विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 08:56 IST2025-08-07T08:55:39+5:302025-08-07T08:56:07+5:30
पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्याची सुरुवात स्वत:पासून करायची की संपूर्ण जगाने त्या दिशेने पाऊल टाकल्यावर शेवटचे पाऊल आपण टाकायचे याबद्दल सामूहिक संभ्रम असल्याने माणसे स्वत:च्या आचरणात काडीमात्र बदल करायला तयार नाहीत. पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही, याचे भान लवकर येईल, अशी अपेक्षा करूया.

विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
निसर्ग गेल्या काही वर्षांत माणसाला त्याच्या अक्षम्य चुकांकरिता वरचेवर संदेश देत आहे. मात्र, मस्तवाल झालेला माणूस निसर्गाच्या या हाकांकडे सपशेल कानाडोळा करीत आहे. समुद्राला मागे सारून रस्ता बांधतो, डोंगराला आडवे करून इमारती बांधतो, नदी बुजवून किंवा जंगल तोडून शहरे वसवतो.. अशा मानवी गुर्मीला निसर्ग आपल्या पंजाने आडवे करतो. उत्तराखंडातील धराली गावावर ढगफुटी व त्यामुळे पाणी, दगड, माती याचे लोट वाहत आले आणि त्यांनी डोंगराच्या कुशीत वसलेली घरे, हॉटेल यांचा घास घेतला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असल्याचा कयास आहे.
या परिसरात अल्पावधीत १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. हिमालयाच्या प्रदेशात डोंगरांच्या उंच कड्यांमुळे ओलसर हवा वेगाने वर जाते. त्यामुळे ढग तयार होऊन अचानक धो-धो पाऊस कोसळतो. दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारी ओलसर हवा या खोऱ्यात अडकते. त्यामुळे ढगफुटी, पूर व परिणामी भूस्खलन या घटना या भागात होतात. यापूर्वी २०१३ मध्ये केदारनाथ येथे अशाच आपत्तीत बेपत्ता झालेल्या तीन हजारांहून अधिक लोकांचा आजतागायत थांगपत्ता लागलेला नाही.
२०२१ मध्ये ऋषिगंगा नदीला आलेल्या पुरातही मोठी जीवितहानी झाली. एकेकाळी वानप्रस्थाश्रमाची चाहूल लागलेली वृद्ध मंडळी केदारनाथ किंवा उत्तरकाशीच्या तीर्थाटनाकरिता निघत. या मंडळींना निरोप द्यायला सारागाव जमा होई. या यात्रेला निघालेली व्यक्ती सहसा घरी परत येत नसे. त्याचे कारण म्हणजे येथील बिकट रस्ते, खराब हवामान. मात्र, गेल्या काही वर्षांत तरणीताठी मंडळीही दरवर्षी अमरनाथ यात्रेला किंवा केदारनाथला सहल म्हणून जाऊ लागली. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले आतापर्यंत चारवेळा केदारनाथला जाऊन आलो व यंदा पाचव्यांदा जात आहोत, असे छातीठोकपणे सांगू लागले. वेगवेगळ्या टुरिझम कंपन्या उत्तराखंडातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या पॅकेज टूर आयोजित करू लागल्या.
पर्यटकांचा हिमालयातील वाढलेला ओघ व त्यामुळे येथील हॉटेलांची वाढलेली मागणी, हॉटेल बांधणीकरिता होणारी जंगलतोड, पाण्याचे प्रवाह बदलणे, डोंगरांवर घरे व इतर बांधकामे झाल्याने वाढलेला बोजा, घरे, हॉटेल यांचे सांडपाणी डोंगरात झिरपणे अशा असंख्य कारणांमुळे अगोदरच कमकुवत असलेला येथील दगड अधिक कमकुवत झाला आहे. हजारो मोटारी पर्यटकांना घेऊन या परिसरात येत असल्याने व त्यातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे हिमालयाच्या कुशीतील या वस्त्यांमधील प्रदूषण वाढले आहे. उत्तराखंडातील सुप्रसिद्ध पर्यावरणवादी रवी चोप्रा यांच्या मते, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन जवळच्या परिसरावर अवलंबून असते. आजूबाजूचे जलस्रोत, ऊर्जास्रोत याचा वापर करून ते जीवन जगत असतात. त्यात केलेले छोटे बदलही लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करतात. केंद्र सरकारच्या चार धाम प्रकल्पाला स्वयंसेवी संस्था व पर्यावरणवाद्यांनी विरोध केला.
या प्रकल्पाकरिता महामार्ग मंत्रालयाने रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली. चोप्रा यांनी याच तथाकथित विकासाला आक्षेप घेतला. सध्याच्या आर्थिक विकासाची कल्पना ही निसर्ग, पर्यावरणाचा विनाश करणारी आहे, असे चोप्रा यांचे मत आहे. लहान-मोठी शहरे असो की उत्तराखंडचा डोंगराळ प्रदेश येथील रस्ते, हॉटेल किंवा अन्य सुविधांच्या उभारणीकरिता किती झाडे कापली, किती झाडे लावली व त्यापैकी किती झाडे जगली, याचा कुठलाही हिशेब ठेवला जात नाही. झाडे लावण्याची आरंभशूरता अनेकदा दिसते. मात्र, लावलेली झाडे जगविण्याचे कष्ट कुणीही घेत नाही. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर वाढलेली झाडे आडवी केली जातात. त्याप्रमाणात झाडे लावली जात नाहीत. गेल्या काही वर्षांत पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
एकेकाळी ग्लोबल वॉर्मिंग म्हटल्यावर भलेभले बुद्धिवंत दात विचकत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत एखाद्या शहरात, गावात पडणारा ढगफुटीसदृश पाऊस, ज्या मोसमात जी फळे-फुले उमलतात ती भलत्याच मोसमात उमलणे, पावसाळ्यात उन्हाळा अन् हिवाळ्यात धो-धो पाऊस कोसळणे यावरून ग्लोबल वॉर्मिंग ही भाकडकथा नाही, याची जाणीव आता साऱ्यांना झाली आहे. मात्र, पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्याची सुरुवात स्वत:पासून करायची की संपूर्ण जगाने त्या दिशेने पाऊल टाकल्यावर शेवटचे पाऊल आपण टाकायचे याबद्दल सामूहिक संभ्रम असल्याने माणसे स्वत:च्या आचरणात काडीमात्र बदल करायला तयार नाहीत. पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही, याचे भान लवकर येईल, अशी अपेक्षा करूया.