कोकणासाठी ९० दिवस चालत राहिलो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:15 IST2025-03-09T09:14:30+5:302025-03-09T09:15:18+5:30
विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोकणाच्या बेसुमार हानीची जाणीव करून देण्यासाठी रेवस ते रेडी सलग २० दिवसांची पदयात्रा काढणाऱ्या तरुणाची भ्रमणगाथा.

कोकणासाठी ९० दिवस चालत राहिलो...
आशुतोष जोशी
पर्यावरणवादी
रत्नागिरीतल्या २२ तालुक्यातील नरवण इथून गुहागर घेतल्यानंतर शिक्षण कामानिमित्त परदेशी गेलो तेव्हा तिथं असं लक्षात आलं की, इंग्लंडसारखा देशसुद्धा कधीकाळी कोकणासारखा हिरवागार होता; पण सततची बेसुमार जंगलतोड, औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे त्याची विविधता गेल्या शंभर वर्षांत नष्ट झाली. हीच वेळ कोकणावर येऊ घातली आहे, असं मला तीव्रतेनं दिसू लागलं.
२०२२ मध्ये इंग्लंड कायमचं सोडलं आणि मी नरवणमध्ये राहायला लागलो. तेव्हा इथल्या समस्या अधिक तीव्रतेने जाणवू लागल्या. त्याच सुमारास कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून जाणारा रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग वेगाने बांधण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने जाहीर केला. त्यामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास आणि या मार्गावरील गावांचं होऊ घातलेलं नुकसान डोळ्यासमोर आलं. सर्वेक्षण तर झालेलं आणि धनदांडग्या लोकांकडून जमिनींची खरेदीही सुरू झालेली; पण या भागातला सर्वसामान्य माणूस त्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता. हे लक्षात आल्यावर मी स्वतःच या मार्गानं चालण्याचं आणि या संभाव्य नुकसानीबाबत लोकांची मतं जाणून घेण्याचं ठरवलं. गेल्यावर्षी २४ नोव्हेंबरला रायगडमधल्या रेवस बंदराच्या जेटीवर अथांग सागराला नमस्कार करून चालायला सुरुवात केली आणि गेल्या २ मार्च जी सिंधुदुर्गातल्या रेडी येथील निसर्गाचा रक्षणकर्ता घंगाळेश्वराच्या पायी सागराच्या साक्षीनेच या पदयात्रेची सांगता केली. तीन महिन्यांच्या या काळात सुमारे ९०० किलोमीटरची पायपीट करताना प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांत वेगवेगळी परिस्थिती दिसली. मुंबई जवळ असल्यामुळे रेवसचा परिसर शहरीकरणाच्या प्रभावाखाली दडपून गेलेला दिसला. आपल्या नेमक्या गरजा काय आहेत, हेही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. एका ठिकाणी कोणाला तरी उत्तम आरोग्य सेवेची गरज होती; पण तो मागणी करत होता मुंबईला जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची. अनेक जणांना कोकणातलं शांत आयुष्य आवडत होतं. पुढच्या काळातही ते तसंच राहावं, अशी त्यांचीही अपेक्षा होती; पण ते कसं टिकवायचं, ते कळत नव्हतं.
यात्रेत अनेक ग्रामस्थांशी संवाद झाला. तिन्ही जिल्ह्यांमधील शेकडो एकर पडीक जमीन किंवा अगदी डोंगरही काही वजनदार राजकारणी व त्यांच्या जवळच्या लोकांनी खरेदी केल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळाली. अनेक सडे आणि सडे आणि कातळभाग सपाट करून टाकल्याचं दिसलं. त्यामुळे तिथल्या प्राणी-पक्ष्यांचे अधिवास कायमचे नष्ट झाले... संपन्न जैवविविधतेची कधीही भरून न येणारी हानी झाली. या नुकसानीची कल्पना नसलेल्या स्थानिक गावकऱ्यांना किरकोळ आर्थिक मदत किंवा देणग्या देऊन हे सारं घडवण्यात आलं होतं. काही ठिकाणी तात्पुरता रोजगार निर्माण झाल्याने तेथील विरोधाची धार बोथट झाली होती; मात्र काही गावांमध्ये आमिषं, धमक्यांना भीक न घालता लोकांनी वडिलोपार्जित संपत्ती जपल्याचंही आढळलं.
या पदयात्रेत कधी मंदिरात, तर कधी स्थानिकांच्या घरात, जंगलात असा कुठेही जागा मिळेल तिथं झोपत होतो. अनेकांनी पदयात्रेत माझ्याबरोबर चालून कृतिशील पाठिंबा दिला. पदयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये ग्रामसभा झाल्या. ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, काही लोकांनी मला विकासविरोधी, 'अर्बन नक्षल' ठरवून बदनामीचा प्रयत्न केला; पण कोकणातल्या लोकांमध्ये जाऊन निसर्गातील त्यांच्या देवांबद्दल, राखणदारांबद्दल, पंचमहाभूतांबद्दल पुन्हा एकदा आठवण करून देण्याची माझी धडपड होती.
जैवविविधतेने नटलेल्या माझ्या या कोकणचा विकास उत्तम शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधा, सेंद्रिय शेती आणि निसर्गपूरक व्यवसाय-उद्योगांद्वारे व्हायला हवा, असं मला वाटतं. आधुनिक विकासाच्या हव्यासापोटी इथली नैसर्गिक संपदा आपण उद्ध्वस्त केली तर त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल, हेही मला लोकांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. म्हणून आजच्या आधुनिक, वेगवान जमान्यात पदयात्रा हा काहींना जरा विचित्र वाटणारा मार्ग मी निवडला आणि सलग ९० दिवस चाललो...