दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:16 IST2026-01-01T11:14:56+5:302026-01-01T11:16:03+5:30
गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानातील तब्बल १४ लाख उच्चशिक्षित लोकांनी देश सोडला आहे. आपला अख्खा देशच ‘ब्रेन ड्रेन’ होईल की काय, या भीतीनं पाकिस्तान सरकारही हादरलं आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीप्रमाणे पाकिस्तान दिवसेंदिवस खड्ड्यातच चालला आहे. जगात सगळीकडून त्यांची गळचेपी होत असल्यानं आणि या देशात आपलं काहीच भवितव्य नाही, याची खात्री झाल्यानं पाकिस्तानातील जे उच्चशिक्षित आणि विशेष कौशल्यं प्राप्त असलेले लोक आहेत, तेही एक एक करत देश सोडून चालले आहेत.
गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानातील तब्बल १४ लाख उच्चशिक्षित लोकांनी देश सोडला आहे. आपला अख्खा देशच ‘ब्रेन ड्रेन’ होईल की काय, या भीतीनं पाकिस्तान सरकारही हादरलं आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. २०२५मध्ये इतर उच्च शिक्षितांसह १६ हजार डॉक्टर-इंजिनिअर पाकिस्तानातून बाहेर पडले. महागाई, दहशतवाद, कमकुवत अर्थव्यवस्था आणि राजकीय अस्थिरतेमुळे लोकांनी आपल्याच देशाला रामराम ठोकला आहे.
सरकारी आकड्यांनुसार या वर्षी सुमारे पाच हजार डॉक्टर, ११ हजार इंजिनिअर आणि १३ हजार अकाउंटंट देशाबाहेर गेले. सर्वाधिक फटका नर्सिंग क्षेत्राला बसला. ब्युरो ऑफ इमिग्रेशन अँड ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटच्या माहितीनुसार, फक्त २०२४ मध्येच जवळपास ७.२७ लाख पाकिस्तान्यांनी परदेशात कामासाठी नोंदणी केली. नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुमारे ६.६७ लाख लोक देश सोडून गेले.
या कारणानं पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची त्यांच्याच देशातल्या लोकांकडून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर असताना मुनीर यांनी प्रवासी पाकिस्तान्यांना देशाची शान म्हटलं होतं आणि याला ‘ब्रेन ड्रेन’ न म्हणता ‘ब्रेन गेन’ म्हणायला हवं, असंही म्हटलं होतं.
सततच्या इंटरनेट आणि डिजिटल समस्यांमुळेही पाकिस्तानी नागरिक वैतागले आहेत. एका ताज्या अहवालानुसार २०२४मध्ये इंटरनेट बंदमुळे होणाऱ्या आर्थिक तोट्याच्या बाबतीत पाकिस्तान जगात पहिल्या स्थानावर होता. त्यामुळे पाकिस्तानला सुमारे १.६२ अब्ज डॉलर (सुमारे १५ हजार कोटी रुपये) तोटा झाला. इंटरनेट वारंवार बंद पडणं आणि संथ सेवेमुळे फ्रीलान्सर आणि ऑनलाइन काम करणाऱ्यांना प्रचंड अडचणी आल्या. त्यामुळे काम मिळण्याच्या त्यांच्या शक्यता तब्बल ७० टक्क्यांनी घटल्या.
पाकिस्तानी माध्यमांनीही यावरून आपल्याच देशाचे वाभाडे काढले आहेत. पाकिस्तानच्या प्रमुख वृत्तपत्रांनी देशाला ‘ब्रेन ड्रेन इकॉनॉमी’ असं संबोधून आपल्याच देशाची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे. ‘ब्रेन ड्रेन इकॉनॉमी’ म्हणजे असा देश, जो भविष्य घडवणाऱ्या शिक्षित व कुशल नागरिकांना देशाबाहेर पाठवून त्यांच्या जिवावर रडतखडत चालतोय.
परदेशात स्थायिक असलेले पाकिस्तानी आपल्या कुटुंबाला पैसा पाठवतात, त्यामुळे देशाला काही प्रमाणात परकीय चलन मिळतं, पण दीर्घकाळासाठी हा अतिशय मोठा धोका आहे. कारण देशात कुशल मनुष्यबळच शिल्लक राहणार नाही.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते साजिद सिकंदर अली यांचं म्हणणं आहे, देशात ना उद्योग आहेत, ना संशोधनासाठी निधी, ना चांगल्या नोकऱ्या. अशा परिस्थितीत कुशल लोकांना देशाबाहेर जाण्यापासून थांबवायचं तरी कसं? त्यांचा अपमान केल्यानं किंवा त्यांच्यावर निर्बंध लादल्यामुळे ते थांबणार नाहीत. ते तेव्हाच थांबतील जेव्हा त्यांना आपल्या देशात प्रगतीच्या संधी मिळतील!