भरलेलं मन कधी ना कधी उतू जातंच... तेच माझं नाटक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 04:50 IST2026-03-28T04:50:40+5:302026-03-28T04:50:40+5:30

माझं नाटक हा अस्वस्थतेला दिलेला प्रतिसाद आहे. सजग नागरिक म्हणून महत्त्वाचं वाटतं ते मांडणं, जे विघातक आहे, त्याचा निषेध करणं ही माझी भूमिका असते.

a full heart sometimes overflows that my play | भरलेलं मन कधी ना कधी उतू जातंच... तेच माझं नाटक !

भरलेलं मन कधी ना कधी उतू जातंच... तेच माझं नाटक !

मुलाखत व शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, ‘लोकमत’

तुमच्यासाठी नाटक हा ‘तराफा’ कसा ठरतो? 

- संकटकाळात समुद्रात ढकलल्या गेलेल्या माणसाला जसा तराफा तरण्याची, जगण्याची संधी देतो, तसंच नाटक माझ्यासाठी एक साधन ठरलं - ज्यामुळे मी जगलो, वाचलो आणि तरलो. या तराफ्याचं सुकाणू माझ्या विवेकाकडे होतं; मला कुठे जायचं हे मी ठरवत होतो. माझं एक छोटंसं विश्व आहे, त्या विश्वात मला नाटक नावाचा हा तराफा सापडला. त्यावर बसून मला जीवन समजून घेता आलं, अनेक अनुभवांच्या प्रदेशात जाता आलं. त्यामुळे हा तराफा माझ्या आयुष्याला तारणारा, नवनव्या दिशा दाखवणारा आणि जीवनाचा अर्थ उलगडणारा ठरतो.

हा ‘अस्वस्थ कालखंड’ आहे, असं तुम्ही म्हणता. ही अस्वस्थता नाटकात कशी उतरते? 

- माझं  लेखन एका अर्थाने नाट्यत्रयी आहे. ‘नाटकवाल्याचे प्रयोग’, ‘रिंगणनाट्य’ आणि ‘नाटक नावाचा तराफा’. १९९० नंतर जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण यामुळे काळ आणि अवकाशाचे अर्थच बदलले. तंत्रज्ञानाचा झपाट्याने झालेला विकास, राजकीय-सामाजिक उलथापालथ, ९/११सारख्या घटना आणि आजची युद्धजन्य परिस्थिती या सगळ्यांनी हा काळ प्रचंड अस्थिर केला. या अनुभवांचा वेग इतका प्रचंड आहे की, त्यांना पचवणंही अवघड होतं. नाटककार म्हणून मीही या अस्वस्थतेचा भाग आहे. माझं नाटक या अस्वस्थ कालखंडाला दिलेला प्रतिसाद आहे.

तुमच्या लेखनात ‘वाद-विवाद-संवाद’ ही अंतर्गत प्रक्रिया स्पष्ट दिसते. ही घालमेल सर्जनाला कशी आकार देते? 

- आसपास घडणाऱ्या घटना जरी  आपल्यापासून दूर असल्या, तरी त्यांचा परिणाम आपल्या मनावर होतोच.  युद्ध थेट आपल्या परिसरात नसलं, तरी त्याचा मानसिक ताण आपल्याला जाणवतो. या सगळ्यांचा परिणाम माझ्या नाटकांमध्ये उमटतो. ‘मालप्रॅक्टिस अँड द शो’मध्ये सोशल मीडियामुळे निर्माण होणारे ताण, तर ‘साठेचं काय करायचं?’मध्ये स्पर्धा, असूया, द्वेष यांचा विचार आला. सजग नागरिक म्हणून जे महत्त्वाचं वाटतं ते मांडणं आणि जे विघातक आहे त्याचा निषेध करणं ही माझी भूमिका असते.  

एखादं नाटक ‘घडतं’ म्हणजे नेमकं काय? 

- नाटक घडणं म्हणजे मनात रुजलेल्या अस्वस्थतेच्या बिजाला अभिव्यक्तीची वाट सापडणं. प्रत्येक माणसाला काहीतरी सांगायचं असतं. माझ्यासाठी ती अभिव्यक्ती नाटकातून होते. मन सतत भरलेलं असतं अनुभवांनी, विचारांनी. ते कधी ना कधी उतू जातंच. पण, ते वाया जात नाही; नाटकाच्या रूपात नव्याने आकार घेतं. ही प्रक्रिया जाणीव आणि नेणीव यांच्या संगमातून घडते.

नाटककाराने आपल्या काळाशी नेमका कसा संवाद साधावा? 

- प्रत्येक नाटककार आपल्या काळाशी संवाद साधत असतो. परंतु, राजकारण, समाज आणि माणूस म्हणून आपली भूमिका काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. माणूस म्हणून आपण कुणाच्या बाजूने उभे राहतो, हा मूलभूत प्रश्न आहे. अंधश्रद्धा, भोंदूगिरी, यांच्याविरुद्ध भूमिका घेणं आवश्यक आहे. कारण,  तुकाराम, ज्ञानेश्वर, गाडगे महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे विचार  आपल्या संवेदनांमध्ये वाहत असतात. सजग कलाकार म्हणून आपण काय बोलतो आहोत यावर विवेकी नियंत्रण असणं हीच खरी जबाबदारी आहे. 

‘नोंद करून ठेवणं’  महत्त्वाचं का वाटलं? 

- कलेचं शास्त्रात रूपांतर करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या रंगभूमीवर सखोल समीक्षणाची परंपरा कमी आहे. त्यामुळे नाटकांचं विश्लेषण, मूल्यमापन, परिशीलन होत नाही. नाटक ही ‘पेरिशिबल आर्ट’ आहे. प्रयोग होत असतानाच ती संपते. त्यामुळे तिच्या प्रक्रियेची नोंद ठेवणं आवश्यक आहे. मी काय केलं, का केलं, माझ्या दिग्दर्शनाच्या आणि अभिनयाच्या संकल्पना काय आहेत हे लिहून ठेवणं म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी दिशा देणं. माझ्यासाठी हे काम म्हणजे कलेचं ‘डिमिस्टिफिकेशन’, कला ही केवळ दैवी देणगी नसून एक शास्त्र आहे, हे अधोरेखित करणं. स्टॅनिस्लाव्स्की, ग्रोटोव्स्की, आर्तो यांनी जसे सिद्धांत मांडले, तसं काम मराठी रंगभूमीवर होणं गरजेचं आहे. मी त्यातला एक छोटासा प्रयत्न करतो आहे इतकंच.

durgesh.sonar@lokmat.com

 

Web Title : उफनता मन: नाटककार को रंगमंच में अभिव्यक्ति और अर्थ मिलता है।

Web Summary : नाटककार के लिए, रंगमंच एक जीवनरक्षक बेड़ा है, जो जीवन की जटिलताओं को समझने का साधन है। यह एक अशांत युग की चिंताओं को व्यक्त करता है, व्यक्तिगत अनुभवों को कला में बदलता है। रंगमंच भविष्य की पीढ़ियों के लिए सामाजिक मुद्दों और कलात्मक प्रक्रियाओं की आलोचना करने के लिए एक मंच प्रदान करता है।

Web Title : Overflowing Mind: The playwright finds expression and meaning in theatre.

Web Summary : For the playwright, theatre is a life raft, a means of understanding life's complexities. It expresses the anxieties of a turbulent era, transforming personal experiences into art. Theatre provides a platform to critique societal issues and preserve artistic processes for future generations.

टॅग्स :Natakनाटक