भरधाव ट्रकने महिलेले नेले फरफटत, जागेवरच गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 22:13 IST2019-11-09T22:12:42+5:302019-11-09T22:13:19+5:30
मुंबई-आग्रा महामार्ग । देवभान-कापडणे फाट्यावरील अपघाताने सर्वच सुन्न, गतिरोधकाच्या मागणीसाठी दीड तास ठिय्या, तातडीने पोलीस दाखल

भरधाव ट्रकने महिलेले नेले फरफटत, जागेवरच गतप्राण
कापडणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर शनिवारी दुपारी ट्रक अपघातात मोराणे येथील पुष्पाबाई पाटील या जागीच ठार झाल्या़ कापडणे येथे अंत्ययात्रेसाठी त्या पती सोबत दुचाकीने येत असताना ही दुर्घटना घडली़ घटनास्थळी गतिरोधकाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले़ घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस दाखल झाले होते़
धुळे तालुक्यातील कापडणे येथील शालिग्राम पाटील यांच्या अंत्ययात्रेसाठी देविदास निकम (पाटील) आणि त्यांची पत्नी पुष्पाबाई हे दोघे एमएच १८ एएफ ५२९७ क्रमांकाच्या दुचाकीने धुळे तालुक्यातील मोराणे येथून येत होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरुन कापडणे गावाकडे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणारा युपी ७२ एटी ५३६० क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात देविदास निकम हे पुढे फेकले गेले़ परिणामी ते केवळ जखमी झाले आहेत़ परंतु त्यांची पत्नी पुष्पाबाई या मात्र ट्रकच्या चाकाखाली आहे़ ट्रक सोनगीरच्या दिशेने जात असल्याने त्या किमान दिड ते दोन किमी अंतरापर्यंत फरफटत गेल्याने त्यांचे शरीर धडापासून वेगळे झाले होते़ यात पुष्पाबाई यांचा जागीच मृत्यू ओढवला़ घटनास्थळीच मयत झालेल्या पुष्पा पाटील यांच्या मृत शरीराला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले होते.
दीड तास आंदोलन
अपघाताची घटना इतकी भयंकर होती की अक्षरश: सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला़ बºयाच महिन्यापूर्वी केंद्र शासनाच्या आदेशान्वये महामार्गावरील देवभाने कापडणे फाट्यावरील गतिरोधक काढले गेले असल्यामुळे यामुळे भरधाव वेगाने येणाºया वाहनचालकांचे नियंत्रण नसल्याने याठिकाणी नियमित अपघात होतात़ वाहनचालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे़ याठिकाणी तात्काळ गतिरोधक टाकण्यात यावेत अशी रास्ता रोको करणाºया ग्रामस्थांनी लावून धरली होती़ तब्बल दीड तासापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अडविण्यात आले होते. यामुळे देवभाने ते नगाव या चार ते पाच किलोमीटर आंतरापर्यंत थांबलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या़
पोलीस घटनास्थळी दाखल
अपघात आणि त्यानंतर झालेला रास्ता रोको यामुळे वातावरण तणावपुर्ण झाले होते़ घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी धुळे येथील केंद्रीय कमांडो पोलीस पथकाला पाचारण केले़ यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांचा ताफा घटनास्थळी पोहचला़ त्यानंतर जमलेल्या गर्दीला समज देण्यात आली व आंदोलन मागे घेण्यात आले़ त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली़
मोराण्यात हळहळ
पुष्पाबाई पाटील यांचा अचानक अपघातात मृत्यू झाल्याने मोराणे गावात हळहळ व्यक्त झाली़ त्यांच्या कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ मयत पुष्पाबाई पाटील यांच्यावर सायंकाळी सहा वाजता मोराणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती देवीदास पाटील, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते संदीप पाटील, विनोद पाटील आणि मुंबई पोलीस सागर पाटील यांच्या आई होत़
अंत्ययात्रेला जात असतानाच अंत
धुळे तालुक्यातील मोराणे येथे राहणाºया पुष्पाबाई देविदास निकम (पाटील) (वय ५० वर्ष) या कापडणे येथे निधन झालेल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेस जाण्यासाठी सकाळी घरातून निघाल्या. पण अंत्ययात्रेत सहभागी होण्याआधीच देवभाने फाट्यावर झालेल्या अपघातात त्यांचा अंत झाला.