे ढीग, प्रयोगांमधल्या चुका.. कधी मिश्रण फसलं, कधी निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही, पण या विद्यार्थ्यांनी हार मानली नाही.
या प्रयोगातील एन-फॅन्टम कोटिंग प्रकल्पाची कथा ही आतापर्यंतच्या प्रयोगांपेक्षा एक वेगळी विचारसरणी आहे. आजपर्यंत संरक्षण क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या कोटिंगकडे बहुतांशवेळा एकाच थराचा पदार्थ म्हणून पाहिलं गेलं. अनेक संशोधनांमध्ये ऑक्साइड्स आणि फेराइट्स यांसारख्या घटकांवर भर देण्यात आला, परंतु रेझिनला केवळ त्यांना धरून ठेवणारे माध्यम मानलं गेलं. त्यामुळे संपूर्ण कोटिंगमधील प्रत्येक घटकाची स्वतंत्र भूमिका ठरवली गेली नाही. या विचारातून एन-फॅन्टम कोटिंगची रचना आकाराला आली. खालचा थर हा पृष्ठभागाशी घट्ट जोड निर्माण करणारा, स्थैर्य देणारा आणि संपूर्ण रचनेला आधार देणारा ठेवण्यात आला. या प्रयोगातील रेझिन हा असा एक घटक आहे, जो इतर घटकांना बांधून ठेवतो आणि त्याची मजबुती वाढवतो. हा थर बाह्य वातावरणाशी सतत संपर्कात येत असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या गुणधर्माचं रेझिन वापरण्यात आलं.
एन-फॅन्टम कोटिंगची खरी नव्यता कोणत्याही एका पदार्थात नाही, तर कोटिंगकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आहे. या संशोधनामुळे सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी घडतील, त्या म्हणजे भारतीय लढाऊ विमानांच्या संदर्भात शत्रूच्या रडारची दृश्यमानता कमी होईल. रडार जी किरणं, ज्या लहरी सोडतील, ती या विमानांपर्यंत तर पोहोचतील, पण ती पुन्हा रडारपर्यंत पोहोचूच शकणार नाहीत. कारण हे कोटिंग ती किरणं आणि लहरी शोषून घेतील. ती पुन्हा परत न गेल्यामुळे ही विमानं शत्रूच्या दृष्टिक्षेपात लवकर येऊ शकणार नाहीत, त्यामुळे ती शत्रूच्या प्रदेशात अधिक खोलवर जाऊ शकतील. संरक्षणाच्या क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी हा प्रयोग एक नवी पाऊलवाट ठरू शकतो.